महर्षी नारदांनी भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत, यापैकी आपल्याला कोणती आचरता येते, ते पाहुया.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:46 AM2021-05-20T09:46:54+5:302021-05-20T09:47:12+5:30
भक्ती अर्थात निस्सिम मनाने केलेली ईश्वराची आराधना. ती ज्याला जशा पद्धतीने जमेल, त्याने तशी ती करावी.
महर्षी नारद यांची प्रतिमा विशेषत: मालिकांनी मलीन केली आहे. कळलाव्या नारद हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य नसून ते त्रिखंडात मुक्तसंचार करणारे, भूत, वर्तमान, भविष्याचा वेध घेणारे, चराचराची इत्थंभूत माहिती ठेवणारे महान ऋषी होते. शिवाय ते नारायणाचे निस्सिम भक्त होते. जो प्रसंग जसा घडला, याची माहिती परमेश्वराजवळ पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सत्य नेहमी कटू वाटते. त्यांच्या सत्याचरणामुळे त्यांच्यावर कळ लावणारा नारद असा लोकांनी ठपका ठेवला. परंतु, वास्तव तसे नसून, नारदांनी वेळोवेळी आपल्याजवळ असलेल्या ज्ञानगंगेतून लोकांना प्रबोधन केले. त्यातील एक प्रकार म्हणजे नवविधा भक्ती.
श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं,
अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ।
भक्ती अर्थात निस्सिम मनाने केलेली ईश्वराची आराधना. ती ज्याला जशा पद्धतीने जमेल, त्याने तशी ती करावी. त्याचे मुख्य पैलू महर्षी वरील श्लोकात उलगडून सांगतात,
श्रवणभक्ती : शुद्धज्ञान सांगणारे ग्रंथ, वक्ते अभ्यासावेत. त्यातून सार वेचून घेणे, आचरणात आणणे.
कीर्तनभक्ती : देवाच्या कथा आणि त्याच्याविषयीचे ज्ञान प्राप्त करणे. अत्यंत प्रेमाने, भक्तीने, आनंदाने इतरांना ऐकवणे, त्याचे पूजन कसे करावे, आपल्यातील सद्गुण कसे वाढवावेत, अधिक चांगली व्यक्ती कसे होता येईल, हे स्वत:ला आणि इतरांना समजावून सांगावे.
स्मरणभक्ती : परमेश्वराला अखंड आठवणे, त्याच नाव, रूप विंâवा आकाररहीत स्वरूप हृदयात आणून चिंतन करता करता निराकार अवस्थेमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करणे. सदासर्वकाळी सुखाच्या, संकटाच्या काळातही स्मरण करावे.
पादसेवाभक्ती : अभिमान नाहीसा करण्याचे कार्य पादसेवेने साधते. पूर्ण शरणागतीने सद्गुरुंचा आशीर्वाद मिळवण्याचा हा श्रेष्ठ मार्ग आहे. या मार्गात पुढे असणारे संत सज्जन यांची पादसेवा करावी.
अर्चनभक्ती : पवित्र स्थळे आणि पवित्र माणसांची सेवा करावी. तन, मन, धन त्या सेवेमध्ये अर्पण करावे. मनोमन अर्पण केलेलेही देव स्वीकारतो.
वंदनभक्ती : जेथे सद्भाव, चांगली गोष्ट जाणवेल, तेथे परमेश्वराचे अस्तित्त्व मान्य करणे. ज्याच्यापाशी ही लक्षणे दिसतील त्यामधील परब्रह्माला वंदन करणे. अभिमानरहित भावाने नमस्कार केल्यास पतित म्हणजे पापी व्यक्तीही उद्धरून जातो.
दास्यभक्ती : आपले मानसन्मान बाजूला ठेवून संत सत्पुरुषांच्या सेवेला रुजू होणे.
सख्यभक्ती : आपला जीवलग परमेश्वराला मानणे, तोच आपला प्राणसखा समजून त्याला आठवणे. त्याला काय आवडेल किंवा काय आवडणार नाही, असा विचार करत सर्वकाही करत राहणे. प्रत्येक कर्म त्याच्यासाठीच जाणिवेने करणे.
आत्मनिवेदनभक्ती : आत्मनिवेदनभक्ती म्हणजे त्या परमेश्वराला वाहून घेणे. शरीरातील पंचतत्त्व ब्रह्मांडातील पंचमहाभूतात विलीन होतील तेव्हा `मी देह आहे' हा अभिमान नष्ट होईल. आणि आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होईल.