माघी श्रीगणेश जन्मोत्सव: गणेश चतुर्थी अन् गणेश जयंती यात फरक काय? पुराण कथा दूर करेल संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:20 IST2025-01-29T15:17:23+5:302025-01-29T15:20:30+5:30
Maghi Ganesh Jayanti 2025 Marathi: गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे. पुराणात काय उल्लेख आढळून येतात? जाणून घ्या...

माघी श्रीगणेश जन्मोत्सव: गणेश चतुर्थी अन् गणेश जयंती यात फरक काय? पुराण कथा दूर करेल संभ्रम
Maghi Ganesh Jayanti 2025: सन २०२५ सुरू झाले आहे. हे वर्ष विशेष आणि महत्त्वाचे मानले जात आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात मंगळवारी होत आहे. याच दिवशी माघ शुद्ध चतुर्थी आहे. मराठी वर्षातील माघ महिना अनेकार्थाने शुभ मानला जातो. माघ महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती असते. कधी आहे गणेश जयंती? गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी यात फरक काय आहे? जाणून घेऊया...
०१ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीगणेश जयंती आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. परंतु, माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्रीगणेश जयंती, गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनाही ओळखले जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत. जसे की, युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे, असे म्हटले जाते. या दिवशी आवर्जून गणपती अथर्वशीर्ष, श्री संकष्टनाशन गणपतिस्तोत्राचे पठण करावे, असे सांगितले जाते. (Maghi Shree Ganesh Jayanti 2025 Marathi)
गणेश चतुर्थी अन् गणेश जयंती यात फरक काय? पुराण कथा दूर करेल संभ्रम
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. तसेच माघ शुद्ध चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी करण्यात येते. हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रासह भारतातील अन्य राज्यांमध्ये उत्साहाने साजरे करण्यात येतात. परंतु, या दोन्ही चतुर्थींमध्ये फरक आहे. या संदर्भात विष्णुपुराण आणि गणेश पुराणात कथा सांगितलेली आहे. गणेश पुराण हे गाणपत्य सांप्रदायातील महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना, व्यासांनी भृगू ऋषीला आणि भृगू ऋषींनी सोमकांत राजाला सांगितली. उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे दोन विभाग आहेत. गणेश पुराणामध्ये गणपतीसंदर्भातील अनेक कथा सांगितलेल्या आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे. काहीजण या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानतात. परंतु, गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नाही. या चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हणतात.
श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत
श्रीगणेश कोशानुसार, गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे व्रत आहे. श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदी किनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती एका नदीतच विसर्जन करावी, असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. ही पार्थिव गणेश पूजा दिवस म्हणजे आपण आज साजरी करत असणारी गणेश चतुर्थी होय. या चतुर्थीला गणपतीची षोडषोपचारांनी पूजा करायची असते.
माघी गणेश जयंती का साजरी केली जाते?
माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘ तिलकुंद चतुर्थी ‘ असेही म्हणतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थी प्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते. गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे खरेतर व्रत आहे.
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.