Mahashivratri 2024: कधी आहे महाशिवरात्री? निशीथकाल म्हणजे काय? पाहा, तारीख अन् महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 05:51 PM2024-02-28T17:51:19+5:302024-02-28T17:51:49+5:30

Mahashivratri 2024 Date: मराठी वर्षातील व्रते, सण-उत्सवांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. जाणून घ्या...

mahashivratri 2024 know about date time and significance and what is nishith kaal in mahashivratri | Mahashivratri 2024: कधी आहे महाशिवरात्री? निशीथकाल म्हणजे काय? पाहा, तारीख अन् महत्त्व

Mahashivratri 2024: कधी आहे महाशिवरात्री? निशीथकाल म्हणजे काय? पाहा, तारीख अन् महत्त्व

Mahashivratri 2024: भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरात महादेवांची हजारो मंदिरे असल्याचे आढळून येते. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. मराठी वर्षांत श्रावणानंतर शिवपूजनासाठी महाशिवरात्रीचा दिवस अनन्य साधारण महत्त्वाचा मानला गेला आहे. सन २०२४ मध्ये महाशिवरात्री कधी आहे? निशीथकाल म्हणजे काय? महाशिवरात्रीचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या...

शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असून त्यांपैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. (Mahashivratri 2024 Significance)

उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे

महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम्, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर यांसह असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात. मध्यरात्र, वद्यपक्ष, शिशिर ऋतू, चतुर्दशी या महाशिवरात्रीच्या कालिक वैशिष्ट्यांमधून सृष्टीतील संहार व पुनर्निर्मिती यांचे चक्र सूचित होते, असे काही अभ्यासकांना वाटते. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (Mahashivratri 2024 Nishith kaal Timing)

निशीथकाल म्हणजे काय?

सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, या काळाच निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशीथकालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे, असे सांगितले जाते. शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशीथकाल सर्वांत प्रभावी मानला जातो.(Mahashivratri 2024 Date)

सन २०२४ मध्ये कधी आहे महाशिवरात्री?

महाशिवरात्री: शुक्रवार, ०८ मार्च २०२४

माघ वद्य चतुर्दशी प्रारंभः शुक्रवार, ०८ मार्च २०२४ रोजी रात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटे.

माघ वद्य चतुर्दशी समाप्तीः शनिवार, ०९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटे.

निशीथकाल वेळः शुक्रवार, ०८ मार्च २०२४ रोजी मध्यरात्रौ १२ वाजून २५ मिनिटे ते उत्तररात्रौ ०१ वाजून १३ मिनिटे.

भारतीय संस्कृतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये रात्री केल्या जाणाऱ्या पूजेला महत्त्व असल्यामुळे ०८ मार्च २०२४ रोजी व्रतोपासना करावी, असे सांगितले जाते. ०९ मार्च रोजी चतुर्दशीची सांगता झाल्यावर माघ अमावास्या प्रारंभ होणार आहे.

 

Web Title: mahashivratri 2024 know about date time and significance and what is nishith kaal in mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.