Maha Shivratri 2024: महाशिवरात्रीला शास्त्रशुद्ध पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:40 PM2024-03-08T13:40:07+5:302024-03-08T13:41:39+5:30
Maha Shivratri 2024: शिवरात्र दर महिन्यात येत असली तरी माघातील शिवरात्र महा शिवरात्र म्हणून ओळखली जाते, ती कशी साजरी करायची ते पहा!
माघ मासात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला `महाशिवरात्री' म्हटले जाते. ही शिवरात्र त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या अशी तिन्ही तिथींना स्पर्श करत असेल, तर अत्युत्तम मानली जाते. यंदा ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे.
हे व्रत आबालवृद्ध सगळ्यांनी करावे. या दिवशी उपास करून भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. नंतर हातात पाणी घेऊन `शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते। असा संकल्प करावा.
ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जत नसेल त्यांनी `हे जगत्पतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याचे चांगले फळ मला मिळो' असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्पाचे अघ्र्य देऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे.
संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन त्या ऋतुधील सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी.
शंकर ही देवता सर्वप्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. शंकर हा महायोगी, तरीही नाचण्यागाण्यात रमणारा, अतुल पराक्रमी असूनही त्यागी आणि विरागी वृत्तीचा आहे. तो स्मशानात राहतो. तो रुद्र आहे. उग्र आहे, तरीही मुनिजन सुखकारी आहे. तो भोळा आहे. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारा आहे. तो भक्तांची इच्छा पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे.