Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीला अशा पद्धतीनं अर्पण करा बेलपत्र, जाणून घ्या बेल तोडण्याची योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 01:09 PM2022-02-18T13:09:43+5:302022-02-18T13:10:47+5:30
Maha Shivratri 2022: महाशिवरात्री संपूर्ण देशभर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांमध्ये संपूर्ण वर्षभर महाशिवरात्रीची उत्सुकता लागून राहिलेली असते.
Maha Shivratri 2022: महाशिवरात्री संपूर्ण देशभर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांमध्ये संपूर्ण वर्षभर महाशिवरात्रीची उत्सुकता लागून राहिलेली असते. महाशिवरात्रीला भगवान शंकराची मोठ्या श्रद्धेनं पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्र मंगळवारी १ मार्च २०२२ रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्री दिवशी भगवान भोलेनाथांचा माता पार्वतीसोबत विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत करुन भगवान शंकराला प्रसन्न केलं जाण्याची परंपरा आणि श्रद्धा आहे. बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे. शास्त्रात फुलं किंवा कोणतीही पानं तोडण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. यातच भगवान शंकराला वाहण्यात येणारे बेलपत्र तोडण्याचे आणि ते अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत सांगण्यात आली आहे.
बेलपत्र तोडण्याचे नियम
१. शास्त्रानुसार चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुदर्शी आणि अमावस्या तिथी, संक्रांतीच्या वेळी तसंच सोमवारी बेलपत्र कधीच तोडू नये.
२. भगवान शंकराला बेल अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे वरील तिथी किंवा दिवशी बेलपत्र तोडू नये असं शास्त्रात नमूद आहे.
३. बेलपत्राबाबत शास्त्रात नमूद असलेल्या माहितीनुसार जर नवं बेलपत्र मिळत नसेल तर दुसऱ्यानं वाहिलेलं बेलपत्र धुवून ते पूजेत भगवान शंकराला अर्पण केलं तरी चालतं.
४. बेलपत्र नेहमी संध्याकाळ झाल्यानंतर तोडावे.
५. बेलपत्र नेहमी फांदीपासून एक एक करुन तोडावं. एकत्र कधीच तोडू नये. संपूर्ण फांदीला नुकसान होईल अशापद्धतीनं बेल तोडू नये.
६. बेलपत्र तोडण्यापूर्वी मनात भगवान शंकराला प्रणाम करावा.
बेलपत्र कसं अर्पण करायचं?
१. भगवान शंकराला बेलपत्र नेहमी उलट वाहायचं असतं. बेलाच्या पानाचा जो तुकतुकीत भाग आहे तो आतल्या बाजूस म्हणजेच शिवलिंगाच्या बाजूस असायला हवी.
२. तुम्ही जे बेलपत्र अर्पण करत आहात त्यात वज्र आणि चक्र असता कामा नये.
३. भगवान शंकराला अर्पण केले जाणारे बेलपत्र ३ ते ११ पानांचे असायला हवे. यात जितकी जास्त पानं अर्पण केली जातात तितकं अधिक लाभदायी ठरतं असं म्हटलं जातं.
४. बेलपत्र न मिळाल्यास बेलाच्या वृक्षाला नमन करुनही भगवान शंकराला हात जोडून नमस्कार करावा.
५. बेलपत्रावर भगवान शंकराचं नाव लिहून अर्पण केलं तर उत्तम.
(वरील सर्व माहिती धार्मिक आस्था आणि समाजमान्यतांवर आधारित आहे. यात कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही. सामान्य व्यक्तींची अभिरुची लक्षात घेऊन वरील माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.)