Maghi Ganeshotsav 2021 :देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला आला, म्हणून 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 10, 2021 01:42 PM2021-02-10T13:42:23+5:302021-02-10T13:43:55+5:30

Maghi Ganeshotsav 2021 :देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला, म्हणून बालकाचे नाव 'महोत्कट' ठेवण्यात आले.

Maghi Ganeshotsav 2021 :Born out of the passionate spirit of the gods, hence ‘Mahotkat’; Read the birth story of Maghi Ganeshotsav! | Maghi Ganeshotsav 2021 :देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला आला, म्हणून 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

Maghi Ganeshotsav 2021 :देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला आला, म्हणून 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

googlenewsNext

फार पूर्वी भाद्रपदातील चतुर्थीपेक्षाही माघ शुक्ल चतुर्थीला जास्त महत्त्व होते. कारण भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन केले जाते, तर माघी चतुर्थीला गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. परंतु लोकमान्य टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यापासून भाद्रपद चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तसे असले, तरी आजही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. जाणून घेऊया, या उत्सवाची जन्मकथा!

अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुविद्य आणि सुशिल पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, परंतु संतानप्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांनी देवाची करुणा भाकली. नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून दोन पूत्रांचे दान दिले़  जुळ्या मुलांचे नामकरण झाले, देवांतक आणि नरांतक. 

ही मुले मोठी होऊ लागली. महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकित वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, 'तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील. परंतु, त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये, अन्यथा त्यांचा विनाश होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी, म्हणून देवाधिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा.'

त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झालेत पाहून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, 'आम्हाला अमरत्व द्या.' भगवान म्हणाले, 'मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्त्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल, तर मागा.' मुले हुशाह होती. ती म्हणाली, 'देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रैलोक्यीचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे.' लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तू म्हणाले आणि अंतर्धान पावले.

महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत्त झाली. सत्शील दांपत्याच्या उदरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली, याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले. तोवर या बालकांनी समविचारी, पराक्रमी, दुष्ट वृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकावर अतिक्रमण केले. त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले. परंतु, या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव, समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण केले. त्यानेच आपल्या चतुर बुद्धीने यातून मार्ग काढावा, अशी प्रार्थना केली. 

देवांतक आणि नरांतकाला देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शीर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी, देवमाता अदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला. सगळे जण सुखावले.

महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवनपालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली. अदिती माता गर्भवती राहिली. नवमास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्दशीला दुपारच्या वेळी अदिती मातेच्या उदरी जन्म घेतला. सर्व देवांनी गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेषांतर करून बाळाला न्हाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला न्हाऊ घातले. बाळलेणी घातली. दुपट्यात गुंडाळून पाळण्यात घातले. सर्वांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा पार पडला.

देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला, म्हणून बालकाचे नाव 'महोत्कट' ठेवण्यात आले. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती, आयुधे यांचे वरदान महोत्कटाला आशीर्वादस्वरूपात दिले. कालांतराने याच महोत्कटाने देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रैलोक्याला भयमुक्त केले.

महोत्कट भगवान की जय! मंगल मूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया!

Web Title: Maghi Ganeshotsav 2021 :Born out of the passionate spirit of the gods, hence ‘Mahotkat’; Read the birth story of Maghi Ganeshotsav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.