Lord Hanuman: चिरंजीवी हनुमान आजही आपल्याला भेटू शकतात; पण कुठे आणि कसे? ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:27 AM2023-10-07T11:27:37+5:302023-10-07T11:28:52+5:30
Hanuman Upasana: हनुमंत चिरंजीवी आहेत असे आपण म्हणतो आणि आपल्या रक्षणार्थ ते येतील असा विश्वासही बाळगतो; त्यानिमित्ताने घेऊया त्यांच्या अस्तित्त्वाचा शोध!
हनुमान हा रामभक्त सप्त चिरंजिवांपैकी एक आहे, असे मानले जाते. रामाच्या वराने हनुमानाला चिरंजिवित्व प्राप्त झाले व सप्त चिरंजिवांच्या मालिकेत त्याला स्थान प्राप्त झाले. याचा अर्थ असा की या पृथ्वीतलावर आजमितीलाही हनुमानाचे वास्तव्य आहे. त्याने प्रभू रामचंद्राजवळ अशी इच्छा व्यक्त केली होती, की ज्या ठिकाणी रामकथा चालू आहे, तेथे मी अदृश्य रूपात उपस्थित असेन.
असे असले तरी हनुमानाची नित्याची निवासस्थाने किंपुरुषवर्ष, हिमालय व अयोध्या अशी मानली जातात. तो किंपुरुषवर्ष येथे श्रीराध्यानात मग्न असतो. गंधर्व रामगुणगान करतात. परिणामी हनुमानाच्या डोळ्यात आनंदाश्रु असतात. किंपुरुषवर्ष हे पुरातन काळातील असे ठिकाण होते, जिथे किन्नरांचे वास्तव्य असे.
हेमकूट पर्वतावरील रंगवल्लीपूर नगरात श्रीरामपूजेसाठी हनुमान नेहमी येतो. देवीभागवतात किंपुरुषवर्षात राम सीताही प्रत्यक्ष राहातात व हनुमान रामपूजेत मग्न असतो असा उल्लेख आहे. भागवतातही शुक मुनींनी परीक्षितीला `हनुमान किन्नरांसह किंपुरूषवर्षात वास्तव्य करून रामाची उपासना करतो' अशे निक्षून सांगितले आहे.
हनुमानाचे वास्तव्य हिमालयात आहे, असा उल्लेख आढतो. अयोध्या ही तर हनुमानाच्या प्रभूची नगरी! त्यामुळे तेथे त्याचे वास्तव्य राहणाराच.
याप्रमाणे किंपुरुषवर्ष, हिमालय व अयोध्या या तीन ठिकाणी हनुमानाचा निवास आहे, असे संशोधक मानतात. परंतु भक्तांच्या दृष्टीने मात्र जिथे जिथे रामकथा चालते, तिथे हनुमान उपस्थित असतातच!
याशिवाय तत्त्वज्ञानाचे आणि मानसशास्त्राचे अभ्यासक आपल्या मनाला हनुमान आणि बुद्धीला रामाची उपमा देतात. जसा हनुमान रामाचा दास असतो, तसे मन हे बुद्धीचे दास्यत्त्व पत्करते. मनाची शक्ती अफाट आहे. मात्र त्या शक्तीची जाणीव करून देणारा जांबुवंतासारखा गुरु असावा लागतो आणि ही शक्ती चांगल्या कामासाठी वापरावी याची जाणिवे करून देणारे रामासारखे नेतृत्त्व सोबत लागते. हनुमानाची साथ ज्या रामाला आहे तो कोणतेही युद्ध जिंकू शकतो आणि आपल्या अंतर्मनातली राम आणि हनुमान यांची प्रतिमा ओळखू शकतो. या दोन्ही गोष्टींची जाणीव ज्याला झाली, त्याला हनुमंत तर भेटतीलच, शिवाय रामाचीही अनुभूती घडून येईल. वसे तो देव तुझ्या अंतरी...