Lunar Eclipse 2022: सूर्यग्रहण झाले, आता या वर्षातले पहिले चंद्रग्रहण; नेमके कधी? कसे व केव्हा पाळायचे ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 08:00 AM2022-05-03T08:00:00+5:302022-05-03T08:00:01+5:30
Lunar Eclipse 2022: ३० एप्रिल रोजी हिंदू नवं वर्षातीलपहिले सूर्यग्रहण झाले आणि आता काही दिवसांतच चंद्र ग्रहणही आहे. ते भारतातून दिसणार आहे का? या ग्रहणाची पथ्ये पाळायची आहेत का? ते नेमके कधी आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
या वर्षभरात एकूण ४ ग्रहणे आहेत, त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण आहेत. हिंदू नवं वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी झाले. या सूर्यग्रहणानंतर आता १६ मे २०२२ रोजी चंद्रग्रहण होणार आहे. यापैकी ३० एप्रिल रोजी झालेले सूर्यग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण होते. मात्र १६ मे रोजी होणारे चंद्रग्रहण हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल. मात्र ते भारतातून दिसणार नाही.
चंद्र ग्रहणाचे सुतक पाळायचे का?
नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाचा सुतक काळ मानला गेला नाही कारण ते भारतातून दिसत नव्हते. त्याचप्रमाणे, येत्या पूर्ण चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी देखील वैध राहणार नाही, कारण ते देखील भारतातून दिसणार नाही.
चंद्र ग्रहणाची वेळ :
१६ मे रोजी सकाळी ७ वाजता चंद्रग्रहण सुरू होणार असून ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव टळणार नाही. हे ग्रहण वृषभ राशीमध्ये होईल आणि त्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. या ग्रहणानंतर स्नान आणि दान करणे आवश्यक आहे, जेणेकरून ग्रहणाचे नकारात्मक परिणाम टाळता येतील. हे ग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिका या भागांमध्ये दिसणार आहे.
पुढील चंद्रग्रहण नोव्हेंबरमध्ये :
या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. हे ग्रहण भारताच्या काही भागात दिसणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्या काळात ग्रहणाचे नियम पाळणे बंधनकारक राहील. त्याबद्दल सविस्तर चर्चा त्यावेळी करूच, तूर्तास आगामी चन्द्र ग्रहणात स्नान आणि दान याला महत्त्व देऊ आणि ग्रहण कालावधी पार पाडू.