२०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:27 IST2025-01-13T12:26:29+5:302025-01-13T12:27:12+5:30
Maha Kumbh Mela 2025: २०२५चा महाकुंभमेळा अत्यंत पवित्र मानला जात आहे. असा योग आता पु्न्हा शेकडो वर्षांनी जुळून येणार आहे. महाकुंभमेळ्यातून नेमके काय घेऊन यावे? जाणून घ्या...

२०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा!
Maha Kumbh Mela 2025: २०२५ हे वर्ष अनेकार्थाने अनन्य साधारण महत्त्व असणारे ठरणार आहे. आताच्या काळातील पीढी अतिशय भाग्यवान ठरणार आहे, कारण महाकुंभमेळाचे आयोजन केले जात आहे. महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भाग्य, नशीब प्रबळ असावे लागते, असे सांगितले जाते. या महाकुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक, पर्यटक येतात. यंदाच्या महाकुंभमेळ्याला सुमारे ३० ते ३५ कोटी लोक येतील, असा दावा केला जात आहे. एरव्ही कधीही कुठेही न दिसणारे, हिमालयात जीवन व्यतीत करणारे साधु-संत, महंत आवर्जून या महाकुंभमेळ्याला हजेरी लावतात. महाकुंभमेळ्यात गंगा स्नान करणे परम पवित्र मानले जाते. याचाच लाभ घेण्यासाठी कोट्यवधी साधु-संत येथे येतात. महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याचे भाग्य तुमच्या नशिबी असेल, तर न विसरता केवळ या पाच गोष्टी तेथून घेऊन या आणि अनंत कृपेचे धनी व्हा, असे सांगितले जाते. १३ जानेवारी २०२५ पासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु होणार आहे आणि २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री) पर्यंत चालणार आहे.
कुंभमेळ्याचे तीन प्रकार आहेत. अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. अर्धकुंभ फक्त प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच होतो. १२ वर्षातून एकदा पूर्ण कुंभमेळा आयोजित केला जातो. प्रयागराजमधील संगम तीरावर या मेळ्याचे आयोजन केले जाते. २०१३ मध्ये येथे पूर्णकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. या वर्षी होणारा कुंभ म्हणजे महाकुंभ. प्रयागराजमध्ये १२ वेळा पूर्ण कुंभ होतो, तेव्हा त्याला महाकुंभ म्हणतात. १२ पूर्णकुंभांमध्ये एकदाच महाकुंभ होतो. तर १४४ वर्षातून एकदा महाकुंभ आयोजित केला जातो. कुंभमेळ्याचे ठिकाण सूर्य, चंद्र आणि गुरूची स्थिती पाहून ठरवले जाते. जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि गुरु वृषभ राशीत असतो, तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तसेच सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत असताना हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. सूर्य सिंह राशीत असतो आणि गुरु सुद्धा सिंह राशीत असतो तेव्हा कुंभमेळा उज्जैन येथे आयोजित केला जातो आणि सूर्य सिंह राशीत आणि गुरु सिंह राशीत किंवा कर्क राशीत असताना नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
महाकुंभमेळा अनुभवल्यानंतर आवर्जून नेमक्या कोणत्या गोष्टी आणाव्यात?
यंदाच्या महाकुंभात साडेपाच कोटी रुद्राक्षांपासून १२ ज्योतिर्लिंगांचे स्वरूप तयार केले जात आहे. महाकुंभमध्ये साडेपाच कोटी रुद्राक्षापासून १२ ज्योतिर्लिंगांचे स्वरूप तयार केले जात आहे. डमरूसह ११ हजार त्रिशूळही ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. असे मानले जाते की, शाही स्नान करून दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. साधकाला इच्छित फळे मिळू शकतात. महाकुंभमेळ्याला जात असाल, तर तिथून काही खास वस्तू घरी आणल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येऊ शकते, असे सांगितले जाते.
- संगमाचे पवित्र जल: महाकुंभमेळ्यातून त्रिवेणी संगमाचे पवित्र जल घरी आणणे खूप शुभ मानले जाते. हे जल आणून घरातील पूजा स्थानी ठेवा. याने घरातून नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मकता येऊ शकते. घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते, अशी मान्यता आहे.
- संगमावरील पवित्र माती: त्रिवेणी संगमातील माती महाकुंभमेळ्यातून घरी आणावी. ही पवित्र माती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा पूजा स्थानी ठेवावी. घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन घरात शांतता नांदू शकते, असे म्हटले जाते.
- तुळशीचे रोपटे: महाकुंभमेळ्यातून तुळशीचे रोप घरी आणणे खूप शुभ मानले जाते. हे रोप घरी आणल्यानंतर, त्याला नियमितपणे जल अर्पण करा. तिन्हीसांजेला त्या तुळशीसमोर दिवा लावा. तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांतता आणि समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच, कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही, असे सांगितले जाते.
- पूजेची फुले आणि प्रसाद: महाकुंभमेळ्यातून घरी येताना पूजेत वापरलेली फुले आणि नैवेद्य म्हणून दाखवलेला प्रसाद घरी घेऊन यावा. तो सर्वांनी मनोभावे ग्रहण करावा. आणलेल्या फुलांचा योग्य मान राखला जाईल, असे पाहावे. यामुळे सुख-शांतता, समृद्धी लाभून दु:ख, समस्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो, असे सांगितले जाते.
- पवित्र भस्म, विभूती: महाकुंभमेळ्यातून आणलेली पवित्र विभूती घरी आणावी आणि न चुकता त्याचा एक तिलक भाळी लावावा. असे केल्याने वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर होते. भस्म किंवा विभूती पूजास्थळी ठेवा. घरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहू शकेल. भगवान शिवाचा भरपूर आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल.
- महाकुंभमेळ्यातून शिवलिंग, पारस किंवा शुभ वस्त्र आणणे खूप फायदेशीर मानले जाते. या वस्तू घरी आणून पूजास्थळी ठेवल्याने जीवनात समृद्धी येते आणि आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
महाकुंभातील शाही स्नान
पहिले स्नान - पौष पौर्णिमा हे पहिले शाही स्नान असेल ज्यात १३ जानेवारी रोजी महाकुंभ सुरू होईल.
दुसरे शाही स्नान - दुसरे शाही स्नान मकर संक्रांती म्हणजेच १४ जानेवारी रोजी होणार आहे.
तिसरे शाही स्नान - तिसरे शाही स्नान २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला होणार आहे.
चौथा शाही स्नान – चौथे शाही स्नान वसंत पंचमीला म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी होईल.
पाचवे शाही स्नान- पाचवे शाही स्नान १२ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला होणार आहे.
सहावे शाही स्नान - सहावे शाही स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आणि महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.