माघ पौर्णिमा: श्रीविष्णूंच्या पूजेचे महत्त्व, कसे करावे व्रत? पाहा, महत्त्व, मान्यता अन् कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:29 IST2025-02-11T13:25:15+5:302025-02-11T13:29:58+5:30

Magh Purnima 2025: महाकुंभमेळ्यामुळे यंदाच्या वर्षी माघ पौर्णिमेचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

magh purnima 2025 know about date time and vrat puja vidhi and importance of worshiping lord vishnu in marathi | माघ पौर्णिमा: श्रीविष्णूंच्या पूजेचे महत्त्व, कसे करावे व्रत? पाहा, महत्त्व, मान्यता अन् कथा

माघ पौर्णिमा: श्रीविष्णूंच्या पूजेचे महत्त्व, कसे करावे व्रत? पाहा, महत्त्व, मान्यता अन् कथा

Magh Purnima 2025: धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भीष्मद्वादशी असे सण येतात. माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण. या दिवशी गंगास्नानाला आणि विष्णू देवाच्या पूजेचे महत्त्व आहे. भूतलावरील पापे गंगास्नानाने धुतली जातात, अशी मान्यता आहे. माघ पौर्णिमेला पूजा विधी कसा करावा? काही महत्त्व, मान्यता जाणून घेऊया...

माघ महिन्याची पौर्णिमा मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी, १२ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी संपेल. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवारी, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा साजरी करावी, असे सांगितले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाचे सर्व दु:ख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. १४४ वर्षांनी आलेला महाकुंभमेळा सुरू आहे. माघ पौर्णिमेला शाही स्नान होणार असून, ते अतिशय पुण्य फलदायी मानले जाते. 

माघ पौर्णिमेचा पूजा विधी कसा करावा?

माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. नदीला देवी मानण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्यामुळे तिचे नमन करावे. तिला धूप-दीप-नैवेद्य अर्पण करावा. सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर विष्णू देवतेच्या पूजेचा संकल्प सोडावा. षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म पाळून पूजन करावे. दुपारी अन्नदान करावे. या दिवशी लाल तीळ दान करण्याला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्यामुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते, अशी मान्यता आहे.

माघ पौर्णिमा व्रत कथा

स्कंधपुराणातील रेवाखंडात माघ पौर्णिमेचे महत्त्व सांगणारी एक कथा आढळते. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात शुभव्रत नामक ब्राह्मण निवास करत होता. त्यांना वेदांचे उत्तम ज्ञान होते. मात्र, पूजा विधी करण्यात त्यांचे मन रमेना. पैसा कमवण्यात ते नेहमी व्यस्त असत. मात्र, वृद्धावस्थेत पूजा विधी कर्म केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे, यासाठी ते नियमितपणे पूजा-विधी करू लागले. ‘माघे निमग्‍ना: सलिले सुशीते विमुक्‍तपापास्त्रिदिवं प्रयान्ति।।’ या श्लोकाचा त्यांनी जप सुरू केला. सलग नऊ दिवस या श्लोकाचा जप करून नर्मदा नदीत स्नान केले. यानंतर दहाव्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. पैसे कमवण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला. मात्र, माघ महिन्यातील नऊ दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे त्यांना पापातून मुक्ती मिळाली, अशी कथा आहे.

दरम्यान, माघ पौर्णिमेसंबंधी रामायणातही एक कथा आढळून येते. राणी कैकयी यांनी श्रीरामांना वनवासात पाठवल्याचे कळताच पुत्र भरत मातेकडे आला आणि तिच्यावर क्रोधीत झाला. या रागाच्या भरात भरताने कैकयीला, तुझी सर्व पुण्य कर्मे नष्ट होतील. माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही, असा शाप दिला, अशी एक कथा सांगितली जाते.
 

Web Title: magh purnima 2025 know about date time and vrat puja vidhi and importance of worshiping lord vishnu in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.