माघ पौर्णिमा: मंत्र म्हणा-उपाय करा, ३२ पट पुण्य मिळेल; कुंडलीतील ग्रह यशाच्या आड येणार नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:09 IST2025-02-11T14:04:38+5:302025-02-11T14:09:08+5:30
Magh Purnima 2025 Impactful Mantra And Upay In Marathi: माघ पौर्णिमेला लक्ष्मी नारायणासह चंद्र देवाच्या काही मंत्राचा यथाशक्ती जप करावा. काही उपाय करण्यासह ग्रहांचे पाठबळ मिळण्याची आवर्जून दान करावे, असे सांगितले जाते.

माघ पौर्णिमा: मंत्र म्हणा-उपाय करा, ३२ पट पुण्य मिळेल; कुंडलीतील ग्रह यशाच्या आड येणार नाहीत!
Magh Purnima 2025 Impactful Mantra And Upay In Marathi: धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण. या दिवशी गंगास्नानाला आणि विष्णू देवाच्या पूजेचे महत्त्व आहे. माघ स्नानाला शास्त्रात महत्त्व आहे. महिनाभर नदीत स्नान करावे असा नियम आहे. मात्र धकाधकीच्या जीवनात आणि आताच्या काळात सगळेच नियम पाळणे शक्य नसले तरी काही तिथी वार पाळून आपण नियमांची अंशतः अंमलबजावणी करू शकतो. ही पौर्णिमा फार महत्त्वाची आहे. माघ पौर्णिमेला अतिशय प्रभावी मंत्रांचा जप केल्याने, दान केल्याने, तसेच काही उपाय केल्याचा सर्वोत्तम लाभ, पुण्य मिळू शकते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
माघ महिन्याची पौर्णिमा मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी, १२ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी संपेल. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवारी, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा साजरी करावी, असे सांगितले जाते. पौर्णिमेला ज्यांना शक्य असेल त्यांनी नदीवर आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच सकाळी लवकर उठून स्नान करावे. शुचिर्भूत व्हावे. लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मी स्तोत्र म्हणावे. नामस्मरण करावे. यथाशक्ती गरजूंना दान-धर्म करावा. या तिथीवर केलेल्या दान धर्माचे पुण्य ३२ पट अधिक मिळते असे शास्त्रात म्हटले आहे. म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात.
या गोष्टी करा अन् पदरात पाडून घ्या भरघोस पुण्य
पौर्णिमेच्या दिवशी जशी लक्ष्मीची पूजा केली जाते तशी चंद्राची पूजा केली जाते. चंद्रोदय झाल्यावर त्याला तुपाचे निरांजन दाखवून फूल वाहावे आणि वाटीत दूध साखरेचा किंवा शक्य असल्यास तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा. चंद्राची शीतल छाया तुमच्या आयुष्यात पडून तुमचेही जीवन चंद्रासारखे सौम्य, शीतल आणि प्रकाशमान बनेल, असे म्हटले जाते. लक्ष्मी पूजा करतेवेळी कवड्यांची माळ देवीच्या पूजेत ठेवावी. पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती माळ लाल वस्त्रात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवावी. लक्ष्मीच्या कृपेने घरात धन, धान्य, संपत्ती यात बरकत होत राहील, अशीही मान्यता आहे. तसेच चंद्र हा शीतलतेचा आणि वैवाहिक सौख्याचा कारक आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचे जावे असे वाटत असेल तर पती पत्नीने मिळून माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गायीच्या दुधाचे चंद्राला अर्घ्य द्यावे. असे करण्यामुळे दांपत्य जीवन सुखाचे जाते, असे सांगितले जाते.
माघी पौर्णिमेला आवर्जून करा 'हे' उपाय!
माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी, विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते. फुले वाहून देवघर सुशोभित केले जाते. गंध, अक्षता वाहून स्तोत्रपठण केले जाते. या उपचारानंतर महत्त्वाचा असतो, तो म्हणजे दानधर्म! आपण देवाकडे नुसते मागून उपयोग नाही, यथाशक्ती दुसऱ्याला दान देण्याचीही आपली तयारी असली पाहिजे. अशा वेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या.
- पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून सात धान्य दान केल्यास रवी दोष कमी होतो.
- साखर आणि तांदूळ यांचे दान चंद्र दोषासाठी चांगले असते.
- मंगल दोष निवारणासाठी हरभरा डाळ आणि गूळ दान केला जातो.
- बुध ग्रहाच्या दोषमुक्तीसाठीकेळी, करवंद आणि नारळाच्या तेलाचे दान शुभ ठरते.
- गुरू ग्रहाच्या अनुकूलतेसाठी गूळ, तूप किंवा पुस्तके गरजू मुलांना दान करावीत.
- शुक्रासाठी लोणी, पांढरे तीळ किंवा तीळ वडीचे दान करता येईल.
- शनिदेवासाठी काळे तीळ, तिळाचे तेल, लोखंडाचे भांडे आणि काळे वस्त्र दान करावे.
- राहूसाठी बूट-चप्पल, अन्न, वस्त्र गरजूंना दान करावे.
- केतूला प्रसन्न करण्यासाठी टोपी, घोंगडी दान करणे, दिव्यांगांना मदत करणे शुभ मानले जाते.
हे सगळे उपाय तुम्ही देखील सहज करू शकता. स्वछ मन, शुद्ध आचरण ठेवा, जेणेकरून तुमची ग्रहस्थिती बदलेल, मनस्थिती बदलेले आणि पर्यायी परिस्थितीही बदलू शकेल, असे सांगितले जाते.
कोणत्या प्रभावी मंत्रांचा जप अतिशय शुभ ठरू शकेल?
माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाचे सर्व दु:ख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. या दिवशी संकटांपासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मी-नारायणाच्या अनेक खास मंत्रांचा जप करणे लाभदायक मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे साधकावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा राहते. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांचा जप अवश्य करावा.
श्रीविष्णूंचे मंत्र
- ॐ नमो भगवते वासुदेवाय
- श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय।।
- ॐ विष्णवे नमः
- ॐ हूं विष्णवे नमः
- ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नोः विष्णुः प्रचोदयात्
लक्ष्मी देवीचे मंत्र
- ॐ श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद
- ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः
- ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं सिद्ध लक्ष्म्यै नमः
- ॐ लक्ष्मी नारायण नमः
- ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्
चंद्र देवाचे मंत्र
- ॐ श्रीं श्रीं चन्द्रमसे नमः
- ॐ श्रां श्रीं श्रौं चन्द्रमसे नमः
- ॐ चं चंद्रमस्यै नमः
- दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव सम्भवम।
नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ।।
- ॐ भूर्भुव: स्व: अमृतांगाय विद्महे कलारूपाय धीमहि तन्नो सोमो प्रचोदयात्।
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.