महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न कराचेय? राशीनुसार ‘हे’ उपाय करा; शिवकृपा अन् भरघोस लाभ मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 07:57 PM2024-03-07T19:57:35+5:302024-03-07T19:58:35+5:30
Mahashivratri 2024: महादेवांचे शुभाशिर्वाद प्राप्त होण्यासाठी राशीनुसार उपाय करणे उत्तम लाभदायक मानले जाते. जाणून घ्या...
Mahashivratri 2024: ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. देशभरात महाशिवरात्री साजरी केली जाते. महादेवाचे विशेष व्रत, विशेष पूजन केले जाते. महादेवांचे कृपाशिर्वाद मिळावे, यासाठी नामस्मरण, उपासना आणि काही उपाय केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, महादेवांचे शुभाशिर्वाद प्राप्त होण्यासाठी राशीनुसार उपाय करणे उत्तम मानले जाते.
महाशिवरात्रीला आवर्जून व्रताचरण करून विशेष शिवपूजन केले जाते. महादेव भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला शिवपूजन केल्याने चौपट अधिक फल मिळते, असे म्हणतात. महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ जुळून येत आहे. महाशिवरात्रीला कुंभ राशीमध्ये सूर्य, शनि आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग तयार होत आहे. महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी नवग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत बुध आणि राहुचा युती योग जुळून येईल. मंगळ मकर राशीत असेल. तुमची रास कोणती? काय उपाय करणे शुभलाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या...
राशीनुसार ‘हे’ उपाय करा
मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे दूध, दही आणि धोत्र्याचे फूल, फळ अर्पण करा. रक्त चंदनाचे त्रिपुंड लावावे. शिवाष्टकांचे पठण करा.
वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. मोगऱ्याचे अत्तर, बेलपत्र आणि चंदन अर्पण करावे. शिव चालीसा पठण करावे किंवा श्रवण करावे.
मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे. महाशिवरात्रीला स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जात आहे. स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास मंदिरात पूजा करावी. सात प्रकारची फुले अर्पण करावीत. शिवाच्या स्तोत्राचे पठण करावे.
कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कच्चे दूध, जल, अष्टगंध, चंदन, पांढरी मिठाई अर्पण करा. शिवसहस्र नामावलीचे पठण करावे.
सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी फळांच्या रसाचा अभिषेक करावा. फुले, बेलपत्र अर्पण करावे. शिवमहिम्न स्तोत्राचे पठण करावे.
कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कापूरमिश्रित पाण्याने अभिषेक करावा. बेलपत्रावर ठेवून नैवेद्य अर्पण दाखवा. शिव चालीसा पठण करावे किंवा श्रवण करावे. ॐ नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा. बेलपत्र, मोगरा, अक्षता, चंदन अर्पण करा. पांढरी फुले अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावावा. यथाशक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिव चालीसा पठण करावे किंवा श्रवण करावे.
वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करावा. रक्त चंदनाचे त्रिपुंड लावावे. फुले अर्पण करा. ॐ नागेश्वराय नमः' चा १०८ वेळा जप करावा.
धनु: या राशीचा स्वामी गुरु आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा. पिवळी फुले अर्पण करावी. महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा.
मकर: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू अर्पण करावे. विधिवत पूजा करून ॐ अर्धनारीश्वराय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. शंकराला अर्पण केलेले गहू गरजू गरिबांना दान करावे.
कुंभ: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. भस्माचा त्रिपुंड लावावा. महामृत्युंजय कवच पठण करावे किंवा श्रवण करावे.
मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. महाशिवरात्रीला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी. शिवलिंगावर पिवळी फुले अर्पण करून ॐ अनंतधर्माय नम: या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच ॐ नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.