Maha Shivratri 2023: महाशिवरात्रीला शनी प्रदोषाची जोड, योग्य प्रकारे व्रताचरण केल्यास पूर्ण होणार मनोकामना!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:39 PM2023-02-02T17:39:19+5:302023-02-02T17:40:21+5:30
Maha Shivratri 2023: यंदा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे आणि त्याच तिथीला शनी प्रदोष येत आहे, शिव आणि शनी कृपाप्राप्तीसाठी जाणून घ्या उपाय.
दरवर्षी माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. दर महिन्यातील त्रयोदशी तिथी ही प्रदोष व्रतासाठीदेखील ओळखली जाते. ती ज्या वारी येते त्या वारानुसार प्रदोष व्रत ठरते. यावेळी ती शनिवारी आल्याने शनी प्रदोष असणार आहे आणि तीच तिथी महाशिवरात्रीचीदेखील आहे. या दुर्मिळ योगाच्या निमित्ताने जी व्यक्ती प्रदोष व्रताचे पालन करेल आणि महाशिवरात्रीचा उपास करेल तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.
महाशिवरात्रीला घडणारा अद्भुत योगायोग :
यंदाच्या वर्षी माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ०८ वाजून ०३ मिनिटांनी सुरु होत आहे. तर, माघ वद्य चतुर्दशी समाप्ती १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ०४ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. या दिवशी अनेक प्रकारचे दुर्मिळ तसेच अद्भूत शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. एक म्हणजे शनी प्रदोष आणि दुसरा म्हणजे सर्वार्थसिद्धी योग! साडेसातीच्या जातकांसाठी शनी प्रदोष आणि धनलाभ होण्याच्या दृष्टीने भाविकांसाठी सर्वार्थसिद्धी योग विशेष फलदायी ठरेल.
महाशिवरात्री आणि प्रदोष व्रतासाठी शुभ मुहूर्त:
सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, या काळाच निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशीथकालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे, असे सांगितले जाते. शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशीथकाल सर्वांत प्रभावी मानला जातो. सन २०२३ मध्ये शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी उत्तररात्रौ १२ वाजून २७ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ ०१ वाजून १७ मिनिटांपर्यंत निशीथकाल असणार आहे. या काळात केलेली पूजा प्रभावी ठरते.
महाशिवरात्रीची पूजा पद्धती :
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करावा. ज्यामध्ये दूध, दही, मध, तूप, साखर यांचा समावेश होतो. यानंतर शिवलिंगावर पांढर्या चंदनाची गंध लावून मध्यभागी कुंकवाचे बोट लावावे. त्यानंतर बेलपत्र, भांग, धतुरा, जायफळ, ऊस, सुपारी इत्यादी पत्री भगवान शिवाला अर्पण करावी. पूजा मांडून झाल्यावर महादेवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
या मंत्रांचा जप करा:
महामृत्युंजय मंत्र
ऊँ हौं जूं स: ऊँ भुर्भव: स्व: ऊँ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ऊँ भुव: भू: स्व: ऊँ स: जूं हौं ऊँ।।
महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात यश प्राप्त होते.
भगवान शिवाचा मूळ मंत्र
ओम नमः शिवाय. हा भगवान शिवाचा मूळ मंत्र आहे. जर तुम्ही फक्त या मंत्राचा जप केला तर तुमच्या आयुष्यात कधीही कोणतीही समस्या येत नाही आणि नकारात्मकता दूर राहते.