जादूगाराने केली कमाल, राजाचा मुकुट झाला गहाळ; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:18 PM2021-04-12T13:18:11+5:302021-04-12T13:18:52+5:30

शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.

The magician did the magic, the king's crown was missing; Read this parable! | जादूगाराने केली कमाल, राजाचा मुकुट झाला गहाळ; वाचा ही बोधकथा!

जादूगाराने केली कमाल, राजाचा मुकुट झाला गहाळ; वाचा ही बोधकथा!

Next

आपल्या सगळ्यांना वाईट सवय असते. आपण एकतर भूतकाळात जगतो नाहीतर भविष्यकाळाच्या काळजीत! परंतु, या दोन्ही काळातल्या गोष्टी आपल्या हातात नसतात. एक घडून गेलेली असते, दुसरी घडणार असते. त्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर `आज'च्या दिवसाचा मनमुराद आनंद घेणे. एका जादूगारानेही तसेच केले आणि भविष्यातले संकट कसे घालवले, त्याची ही गोष्ट!

एका जादूगाराचा लौकिक ऐकून एका देशीचा राजा त्या जादूगाराला बोलावून घेतो. जादूगार विचार करतो, राजाने स्वत:हून बोलावून घेतले आहे, म्हणजे राजा खुश झाला, तर मोठे इनाम आपल्याला देईल. म्हणून आपल्या आजवरच्या कारकिर्दीतली कोणती सगळ्यात प्रभावी जादू करून दाखवू? या विचारात त्याचे दोन दिवस गेले. 

राजाने बोलावणे पाठवले, तो दिवस उगवला. राजाचा दरबार भरला होता. जादू बघायला सगळेच उत्सुक होते. अगदी राजाही! जादुगाराने अत्यंत कुशलतेने जादू दाखवायला सुरुवात केली. उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या आणि सर्वात शेवटची जादू त्याने केली. त्या जादूनुसार भर दरबारात राजाचा मुकुट जादूगाराने गायब केला. ते पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. राजाला ते अपमानास्पद वाटले. जादूगाराला हे प्रकरण अंगाशी आले. राजाने त्याला इनाम तर दूरच, पण फाशीची शिक्षा सुनावली. दोन दिवसांनी त्याला फाशी देण्यात येणार होती. 

जादूगाराने, त्याच्या बायकोने राजाकडे गयावया केली. पण उपयोग झाला नाही. जादूगार मरणाला सामोरा जाण्यासाठी सिद्ध झाला. फाशीच्या दिवशी राजा स्वत: घोड्यावर स्वार होऊन हजर झाला. जादूगार म्हणाला, `राजा, तुमचा अपमान करण्याचा माझा मानस नव्हता. तरीदेखील मी शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु माझी कला पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात होती. ती जर पूर्ण झाली असती, तर तुम्ही विराजमान झालेल्या घोड्याला पंख फुटून तुम्हालाही त्याच्यावर स्वार होऊन उडता आले असते. परंतु त्याला वर्ष लागले असते. जाऊदे, तुम्ही मला शिक्षा द्याच!'

राजाने विचार केला, एका कलाकाराला एवढी मोठी शिक्षा देणे योग्य नाही. शिवाय तो म्हणाला तसे उद्या घडले, तर इतर राजांमध्ये माझा लौकिक वाढेल. म्हणून त्याने जादूगाराला अभय दिले. जादूगार आनंदाने परत आला. त्याची बायको म्हणाली, `राजाला कशाला असा शब्द देऊन आलात? उद्या तुम्हाला जादू नाही दाखवता आली तर काय कराल?'

जादूगार म्हणाला, उद्याचे उद्या पाहू. त्या निमित्ताने मला ३६५ दिवस जगण्याची संधी मिळाली. उद्याची खात्री कोणाला आहे? मृत्यू आपल्या हातात नाही, आपण आनंदाने जगण्यावर भर देऊ.'

जादूगार म्हणाला तसेच घडले. राजाला तापाचे किरकोळ कारण झाले आणि राजाचा मृत्यू झाला. आपल्या मालकाच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या घोड्याचाही मृत्यू झाला. राजा गेला आणि घोडाही गेला. पण जादूगार बचावला. जादूगाराने तेव्हाच हातपाय गाळले असते, हार मानली असती, तर तो राजाच्या आधीच मेला असता. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.

Web Title: The magician did the magic, the king's crown was missing; Read this parable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.