श्रीकृष्णार्जुन संवाद: सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता...

By देवेश फडके | Published: January 22, 2021 07:44 PM2021-01-22T19:44:29+5:302021-01-22T19:47:09+5:30

परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

lord krishna told to arjuna in bhagwat geeta give up everything and surrender to supreme power | श्रीकृष्णार्जुन संवाद: सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता...

श्रीकृष्णार्जुन संवाद: सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता...

googlenewsNext

प्रत्येक माणूस हा जीवन जगताना काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. आपले आचार, विचार, व्यवहार याप्रमाणे आचरण करत असतो. आपल्या आराध्य देवतेची भक्ती करतानाही काहीतरी धारणा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात. माणसागणिक त्या बदलत असतात. देवाचे नामस्मरण, पूजन, आराधना, उपासना करतानाही काही संकल्पना मनात बाळगूनच आचरण केले जात असते. कालातीत अमोघ ज्ञान देणाऱ्या भगवद्गीतेत भगवंताची भक्ती कशी करावी, याबाबत सखोल आणि विस्तृत विवेचन केलेले आढळून येते. भगवद्गीतेत छोट्या छोट्या गोष्टींवर अतिशय सविस्तर वर्णन केलेले आढळून येते. परमेश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. सर्व पापांतून मुक्तता आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी ईश्वर कटिबद्ध आहे, असा अर्थ या श्लोकाचा सांगितला जातो. मात्र, धर्माचा त्याग करावा म्हणजे नेमके काय करायचे? धर्म नावाचे जे काही आहे, ते सर्व सोडून द्यायचे का? असे काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जातात. प्रत्येक जण आपापले विचार, मान्यता आणि कुवतीनुसार तसेच आपापल्यापरिने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. 

धर्माचा खरा अर्थ काय आहे. धर्म हा शब्द धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे, असा होतो. धारयति इति धर्मः!, असे म्हटले जाते. जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा बरोबर असू शकतात, तशा त्या चुकीच्याही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात. धारणांमध्ये गल्लतही असू शकते, असे सांगितले जाते. 

श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. 

कर्ताही मीच, क्रियाही मीच, क्रियापदही मीच आहे, हे एकदा लक्षात घेतले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे; तसेच यातून बाहेर काढणाराही मीच आहे. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे, असेही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात.

Web Title: lord krishna told to arjuna in bhagwat geeta give up everything and surrender to supreme power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.