Maghi Ganesh Jayanti 2022: तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणताना ‘या’ चुका करत नाही ना? पाहा, १० महत्त्वाचे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:16 PM2022-02-03T14:16:46+5:302022-02-03T14:17:54+5:30
Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती अथर्वशीर्ष म्हणताना नेमक्या कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे, शास्त्र काय सांगते? जाणून घ्या...
अबालवृद्धांपासून सर्वांचाच अगदी लाडका असलेल्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. सन २०२२ मध्ये ४ फेब्रुवारी रोजी माघी श्रीगणेश जयंती आहे.
पौराणिक मान्यतानुसार माघ मासातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचे पुत्र गणेश प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. गणेशाचे नामस्मरण, आराधना, जप, उपासना करण्यासाठी चतुर्थी ही तिथी उत्तम मानली गेली आहे. गणपती बाप्पाचे अनेकविध मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरत्या प्रचलित आहेत. काही घरांमध्ये नियमितपणे त्याचे पठणही केले जाते. मात्र, यामध्ये सर्वांत वरचा क्रमांक लागतो, ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष.
गणपती अथर्वशीर्ष महत्त्व
अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.
गणपती अथर्वशीर्ष पठणाचे नियम
- उच्चार अगदी स्पष्ट असावे.
- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.
- एकापेक्षा अधिक वेळा अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.
- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.
- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
- अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
- अथर्वशीर्षाचा पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
- अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.
- दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
- अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.
- अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.
- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.