भगवान गौतम बुद्ध सांगतात, 'उक्तीला कृतीची जोड हवी!'
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 20, 2020 06:06 PM2020-10-20T18:06:24+5:302020-10-20T18:06:47+5:30
'संतापणाऱ्यावर जो संतापतो, त्याचे नुकसान होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो, तो मोठे युद्ध जिंकतो.'-भगवान गौतम बुद्ध
ज्योत्स्ना गाडगीळ
आजच्या जगात सर्व काही मिळेल, नाही मिळत ती फक्त मन:शांती. त्या शोधात मनुष्य धडपडत असतो. त्यासाठी भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो. विषयात गुंतलेले मन विरक्त करावे लागते. या गोष्टी सहजसाध्य होत नाहीत. त्या केवळ संतांच्या सान्निध्यात शक्य होतात, म्हणून सत्संग केला जातो. असाच एक धनिक मन:शांतीच्या शोधात भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्मसभेत पोहोचला. तिथे भगवान बुद्धांकडून त्याला कोणती शिकवण मिळाली, ते पाहू.
एक धनिक अतिशय रागीट होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याचे लोकांशी वाद होत असत. वादातून मन:स्ताप होत असे आणि मन:स्तापामुळे कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नसे. कोणीतरी त्याला भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धनिकाने ता ऐकला. धर्मसभेत रोज भगवान बुद्ध यांची प्रवचने होत असत. धनिकाने थेट जाऊन बोलण्याचे धाडस न करता रोजची हजेरी लावायची, असे ठरवले. त्याप्रमाणे तो रोज गौतम बुद्धांची प्रवचने ऐकायला जाऊ लागला.
हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट
मात्र, मनात असंख्य विचार सुरू असल्यामुळे त्याच्यावर प्रवचनाचा कोणताही प्रभाव पडत नसे. उलट डोक्यात सतत घुमणाऱ्या वैचारिक वादळामुळे तो आणखीनच उद्विग्न होऊ लागला. बुद्ध वारंवार समजावून सांगत असत, `लोभ, द्वेष, मोह हेच पापाचे मूळ आहे. त्यांचा त्याग करा.' मात्र धनिकाला नेमके तेच करणे जमत नव्हते. बुद्ध सांगत, 'संतापणाऱ्यावर जो संतापतो, त्याचे नुकसान होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो, तो मोठे युद्ध जिंकतो.'
त्रासलेल्या धनिकाने एक दिवस बुद्धांना एकट गाठले आणि धीर करून सांगितले, `भगवान, गेले महिनाभर मी आपले प्रवचन ऐकत आहे, परंतु माझ्यावर त्याचा कणभरही परिणाम झाला नाही. असे का होत असेल?'
बुद्धांनी त्याच्याकडे स्मित करून पाहिले आणि म्हणाले, `हरकत नाही. आपण कुठे राहता?'
`इथून खूप दूर. फक्त प्रवचन ऐकण्यासाठी मी रोज एवढा प्रवास करून येत होतो.'
`अच्छा. तरी साधारण किती लांब आहे?' - बुद्धांनी विचारले.
`तासभर तरी लागतोच.'- धनिक उत्तरला.
`तिकडे कसे जाता', असे विचारत बुद्धांनी संवाद वाढवला.
`वाहनाने!'
त्या माणसान हिशोब करून वेळ सांगितला. त्यावर बुद्धांनी आणखी एक प्रश्न विचारला-
`इथे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या निवास स्थळी पोहोचू शकता का?'
धनिक म्हणाला, `हे कसे शक्य आहे? तिथे जायला पाहिले ना?'
बुद्ध प्रेमाने म्हणाले, `तुमचे म्हणणे योग्य आहे. चालल्याशिवाय आपण इच्छिात स्थळी पोहोचू शकत नाही. चालल्यावरच पोहोचू शकतो...त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणल्या तरच त्याचा परिणाम दिसून येतो. मिळवलेल्या ज्ञानाचे रूपांतर कर्मात होत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, असे नुसते म्हणून भागणार नाही, तर ती आचरणातही आणावी लागेल.'
धनिक वरमला. बुद्धांच्या पायाशी आपल्या क्रोधाचा त्याग करून शांतिमार्गाला लागला.
हेही वाचा : प्रेम म्हणजे काय, सांगताहेत संत सेना महाराज