महानंदा नावाच्या वारांगनेची परीक्षा घेण्यासाठी महादेव सौदागर रूपात अवतरले आणि...
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 8, 2021 09:00 AM2021-02-08T09:00:00+5:302021-02-08T09:00:02+5:30
भक्त आपला आणि सर्वांचा उद्धार कसा करतात, हे सांगणारी शिवभक्ताची कथा!
काश्मीरमधील नंदीग्रामात महानंदा नावाची वारांगना राहत असे. त्या गावात तिचे राजासारखे ऐश्वर्य होते. ती अत्यंत रूपवान व सुलक्षणी होती. ती नृत्यगायनात प्रवीण होती. लहानपणापासून ती शिवाची भक्ती करीत असे. तिने आपल्या नृत्यागारात शिवलिंग ठेवले होते. ऐन तारुण्यातसुद्धा सोमवार, प्रदोष, महाशिवरात्री ही व्रते ती आचरित असे. रोज लक्ष बेल वाहून शंकराची ती पूजा करीत असे. प्रतिसोमवारी ब्राह्मणांकडून शिवाला अभिषेक करवित असे. श्रावण महिन्यात कोटी लिंगार्चन करण्याचा तिचा नियम होता. अतिथीना जे इच्छित ते ती पुरवीत असे. तिने आपल्याकडील पाळीव कोंबडी आणि माकडाला नृत्य शिकवले होते. ती त्यांना रोज स्नान घालून विभुती लावत असे. तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या होत्या. त्या दोघांना नेहमी ती आपल्या नृत्यागारात बांधून ठेवी.
महानंदा जरी वारांगना होती, तरी ती आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक होती. म्हणजे एखाद्या पुरुषाला तीन दिवस अगर सात दिवस आपल्या घरी प्रवेश करण्यास तिने अनुमती दिली तर त्या अवधीत ती दुसऱ्या पुरुषाकडे पाहत नसे.
तिच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी एके दिवशी शंकर सौदागराच्या वेषाने तिच्याकडे आले. दारात आलेल्या अतिथीचा यथायोग्य सत्कार करून तिने त्यांचे कुशल विचारले. त्या सौदागराच्या हाताला रत्नजडित कांकण होते. त्याकडे महानंदाचे सहज लक्ष गेले. ते जाणून सौदागराने महानंदेला ते कांकण दिले. ते मिळाल्यावर महानंदेला मोठी धन्यता वाटली. तिच्या आग्रहावरून सौदागराने तीन दिवस तिच्या घरी राहण्याची कबुली दिली. त्यावर त्याने आपल्या जवळची शिवपिंडी महानंदेजवळ दिली आणि `हे माझे प्राणलिंग आहे. हे तू जिवापलीकडे जतन केले पाहिजे. मी निघतेवेळी ते परत घेऊन जाईन', असे सांगितले. त्याप्रमाणे, 'हे लिंग हरवले किंवा भंगले तर मला अग्निकाष्ठ भक्षण करावे लागेल. म्हणून तू शक्यतो दक्षता राख' असेही बजावले.
महानंदेने ती पिंडी आपल्या नृत्यागारात नेऊन ठेवली आणि सौदागराच्या सेवेत ती तत्पर राहिली. शंकरांच्या आज्ञेवरून अग्निनारायणाने नृत्यागरात प्रवेश केला. तोच चहुकडून लोक `आग लागली, आग विझवा' असे म्हणत ओरडू लागले. ते ऐवूâन महानंदा खडबडून जागी झाली. तिचे हातपाय लटपटू लागले. कसेबसे जाऊन तिने पाळीव कोंबड्याला आणि माकडाला मुक्त केले. थोड्या वेळात नृत्यशाळा जळून भस्म झाली.
इतक्यात सौदागर उठला आणि त्याने `माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना? असा महानंदेला प्रश्न केला. तेव्हा ती थरथर कापू लागली. हात जोडत म्हणाली, 'स्वामी, लिंग भस्म झाले.'
तेव्हा सौदागर म्हणाला, 'आज माझ्या मुक्कामाचा दुसरा दिवस. लिंग भस्म झाले असे म्हणतेस त्या अर्थी क्षणाचाही विलंब न लावता मला माझे पुढचे काम करावे लागेल' असे म्हणून त्याने अग्निकुंड तयार करून ऊँ नम: शिवाय म्हणत त्यात उडी टाकली. ते दृष्य पाहताच महानंदेनेही अग्निकाष्ठ भक्षण केले.
तोच अग्नि शांत झाला आणि महानंदेसह शंकर अग्निकुंडातून वर आले. शंकर म्हणाले, `महानंदे, तुझी परीक्षा पहाण्यासाठी मी सौदागर होऊन आलो होतो. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. `इच्छित वर माग!' तेव्हा महानंदा हात जोडून म्हणाली, `महादेवा, हे सारे नगर उद्धरून शिवलोकी न्यावे, यापेक्षा माझे दुसरे काहीच मागणे नाही.' शंकर तथास्तू म्हणाले.
अशा तऱ्हेने महानंदेने एक वारांगना असूनही केवळ भक्तीच्या बळावर स्वत:चा आणि इतरांचा उद्धार करून घेतला व शिवकृपा प्राप्त केली.