Mahashivratri 2022: कधी आहे महाशिवरात्री? १२० वर्षांनी जुळून येतोय अद्भूत पंचग्रही योग; पाहा, शुभ मुहूर्त व पूजाविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 02:38 PM2022-02-16T14:38:19+5:302022-02-16T14:42:25+5:30

Mahashivratri 2022: महाशिवरात्रीचे महत्त्व, मान्यता आणि निशीथकाल म्हणजे काय, ते जाणून घ्या...

mahashivratri 2022 know date time shubh muhurat panchgrahi yoga nishit kaal puja vidhi and significance of mahashivratri | Mahashivratri 2022: कधी आहे महाशिवरात्री? १२० वर्षांनी जुळून येतोय अद्भूत पंचग्रही योग; पाहा, शुभ मुहूर्त व पूजाविधी

Mahashivratri 2022: कधी आहे महाशिवरात्री? १२० वर्षांनी जुळून येतोय अद्भूत पंचग्रही योग; पाहा, शुभ मुहूर्त व पूजाविधी

Next

मराठी वर्षाच्या उत्तरार्धात मकरसंक्रांतीनंतर येणारा सर्वाधिक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. महादेव शिवशंकराचे पूजन, उपासना, नामस्मरण, आराधना करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पवित्र मानल्या गेलेल्या माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली होता. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यावर्षीची महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष आहे. यंदाच्या वर्षी कधी आहे महाशिवरात्री? या दिवशीचे शुभ मुहूर्त, निशीथकाल जाणून घेऊया... (Mahashivratri 2022)

वास्तविकपणे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते. यंदाच्या महाशिवरात्रीला १२० वर्षांनंतर पंचग्रहीसह अद्भूत शुभ योग जुळून येत आहेत. (Mahashivratri 2022 Date and Time)

महाशिवरात्री: ०१ मार्च २०२२

माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ: सोमवार, २८ फेब्रुवारी २०२२ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून १६ मिनिटे.

माघ वद्य चतुर्दशी समाप्ती: मंगळवार, ०१ मार्च २०२२ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजता. 

निशीथकाल: ०१ मार्च २०२२ उत्तररात्रौ १२ वाजून २६ मिनिटे ते ०१ वाजून १५ मिनिटे.

सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, या काळाच निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशीथकालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे, असे सांगितले जाते. शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशीथकाल सर्वांत प्रभावी मानला जातो. (Mahashivratri 2022 Puja Vidhi)

असा करा महाशिवरात्री पूजाविधी

महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात 'श्रीशिवाय नमः' असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात 'श्रीशंकराय नमः' असे म्हणावे. निशीथकाली 'श्रीसांबसदाशिवाय नमः' असे जपावे. तिसऱ्या प्रहरात 'श्रीमहेश्वराय नमः' आणि चौथ्या प्रहरात 'श्रीरुद्राय नमः' असा नामोच्चार करून समर्पण करावे. शिवरात्रीचे दिवशी अनशन व्रत घेतलेल्या भक्ताने शिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा. यावेळी पूजा करताना खालील मंत्र म्हणावा.

ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।
रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् ।।
पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्।
विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

यानंतर शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. यानंतर गंध, अक्षता, फुले वहावित. नैवेद्य दाखवून शंकराचे नामस्मरण करावे. वरीलप्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ।। शिवाय नमः।। या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. (Mahashivratri 2022 Auspicious Shubh Yog)

पंचग्रही योगासह अद्भूत शुभ योग

महाशिवरात्रीच्या दिवशी मकर राशीत शनी, मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र या पाच ग्रहांचा दुर्मिळ पंचग्रही योग जुळून येत आहे. याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्त आहे. यानंतर दुपारी ०२ वाजून मिनिटांपासून ते ०२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त असून, सायंकाळी ०५ वाजून ४८ मिनिटांपासून ते ०६ वाजून १२ मिनिटांपर्यंत गोधूलि मुहूर्त आहे. हे सर्व मुहूर्त शुभ कार्य करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. 

 

Web Title: mahashivratri 2022 know date time shubh muhurat panchgrahi yoga nishit kaal puja vidhi and significance of mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.