Lunar Eclipse 2021: सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण: कधी लागणार ग्रहण? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 10:52 AM2021-11-19T10:52:23+5:302021-11-19T10:52:23+5:30
भारताच्या कोणत्या भागात चंद्रग्रहण दिसेल? चंद्रग्रहणाचा कालावधी, वेध, मध्य आणि समाप्ती वेळा जाणून घेऊया...
सन २०२१ मधील शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी लागत आहे. गेल्या काही शतकातील हे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण असल्याचे सांगितले जात आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण खंडग्रास स्वरुपातील असणार आहे. खगोलतज्ज्ञांच्या मते, तब्बल ५८० वर्षांनी अशा प्रकारचे मोठे आंशिक चंद्रग्रहण होत आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा यांनीही याबाबत माहिती दिली आहे. चंद्रग्रहण जेवढे मोठे, तेवढा त्याचा प्रभाव आणि परिणामकारकताही अधिक असते, असे सांगितले जाते. भारतातील काही भागातच हे चंद्रग्रहण ओझरते दिसू शकेल. त्यामुळे उर्वरित भारतात याचा प्रभाव पाहायला मिळणार नाही. भारताच्या कोणत्या भागात चंद्रग्रहण दिसेल? चंद्रग्रहणाचा कालावधी, वेध, मध्य आणि समाप्ती वेळा जाणून घेऊया... (Lunar Eclipse November 2021 Timings)
कार्तिक पौर्णिमा चंद्रग्रहणाचा सूतक काळ
चंद्रग्रहणाचा वेध - सकाळी ११ वाजून ३० मिनिटे.
चंद्रग्रहण प्रारंभ - दुपारी १२ वाजून ४८ मिनिटे.
चंद्रग्रहण मध्य - दुपारी ०२ वाजून ३८ मिनिटे.
चंद्रग्रहण समाप्ती - सायंकाळी ०४ वाजून १७ मिनिटे.
स्वच्छ पूर्ण चंद्रदर्शन - सायंकाळी ०५ वाजून ३६ मिनिटे.
चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी - ३ तास २९ मिनिटे. (Chandra Grahan November 2021 Time Sutak Kaal)
कुठे दिसणार चंद्रग्रहण
कार्तिक पौर्णिमेला लागत असलेले सर्वांत मोठे चंद्रग्रहण भारताच्या केवळ अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या पूर्व भागात काही प्रमाणात पाहता येऊ शकेल. त्यामुळे चंद्रग्रहणाचा सूतक काळ केवळ याच भागापुरता लागू राहील. मात्र, भारतातील अन्य भागात ग्रहणाचा प्रभाव आणि सूतक काळ लागू राहणार नाही. भारतासह उत्तर युरोप, अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागराच्या भागात आणि आशियातील बहुतांश भागांमध्ये दिसेल.
चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य
गेल्या काही शतकांतील हे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सुमारे ५८० वर्षांपूर्वी म्हणजेच १८ फेब्रुवारी १४४० रोजी झाले होते. त्यानंतर आता १९ नोव्हेंबर २०२१ रोजी असे चंद्रग्रहण आहे. तसेच यानंतर ८ फेब्रुवारी २६६९ रोजी असे चंद्रग्रहम होईल, असे सांगितले जात आहे. ग्रहण कृतिका नक्षत्रात होत असून, या चंद्रग्रहणावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान असेल.