Madhwacharya : वायूचे तिसरे अवतार मानले जाणारे धर्मरक्षक मध्वाचार्य यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचे कार्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 10:23 IST2025-02-06T10:22:46+5:302025-02-06T10:23:23+5:30
Madhwacharya Punyatithi 2025: १२ व्या शतकात वयाच्या १२ व्या वर्षी संन्यास घेऊन धर्मशास्त्राचे अगाध ज्ञान देणारे, धर्मप्रचारक मध्वाचार्य यांचा परिचय.

Madhwacharya : वायूचे तिसरे अवतार मानले जाणारे धर्मरक्षक मध्वाचार्य यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचे कार्य!
>> सौ. मृदुला विजय हब्बु
भारत भूमीवर जेव्हा मिथ्यावाद बळावला होता, परमात्म्यावरचा विश्वास श्रद्धा भक्ती निघून चालली होती, तेव्हा आचार्यांनी अवतार घेऊन श्रद्धा, भक्ति पुन्हा रुजवून सत्तत्वज्ञानाचा उपदेश करुन हिंदू धर्म टिकवून ठेवण्यात फार मोठी मोलाची भर घातली.
श्री मध्वाचार्य हे हंस नामक परमात्म्यापासून सुरू झालेल्या उत्तरादी पीठाचे महान आचार्य. या पीठाची परंपरा असे सांगते, की ब्रम्हदेवाने प्रत्यक्ष परमात्म्याला विचारलेल्या प्रश्नांना भगवंताने हंसरुपी अवतार घेऊन उत्तरे दिली. ते ज्ञान पुढे परंपरेने मुखांतर झाले. त्या परंपरेचा पंथ म्हणजे उत्तरादी मठ.
श्रीमध्वाचार्यांचा जन्म इस १२३८साली उडुपी या तीर्थक्षेत्राजवळ असणाऱ्या 'पाजक' या गावी झाला. उत्तरादी मठाची परंपरा श्रीमदाचार्यांना वायुदेवाचा अवतार मानते. वायु देवाचे एकूण तीन अवतार आहेत पहिला अवतार हनुमंत, दुसरा भीमसेन आणि तिसरा श्रीमध्वाचार्य. म्हणून यास अवतार त्रय असेही म्हणतात "हनुम -भीम- मध्व!"
त्यांच्या पित्याचे नाव श्रीमध्यगेह भट्ट व मातेचे नाव सौ वेदवती असे होते. त्यांना कल्याणी नामक एक मुलगी होती. वंशाला पुत्र असावा म्हणून म्हणून भगवंत कुलस्वामी श्रीअनंतेश्वराची अखंड बारा वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. तेच श्रीमध्वाचार्य होय. या बाळाचे नाव फार कौतुकाने त्यांनी वासुदेव असे ठेवले. बालपणापासूनच हे बाळ आपण सामान्य नसल्याची वेळोवेळी चुणुक दाखवून देत होते. वडील श्री मध्यगेह भट्ट स्वतः वेदशास्त्रसंपन्न असल्याने मुलाचा अक्षरभ्यास लवकर करवून स्वतःच शिकवू लागले. वासुदेव एकपाठी असल्याने दुसऱ्या दिवशी तेच अक्षर वाचणे त्याला आवडत नसे. त्यांची कुशाग्र बुद्धी पाहून मध्यगेह भट्टांनी वासुदेवाचे पाचव्याच वर्षी उपनयन करून श्री तोटंतिल्लाय नामक आचार्यांच्या गुरुकुली वेदशास्त्राचा अभ्यास करण्यास पाठविले. बाराव्या वर्षीच सर्व ज्ञान संपादन करून त्यांनी संन्यासही घेतला. त्यांचे जीवन चरित्र त्यांच्या समकालीन श्री त्रिविक्रम पंडिताचार्य यांचे पुत्र श्री नारायणपंडिताचार्य यांनी आपल्या 'श्री सुमध्वविजय' नामक महाकाव्यात लिहून ठेवले असल्याने तेच ग्राह्य धरले जाते. ते स्वतः त्यांचे अनुयायी असून प्रत्यक्षदर्शी होते .
गुरुकुलात राहून वेदाभ्यास करताना वासुदेवाची अगाध बुद्धिमत्ता गुरूंच्याही लक्षात आली. तेव्हापासून त्यांनी वासुदेवाला एकांतात पाठ देणे सुरू केले. गुरुकुलात असतानाच वासुदेवाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले आणि भगवंताविषयी तसेच सत्शास्त्राविषयी प्रसार करायचा असेल तर गृहस्थाश्रमात हे काम होणे नाही म्हणून लवकरच संन्यास घेतला पाहिजे या निर्णयाप्रत ते आले. गुरुकुलातून अभ्यास संपवून घरी आल्यावर त्यांनी उडुपीला जाण्याचे नक्की केले आणि ते चालत चालत पोहोचले. येथे श्री अनंतेश्वराच्या देवळात श्री अच्युतप्रेक्ष नावाचे संन्यासी वासुदेवाची वाटच पाहत होते. कारण त्यांना तशी पूर्वसूचना मिळाली होती. "तुझा उत्तराधिकारी लवकरच तुला भेटेल " या वचनाप्रमाणे ते नित्य देवळात वाट पाहत असत. वासुदेवाने येऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि संन्यासाश्रम देण्याविषयी त्यांना विनंती केली. पुढे दोन-चार दिवस सोडून वासुदेवाला संन्यासाश्रम देऊन 'श्रीपूर्णप्रज्ञ' असे त्यांचे नामाभिधान घोषित केले.
अच्युतप्रेक्षस्वामी हे उत्तरादी मठ परंपरा चालवत होते. जरी हे द्वैतपरंपरेचे असले तरीही वरकरणी त्यांचे आचरण अद्वैतीच होते कारण त्या काळात अद्वैतवादाचा पगडा प्रचंड होता. म्हणून आपल्या मठ परंपरा पुढे चालवण्यासाठी त्यांना खंबीर अशी व्यक्ती हवी होती ती भगवंतांनी वासुदेवाच्या रुपाने त्यांच्यापर्यंत आणून पोचवली. श्री पूर्णप्रज्ञ यांनी उत्तरादि मठाचे सिद्धांत पूर्णपणे तावून-सुलाखून स्वच्छ करून जनतेसमोर प्रभावीपणे मांडले. हे मत म्हणजे "हरी सर्वोत्तम" भगवंत सर्वश्रेष्ठ असून संपूर्ण चराचर त्याचे अनुयायी आहेत.
पुढे श्री पूर्णप्रज्ञांनी बद्रिकाश्रमी जाऊन प्रत्यक्ष श्रीवेदव्यासांकडून शास्त्राचा अभ्यास केला. प्रत्यक्ष भगवानवेदव्यसांकडूनच त्यांनी शिक्षण घेतले असल्यामुळे वेदव्यासांना आपल्या ग्रंथातून काय सांगायचे आहे ते केवळ हेच जाणु शकले. त्यामुळे त्यांनी पुढे महाभारत तात्पर्य निर्णय, भागवत तात्पर्य निर्णय इत्यादी ग्रंथ लिहून त्यामध्ये श्रीवेदव्यासांचे म्हणणे, त्याचा अर्थ याचा निर्णयच देऊन ठेवला आहे. या तात्पर्य ग्रंथांमुळे महाभारत आणि भागवत हे विषय समजण्यास सोपे होतात, घटनांचा अर्थ लागतो. श्रीमद् आचार्यांनी अनेक रहस्ये उलगडून सांगितली आहेत. वेदव्यासांचे अनेक दुर्मिळ ग्रंथ श्रीमदाचार्यांनी प्रकाशात आणलेले आहेत.
श्रीमद् आचार्यांचा सिद्धांत हा द्वैत सिद्धांत आहे. येथे आत्मा आणि परमात्मा दोन्ही वेगळे म्हटले असून अंति मोक्ष झाल्यावर सुद्धा किंवा ऐक्य पावल्यानंतरसुद्धा किंवा परमात्म्याच्या उदरात शिरल्यावर सुद्धा जीवात्मा आणि परमात्मा एक होऊ शकत नाही. परमात्मा वेगळाच असतो आणि जीव वेगळाच राहतो. त्याकाळीसुद्धा जीवांमध्ये तारतम्य म्हणजे उच्चनीच भाव असतो. त्यानुसार त्यांची गती ठरते. या सिद्धांतासाठी सकल वेदशास्त्र आगम यांचे प्रमाण आहे पावलोपावली आचार्य हा भेद दाखवून देतात. दुर्भाग्य हे आहे की एवढा सुंदर सिद्धांत कर्नाटकाच्या बाहेर पोहोचलाच नाही. त्यामुळे या मताचा प्रसार कर्नाटक सोडून इतरत्र फारच क्वचित झालेला आहे. कदाचित भाषेची अडचण असावी किंवा पवित्रता राखण्यासाठी पंडितांनी इतर जणांना हे ज्ञान दिले नसावे. खरे काय ते भगवंतच जाणे. असो. परंतु नजीकच्या काळात हळूहळू जनतेला श्रीमध्वाचार्यांची माहिती होत आहे.
श्रीमदाचार्य यांचे संपूर्ण जीवन प्रखर संन्यासधर्म, संपूर्ण वैराग्य, अखंड ज्ञानोपदेश, हरी सर्वोत्तम मत प्रतिपादन आणि परमत खंडन स्वमताची स्थापना यातच व्यतीत झाले. 'हरी सर्वोत्तम वायूजीवोत्तम' हे मत त्यांनी अत्यंत यशस्वीरीत्या स्थापित केले. त्यांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या. ते अनेक भाषा जाणत होते. वायुदेवांचा अवतार म्हटल्यावर साहजिकच अत्यंत बलशाली होते. उत्तम कुस्तीवीर होते. संगीतज्ञ होते. ते त्रिकालज्ञानी होते. म्हणजे भूत भविष्य वर्तमान पूर्ण जाणत होते. आपले आराध्य दैवत श्रीमन्नारायणाचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी तीनदा बद्रिकाश्रम यात्रा केली. आसेतु हिमाचल भारतभर त्यांनी संचार केला. जागोजागी विद्वत सभा घेऊन वाद-विवाद करून पर्यंत खंडन करुन स्वमत स्थापित दिग्विजय केला.
आचार्यांचे अफाट ज्ञान पाहून अद्वैतपंथी पंडित श्री त्रिविक्रमपंडिताचार्य यांनी श्रीमध्वाचार्यांबरोबर पंधरा दिवस सलग वादविवाद करून शेवटी पराजय स्वीकारला. आचार्यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन त्यांनी आचार्यांकडून तप्त मुद्रा घेऊन वैष्णव पंथ दीक्षा स्वीकारून द्वैतमत अंगिकारले. श्रीमध्वाचार्यांनी अनेक जणांना संन्यासाश्रमही दिला आहे. त्यांचे प्रमुख चार शिष्य होते. ते म्हणजे श्रीपद्मनाभतीर्थ, श्रीमाधवतीर्थ, श्रीनरहरितीर्थ आणि श्रीअक्षोभ्यतीर्थ. याव्यतिरिक्तही त्यांनी आठ जणांना संन्यास देऊन आठ मठांची स्थापना केली. उडपी येथे श्रीकृष्णाची स्थापना करून या आठ मठांना क्रमाक्रमाने पूजा करण्यास पर्याय पद्धत आखून दिली. सर्व यतींना मध्वमताचा प्रसार करण्यास त्यांनी आदेश दिला. आजही तीच परंपरा चालू आहे. मूळ उत्तरादि पीठावर श्री. मध्वाचार्य यांच्यानंतर श्री पद्मनाभतीर्थ आले आणि परंपरा पुढे चालू राहिली. ऐंशी वर्ष मनुष्यदेहात राहून मध्वाचार्यांनी हरी सर्वोत्तमत्वाचाच प्रसार केला. त्यानंतर एक दिवस उडुपी मध्ये अनंतेश्वराच्या मंदिरात बसून आपल्या शिष्यांना ऐतरेय उपनिषदाचा पाठ सांगत असताना अचानक पुष्पवृष्टी झाली आणि त्या पुष्पवृष्टीच्या राशीमधून ते अदृश्य झाले. तेथून ते अदृश्य रुपाने बदरिकाश्रमास गेले असे हा संप्रदाय मानतो. ही त्यांच्या जीवनचरित्र याची थोडीशी ओळख.
आता त्यांनी मांडलेले द्वैतमत म्हणजे काय? त्यांचा काय सिद्धांत होता याची थोडक्यात ओळख करून घेऊ.
श्रीमद् आचार्यांनी आपला सिद्धांत खूप उत्तमरित्या स्थापित केला. हरी हा सर्वोत्तम असून बाकीचे सर्वकाही हे त्याचे अनुचर आहे. श्रीमद् आचार्यांनी भक्तिला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे. भगवंताचे ज्ञान हे भक्तीनेच होऊ शकते असे त्यांचे ठाम मत आहे. ज्ञानाशिवाय अपरोक्ष नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही. त्यामुळे भगवंताची श्रीहरीची भक्ती करा हे त्यांचे म्हणणे आहे.
श्री मध्वाचार्यांची मते :-
१. हरी सर्वोत्तम आहे
२. संपूर्ण जग त्याचे अनुचर आहे
३. जग सत्य आहे
४. पंचभेद आणि तारतम्याने हे जग भरलेले आहे.
५. मुक्ती मध्येही तारतम्य आहे
६. भक्तीच मुक्तीला मुख्य साधन आहे
७. स्वरुपस्थित आनंदाचा अनुभव म्हणजेच मुक्ती.
८. प्रमेयांच्या सिद्धीसाठी प्रत्यक्ष, अनुमान व आगम हे प्रमाण
९. भगवंत केवळ वेदांनी ज्ञेय असून समस्त वेद भगवंताला परममुख्य प्रवृत्तीने प्रतिपादन करतात.
मोक्ष मिळवण्यासाठी हरिभक्तिच आवश्यक आहे. कारण केवळ श्रीहरिच मोक्ष देऊ शकतो. अपरोक्ष ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि भक्ति विना ज्ञान नाही. जीवाचे अंतिम ध्येय मोक्ष असतो. म्हणून केवळ हरिभक्ति करा असे श्रीमदाचार्य घोष करुन सांगतात.
महान आचार्य, मतसंस्थापक अस्सीम विष्णुभक्त श्रीमन्मध्वाचार्यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनंतानंत नमस्कार.
प्रथमो हनुमान् नाम द्वितीयो भीम एवं च, पुर्णप्रज्ञ तृतियोस्तु भगवद्कार्यसाधकाः||