Lucky Signs: भारद्वाज दर्शनाने कृष्णमित्र सुदामाचे पालटले होते भाग्य; आजही त्याचे दिसणे मानले जाते शुभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:09 PM2022-08-12T15:09:35+5:302022-08-12T15:10:07+5:30

Lucky Signs: दिवसाची सुरुवात भारद्वाजाच्या दर्शनाने होणं हे दुर्मिळच; पण त्याच्याबद्दल आणखीही अनेक रोचक गोष्टी जाणून घेऊ!

Lucky Signs: Krishnamitra Sudama's fortune was changed by Bharadwaj Darshan; Even today its appearance is considered auspicious! | Lucky Signs: भारद्वाज दर्शनाने कृष्णमित्र सुदामाचे पालटले होते भाग्य; आजही त्याचे दिसणे मानले जाते शुभ!

Lucky Signs: भारद्वाज दर्शनाने कृष्णमित्र सुदामाचे पालटले होते भाग्य; आजही त्याचे दिसणे मानले जाते शुभ!

googlenewsNext

>> सिद्धार्थ अकोलकर

अहमदनगरच्या एका डॉक्टरांना नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकाजवळ दहा बारा भारद्वाजांचा थवा दिसला असं वाचनात आलं. हा खरंतर एक महादुर्मीळ प्रसंग आहे कारण भारद्वाज हा अगदीच एकटा-दुकटा राहणारा पक्षी आहे. थोर पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अलींनाही फार क्वचित भारद्वाजांचा थवा आढळलेला आहे. डॉक्टर साहेबांच्या त्या लेखामुळे एकूणच 'माझ्या भारद्वाजा'ला वेळ मिळाला असं म्हटलं पाहिजे. या पक्ष्याचं संपूर्ण शरीर रखरखीत झळाळत्या काळ्या निळ्या जांभळ्या रंगाचं असून त्यावर लाल मातकट विटकरी रंगाचे पंख असतात. भारद्वाज त्याच्या लांबसडक पंख आणि शेपटीमुळे नजरेत भरतो... पण जर सहज दिसला तर! आणि एकदा जर तो दिसला तर त्याच्या त्या गुंजेसारख्या लालभडक डोळ्यांमुळे तो कायमचा लक्षात राहतो.

भारद्वाज हा खरा कोकीळेच्या कुळातला एकटा-दुकटा वा जोडीने राहणारा पक्षी पण पिल्लांच्या पालकत्वाच्या बाबतीत मात्र त्याच्या जातभाईंसारखं वागत नाही. एकदा त्यांची जोडी जुळली की निदान काही हंगामांपुरती तरी ती टिकून असते. विणीच्या हंगामात (जून ते सप्टेंबर) खूप साऱ्या खाद्यभेटी देऊन मादीचं मन वळवलं की नरपक्षी घरटं बांधायच्या वा जुन्या घरट्याच्या डागडुजीला लागतो. जमिनीपासून साधारण पंधरा फुटांवर झाडाच्या बेचक्यात किंवा एखाद्या वळचणीला छान गोल घुमटाकार खोपा बांधलेला असतो. यथायोग्य वेळी ती त्यात तीन ते पाच अंडी घालते. पिल्लांचा सांभाळ ती आणि तो मिळून करतात. या राजसपक्ष्याने कोकणातल्या सावंतवाडीचं 'सिटी बर्ड' पद मिळवलेलं आहे आणि दुर्दैवाने जर कधी 'तमिळ ईलम' निर्माण झालंच तर ते भारद्वाजाचा त्यांचा ‘राष्ट्रीय पक्षी’ म्हणून सन्मान करणार आहेत.

गेली बरीच वर्षं आमच्या घराजवळ भारद्वाजाच्या दोन जोड्या राहात आहेत. शेतातल्या पाण्याच्या पंपासारखी त्यांची ती 'कुक्‌-कुक्‌' 'कुक्‌-कुक्‌' करत येणारी साद कानावर पडताक्षणी आम्ही खिडक्यांजवळ, गच्चीवर पळत सुटायचो. कारण आजी सांगायची, "सकाळी हा पक्षी दिसणं म्हणजे शुभशकून"! आज आमचा मुलगाही तस्साच पळत सुटतो आणि मग त्याच्या आजीलाही पळवतो. लक्ष देऊन ऐकलं तर त्या आवाजातली विविधता सहज कळून येते. तो वर उल्लेखलेला आवाज हा एकमेकांचं लक्ष वेधण्यासाठी असतो. 'हिस्स' सारखा आवाज धोक्याची निशाणी असते. कर्णकर्कश्श अशा 'स्किऽऽॲऑ' आवाजाने रागे भरले जातात. काही वेळेला ते 'लोटॉक्क, लोटॉक' असा खुळखुळा वाजवल्यासारखा भरभर आवाजही काढतात. मादी दिसायला नरापेक्षा किंचित मोठी असते पण तिच्या आवाजाची पट्टी मात्र त्याच्या आवाजाच्या एक घर खालची असते.

आपल्याला कृष्ण आणि त्याचा बालमित्र सुदामा यांची गोष्ट माहितीय. तर या सुदाम्याला द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज आडवा गेला होता असा महाभारतात उल्लेख आहे. कृष्ण भेटीनंतर सुदाम्याचं आयुष्य कसं बदललं हे सांगायला नकोच. सुदाम्याच्या त्या मळक्या पिशवीमधले मूठभर पोहे कृष्ण खातो काय आणि इकडे सुदाम्याचं घर संपत्तीने भरुन जातं काय! असो. सांगायचा मुद्दा म्हणजे अगदी पार त्या काळापासून सकाळी भारद्वाज दिसणं हे शुभ मानलं गेलंय. आम्हाला भारद्वाज रोजच दिसतो; बस्स, कृष्ण भेटायचा तेवढा बाकी आहे.

माणूस हा एक अत्यंत विक्षिप्त प्राणी आहे. एका बाजूला ‘शुभ शुभ’ म्हणून भारद्वाजाला डोक्यावर घेणाऱ्या माणसाने या पक्ष्याला वाईट दिवसही पाहायला लावले होते. कोणे एके काळी प्राचीन भारतात भारद्वाजाचं मांस खाणं हा अनेक रोगांवरचा 'अक्सीर इलाज' म्हणून सांगितलं जायचं. खास करुन क्षयरोग आणि फुफ्फुसांच्या विकारावर ते अतिशय गुणकारी असतं असा समज होता. भारतात नवीनच आलेल्या ब्रिटीश शिपायांनी तर अनेकदा तित्तर पक्षी समजून भारद्वाज मारले पण त्याचं विचित्र वासाचं व चवीचं मांस त्यांना पचवता आलं नाही. त्यामुळे त्यांनी भारद्वाजाला 'दुःखी तित्तर' असं अजब नाव बहाल केलेलं होतं. इंग्रजांच्या काळात भारद्वाजाची बेसुमार हत्या झाल्याची नोंद आहे. 

भारद्वाज दिसणं शुभ का मानायचं तर तो छोटेमोठे किडे, अळ्या, सापसुरळ्या, छोटे बेडूक, सरडे, पाली, इ. मोठ्या आवडीने खातो. इतर पक्ष्यांची अंडी पळवून खाण्यातही चांगलाच तरबेज असतो. क्वचित कधी मोठे साप पकडून खातानाही तो दिसलेला आहे. त्याच्या दोन इंची नख्या सरळधोप आणि अत्यंत तीक्ष्ण असतात. अवतीभवती भारद्वाज दिसला की आपण निर्धोक व्हावं. सापाचं, विंचूकाट्याचं भय त्याच्या हद्दीत तरी नक्कीच नसतं. सरपटणारा तमाम प्राणीवर्ग त्याला जाम घाबरतो.

भारद्वाज पाळायचे प्रयत्न मात्र कधी करु नयेत. त्याच्या रक्ताच्या तांबड्या पेशीत हिमोस्पोरीडीया हा हिंवताप (Malaria) पसरवणारा परजीवी आढळतो. हा पक्षी जास्त काळ जमिनीवर राहात असल्याने त्याच्या अंगावर गोचीडी, पिसवा असे रक्तपिपासू कीटकही असतात आणि त्यांच्यामार्फत हिंवताप माणसामध्ये संक्रमित होऊ शकतो. त्यापेक्षा तो असा बागडणारा, मोकळाच राहिलेला बरा; तरच तो ‘शुभशकुन’ खऱ्या अर्थाने सुफल फलदायी होईल.

Web Title: Lucky Signs: Krishnamitra Sudama's fortune was changed by Bharadwaj Darshan; Even today its appearance is considered auspicious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग