Lunar Eclipse 2022: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी करा विधिवत लक्ष्मीपूजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 10:58 AM2022-05-14T10:58:25+5:302022-05-14T10:58:51+5:30
Lunar Eclipse 2022: धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही अशुभ मानले गेले असले तरी या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा वरदहस्त लाभतो.
हिंदू नवं वर्षातले पहिले चंद्र ग्रहण १६ मे रोजी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही आणि त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही. सुतक काळात अनेक गोष्टी करणे वर्ज्य मानल्या जातात. त्यांचे पालन केले नाही तर ग्रहणाचा नकारात्मक परिणाम जीवनावर होतो असा अनेकांचा अनुभव आहे. ज्योतिष शास्त्राने या काळात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय दिले आहेत. ते केले असता आर्थिक समस्या दूर होतील असा दिलासाही ज्योतिष शास्त्राने दिला आहे.
चंद्रग्रहणाच्या दिवशी करा लक्ष्मीची पूजा :
चंद्रग्रहणाच्या दिवशी सायंकाळी आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करावे. नंतर उत्तरेकडे तोंड करावे. एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा ओंकार कुंकवाने रेखाटावा. त्यावर लक्ष्मीची प्रतिमा किंवा देवघरातील अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी. त्याभोवती फुलांची आरास करावी. बाजूला मुठभर तांदूळ ठेवून त्यावर शंख ठेवावा व त्याला कुंकू लावावे. तुपाचा दिवा लावावा. देवीला कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आपली इच्छा व्यक्त करावी आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करावी-
सिद्धि बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ति प्रदायिनी,
पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते'
या मंत्राचा जप करावा. चंद्रग्रहण संपल्यावर देवीची प्रतिमा जागेवर ठेवून निर्माल्य काढून घ्यावे आणि शंखाखालचे चिमूटभर तांदूळ तिजोरीत ठेवावेत आणि बाकीचे रोजच्या धान्यात मिसळून टाकावेत. या पूजेनिमित्त एखाद्या गरजूला दान, दक्षिणा, शिधा द्यावा. त्यामुळे लक्ष्मीचा वरद हस्त लाभतो आणि आर्थिक समस्या दूर होतात असा भाविकांचा अनुभव आहे.
चंद्रग्रहणाचा काळ :
१६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात सकाळी ८. ५९ ते १०. २३ पर्यंत राहील. हे संपूर्ण चंद्रग्रहण आहे पण ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ मानला जाणार नाही. हे चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागांव्यतिरिक्त युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. यानंतर पुढील चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे.