Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे निर्गुण रूप, तर सगुण रूप कसे? समर्थांचे कवन वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:43 IST2025-02-26T11:43:12+5:302025-02-26T11:43:50+5:30
Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे प्रतीक तर शिवाचे सगुण रूप अक्राळ विक्राळ आहे, ते शब्दबद्ध केले आहे समर्थ रामदासांनी शंकराच्या आरतीत; वाचा भावार्थ!

Maha Shivratri 2025: शिवलिंग हे महादेवाचे निर्गुण रूप, तर सगुण रूप कसे? समर्थांचे कवन वाचा!
समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या अनेक आरत्यांपैकी एक आरती, शिवशंकराची. आपल्या नेहमीच्या म्हणण्यात असलेली आरती. मराठीत असूनही ती समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? तशी कधी वेळ आली नसेल किंवा गरजही पडली नसेल, असे म्हणूया. परंतु, अर्थ जाणून घेत आरती म्हटली, तर शाब्दिक चूका होणार नाहीच, शिवाय समजून उमजून आर्ततेने घातलेली साद भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचेल. आज महाशिवरात्री (Maha Shivratri 2025) निमित्त ही आर्त साद घालूया.
समर्थ रामदास स्वामींचे मराठी भाषेवर अतिशय प्रेम. शब्दलालित्य शिकावे तर त्यांच्याकडून. शब्दांमध्ये प्राण फुंकण्याचे कसब, सामथ्र्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या स्वभावातला सडेतोडपणा, कणखरपणा त्यांच्या साहित्यातूनही दिसून येतो. काव्यरचना करताना ते विशिष्ट शब्दांची जोड देऊन नादमाधुर्य निर्माण करतात. आता हनुमंताची आरती बघा ना, 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करी डळमळ भुमंडळ सिंधुजळ गगनी' या शब्दांचा नाद डोळ्यासमोर शब्द चित्र उभे करतो. तसेच संबंधित देवतेच्या कर्तृत्त्वाच्या भव्यतेचे दर्शन घडवतो. शिवशंकराच्या आरतीतूनही समुद्रमंथनाच्या वेळी शिवशंकरांनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळे शंकराचे अधोरेखित झालेले महत्त्व समर्थांनी शब्दबद्ध केले आहे.
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठकाळ त्रिनेत्री ज्वाळा,
लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा।।
जय देव जय देव, जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा।।
समुद्रमंथनातून हलाहल निघाले, तेव्हा ब्रह्मांड लवथवले, म्हणजेच हलून गेले. केवळ एक ब्रह्मांड नाही, तर ब्रह्मांडांची शृंखला, माळा हादरून गेल्या. ते हलाहल पिण्याची शिवशंकरांनी तयारी दर्शवली आणि ते प्राशन केल्यामुळे जणू काही त्यांच्या देहातून, डोळ्यातून दाह निघू लागला. तो शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या जटांमध्ये बाळा म्हणजे गंगा धारण केली तिच्यातून झुळूझुळू निघणाऱ्या पाण्यामुळे शंकरांवर अभिषेक होऊ लागला. अशा कापूराप्रमाणे शुभ्र कांती गौर वर्ण असलेल्या शिवशंकरा तुझी आरती ओवाळतो.
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा,
विभुतीचे उधळण, शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा।।
कर्पुरगौरा शब्दाची समर्थांनी द्विरुक्ती केली आहे. आधीच्या कडव्यात या शब्दाचा संदर्भ गौरवर्ण असून हलाहल प्राशन करून निळा ठिक्कर पडलेला, अशा दृष्टीने आहे, तर या कडव्यात हिमकन्या पार्वतीला शोभून दिसेल, असा त्याचा कर्पुरगौर वर्ण आहे, असे कौतुकाने ते म्हणत आहेत. त्याचे नेत्र मोठे परंतु अर्धोन्मिलित अवस्थेत असल्याने ते अतिशय मादक दिसतात. त्याच मदनाची मोहिनी माता पार्वतीवर पडली आणि तिने त्याला सुमनांच्या माळा अर्पण करून आपलेसे केले. स्मशानात राहणारा हा देव, भस्मविलेपन त्याचा श्रुंगार करून होतो. विभुती लावून तो आणखीनच गौरवर्णी दिसत असला, तरी हलाहल प्यायल्यामुळे त्याचा गळा शितीकंठ म्हणजे मोराच्या कंठासारखा निळा झाल्याचे स्पष्ट दिसून येते. तरी तो उमेला शोभून दिसतो आणि तिचा सांभाळ करतो.
देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजि अवचित हलाहल ते उठले,
ते त्वा असूरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले।।
समुद्रमंथनातून निघालेल्या चांगल्या आणि उपयोगी वस्तू देव दानवांनी भांडून पदरात पाडून घेतल्या. परंतु हलाहल निघाले, ते प्यायला कोणी पुढे आले नाही. तू मात्र नि:संकोचपणे हलाहल पचवलेस आणि तेव्हापासून नीलकंठ म्हणून ओळखला जाऊ लागलास.
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी,
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळटिळक रामदासा अंतरी।।
वैरागी वृत्तीचा शिवशंकर व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे परिधान करतो. गळ्यात सर्प गुंडाळतो. मदनावर नियंत्रण मिळवतो. तो आपल्या पाच मुखांनी मुनिजनांकडे कृपादृष्टीने पाहतो. सर्व शक्तिमान असूनही शतकोटीचे बीज ज्या रामनामात आहे, ते सातत्याने घेत त्यातच रममाण होतो. अशा शिवशंकरा तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होतो.