Mahakumbh 2025: 'या' विशिष्ट भौगोलिक स्थितीतच आयोजित केला जातो महाकुंभमेळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:11 IST2025-01-13T13:10:40+5:302025-01-13T13:11:20+5:30
Mahakumbh 2025: महाकुंभ मेळ्याला केवळ धार्मिक, पौराणिक पार्श्वभूमी नाही तर त्यामागे आहे अतिशय सुंदर भौगोलिक स्थिति, नेमकी कोणती ते पहा.

Mahakumbh 2025: 'या' विशिष्ट भौगोलिक स्थितीतच आयोजित केला जातो महाकुंभमेळा!
>>योगेश काटे, नांदेड
आजपासून हिंदुधर्मातील महा कुंभपर्वाला (Maha Kumbhmela 2025) सुरुवात होणार आहे. पहिले अमृत स्नान हे मकरसंक्रांतीला पार पडणार आहे तर शेवटचे अमृत स्नान वसंत पंचमीस पार पडेल. यात एकुण तीन अमृत स्नान होणार आहेत आणि तीन तिथि स्नान होणार आहे. पौष पौर्णिमा, माघी पौर्णिमा व महाशिवरात्रीला या महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे.
हे महाकुंभ प्रयाग राजच्या त्रिवेणी संगमावर होणार आहे. कुंभमेळ्याचे चार पवित्र स्थळ आहे. कुंभ पर्वात अनेक भाविक भक्तिभावाने भगवंताच्या नामाने नदीत स्नान व आन्हिक करतात. इतिहासाचे स्मरण आणि एक वैशिष्ट्यपूर्ण खगोलीय बदलाचा भाग म्हणून हा उत्सव पार पाडतो. या वेळेसचा कुंभ हा महाकुंभ!का? तर बारा कुंभापर्वानंतरच्या कुंभमेळ्यास महाकुंभ म्हणतात म्हणजे कुंभ हा दर बारा वर्षांनी येतो, म्हणजे जवळजवळ १४४ वर्षांनी एक महाकुंभपर्व येते अशा दुर्मिळ योगावार आपण कुंभाची धार्मिक श्रद्धापर माहिती पाहू.
कुंभमेळा सुरु होण्याची पौराणिक कथा : देव व दानवांनी मिळुन केलेल्या समुद्र मंथनात निघालेली चौदा रत्ने ,लक्ष्मी ,ऐरावत हत्ती यापाठोपाठ विषही निघाले, ते घेण्यास कोणीच पुढे येईना. महादेवांनी पुढाकार घेऊन विष प्राशन केले. शंभू नीलकंठ झाले. त्यानंतर अमृत कलश घेऊन धन्वंतरीही प्रकट झाले. पुन्हा देव दानवांनमध्ये युद्ध झाले. ते बारा दिवस चालले. या दरम्यान अमृताचे जे बार कण सांडले त्यापैकी चार कण मृत्युलोकात अर्थात पृथ्वीवर पडले. ते जिथे पडले ती चार तीर्थक्षेत्र म्हणून पावन झाली. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक! अशी आपली धार्मिक मान्यता आहे की चंद्राने अमृत आणखी सांडू नये म्हणून प्रयत्न केले, सूर्यनारायणाने अमृत कलशाला तडे नाही जाऊ दिले आणि बृहस्पतींनी दानवांपासून रक्षण केले. त्यामुळे या तीन ग्रहांच्या एकत्रित योगावर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
कुंभमेळ्याची भौगोलिक पार्श्वभूमी :
प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून तो पुढीलप्रमाणे येतो : (१) प्रयाग – मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असता (२) हरद्वार – गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता (३) नासिक – गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असता (४) उज्जयिनी – सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत असता. प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यापैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला ‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे गुरूला राशिचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, ह्या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती इ. सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते.
कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य असते आणि तो अविभाज्य भाग मानला जातो. कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व असते. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.
आखाडा संकल्पना'-
कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात. शैव ,वैष्णव , नाथपंथी.
असे आखाडे आहेत.मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम, आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते, त्यांना सेवा - सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
अशा भव्य महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे, ही आपल्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.