जोवर विश्वास आहे, तोवर श्वास आहे; वाचा एका सैनिकाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 08:00 AM2021-06-29T08:00:00+5:302021-06-29T08:00:06+5:30

विश्वास आहे, केवळ असे म्हणून भागत नाही, तर संकटकाळातही तो ढळता कामा नये. तरच ती खरी श्रद्धा आणि खरा विश्वास म्हणता येईल!

As long as there is faith, there is breath; Read the story of a soldier! | जोवर विश्वास आहे, तोवर श्वास आहे; वाचा एका सैनिकाची गोष्ट!

जोवर विश्वास आहे, तोवर श्वास आहे; वाचा एका सैनिकाची गोष्ट!

googlenewsNext

नोकरी गमावलेला एक तरुण आपल्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे या विवंचनेत होता. तो, त्याची पत्नी आणि एक गोड मुलगी असे त्यांचे छोटेसे विश्व होते. परंतु, त्यांना सांभाळण्यातही तो असमर्थ ठरत होता. त्याला पाहून मुलीचा चेहराही कोमेजून जात असे. तिला उभारी देण्यासाठी तो रोज सायंकाळी तिला घेऊन डोंगराजवळ जाई व तिला सांगे, `डोंगराच्या पल्याड बाप्पा राहतो. त्याला आपण विनंती केली, तर तो आपले ऐकतो. त्याला तू सांग बाबांना छान नोकरी मिळू दे म्हणून!'

मुलीचे वडिलांवर अतोनात प्रेम होते. त्यांचा शब्द प्रमाण मानून ती देवाजवळ रोज प्रार्थना करीत असे. काही काळातच तिची प्रार्थना फलद्रुप झाली. तिच्या बाबांना सैन्यभरतीत नोकरी मिळाली. सगळे जण आनंदून गेले. मुलीने देवाचे आभार मानले.

काही काळात युद्धप्रसंग आला. मुलीच्या बाबांना सीमेवर जावे लागणार होते. ती मात्र बाबांना जाऊ देत नव्हती. तेव्हाही तिच्या बाबांनी तिला त्या डोंगराजवळ नेले आणि देवाला प्रार्थना कर सांगितले. 

तिने बाबांना जाताना हातात एक चिठ्ठी दिली आणि डोंगरावरच्या देवाला द्या असे सांगितले. जड अंत:करणाने बाबा निघाले. त्यांनी ती चिठ्ठी घेतली आणि `एक ना एक दिवस मी परत येईन' असे लिहून पोस्टाच्या पेटीत टाकली. 

त्यानंतर जवळपास चार महिने लोटले पण सीमेवरून फक्त मृत्यूच्या बातम्या येत होत्या. मुलीचा विश्वास होता. ती बाबांची वाट पाहत होती. आणि खरोखरच, एक दिवस बाबा अचानक घरी येऊन उभे राहिले. त्यांची अवस्था बिकट होती. पण ते शत्रूच्या तावडीतून जीव वाचवून परत आले, याचाच सर्वांना आनंद होता.

त्याचवेळेस मुलीने बाबांना मिठी मारत म्हटले, `डोंगरापलीकडे राहणाऱ्या देवावर माझा विश्वास होता. त्यानेच तुमचे रक्षण केले आणि तुम्हाला परत पाठवले.'
हे ऐकून सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मुलीला कवटाळत म्हटले, `तुझ्या विश्वासाने माझा श्वास राखला.'

म्हणून विश्वास आहे, केवळ असे म्हणून भागत नाही, तर संकटकाळातही तो ढळता कामा नये. तरच ती खरी श्रद्धा आणि खरा विश्वास म्हणता येईल!

Web Title: As long as there is faith, there is breath; Read the story of a soldier!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.