प्रेम 'अकारण' करता यायला हवे, जसे संत नामदेवांनी विठूमाऊलीवर केले...प्रेमभावो!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 17, 2021 10:23 AM2021-02-17T10:23:53+5:302021-02-17T10:24:14+5:30
प्रेम करण्यासाठी कारण लागत नाही. कारण शोधून प्रेम करणे, हा व्यवहार झाला, प्रेम नाही. प्रेम अकारण करता यायला हवे. अन्यथा कारण संपले, की प्रेमही संपून जाते.
ज्योत्स्ना गाडगीळ
काही गाणी ऐकता क्षणी हृदयात घर करतात. संत नामदेवांचा हा अभंगदेखील त्यापैकीच एक! विठ्ठल भक्तीत ओथंबून निघालेला आणि गायक सुरेश वाडकर यांच्या भावपूर्ण स्वरात चिंब भिजलेला. मालकंस रागातील हा अभंग संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केला आहे. शांत बसून डोळे बंद करून या अभंगाचा आस्वाद घेतला, की शब्दांचा आणि शब्दांमधला अर्थ आपोआप उलगडत जातो.
विठ्ठल आवडी प्रेमभावो,
विठ्ठल नामाचा रे टाहो।।
तुटला हा संदेहो,
भव मूळ व्याधीचा।
म्हणा नरहरी उच्चार,
कृष्ण हरी श्रीधर,
हेचि नाम आम्हा सार
संसार तरावय।।
नेघो नामाविण काही,
विठ्ठल कृष्ण लवलाही,
नामा म्हणे तरलो पाही,
विठ्ठल विठ्ठल म्हणाताचि।।
विठ्ठल आवडीचे कारण संत नामदेव एका शब्दात व्यक्त करतात...प्रेमभावो! प्रेम करण्यासाठी कारण लागत नाही. कारण शोधून प्रेम करणे, हा व्यवहार झाला, प्रेम नाही. प्रेम अकारण करता यायला हवे. अन्यथा कारण संपले, की प्रेमही संपून जाते. संत नामदेव म्हणतात, विठ्ठलावर प्रेम जडले आहे, तेही अकारण आहे. त्याच्याप्रती प्रेमभाव आहे म्हणून मला तो आवडतो. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी केवळ साद घालत नसून मी त्याच्या नावे टाहो फोडत आहे. केवढी ही आर्तता...!
विठ्ठलाचा लळा लागल्यावर भवतापाचा संदेह आपोआप तुटून जातो. सत्य उलगडले की जग मिथ्या वाटू लागते. त्यामुळे कशात मन अडकवायचे आणि कशातून अलिप्त राहायचे, हे आपसुख उमगत जाते. आपण जे काही पाहतो, ती मोह माया आहे. त्यात अडकल्यावर सहसा सुटका नाही. ते सकल व्याधींचे मूळ आहे. मात्र, एकदा का विठ्ठल नामाची गोडी लागली, की भवतापातील व्याधी जडत नाहीत.
आजारपणातून बरे व्हायचे असेल, तर डॉक्टरांचे ऐकावे लागते. त्यांनी सांगितलेले उपचार करावे लागतात. ते केले, तरच औषधाला गुण येतो आणि रोगी ठणठणीत बरा होतो. त्याप्रमाणे भवसागरातील व्याधींचे मूळ नष्ट व्हावेसे वाटत असेल, तर विठ्ठल नामाची मात्रा रोज घेतली पाहिजे. विठ्ठल भक्तीचे पथ्य पाळले पाहिजे. तरच जीवाशिवाची भेट होऊन हा संसार तरून जाता येईल.
अमृताहूनी गोड असलेल्या विठ्ठलनामाची गोडी लागली, की अन्य गोष्टी त्यासमोर अगोड वाटू लागतील. नेघो म्हणजे न घेणे. अन्य कोणतेही नाम घ्यावेसे वाटणार नाही. कृष्ण भक्तीची आस लागून लवकरात लवकर त्याची भेट कधी होईल, ही ओढ निर्माण होईल़ या आर्ततेमुळे एक न एक दिवस त्या विठ्ठलाची गाठभेट होईल आणि हा भवसागर तरून विठ्ठलाच्या गावी जाता येईल, अशी खात्री संत नामदेव व्यक्त करत आहेत.
आपणही त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवत राम कृष्ण हरी म्हणूया आणि आपले नियमित काम करून विठ्ठलभक्तीत रमूया.