महाशिवरात्री: ‘या’ आहेत शंकराच्या विविध आरत्या; आवर्जून म्हणा अन् अपार लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:20 PM2024-03-07T16:20:49+5:302024-03-07T16:21:33+5:30

Mahashivratri 2024: विशेष पूजेनंतर आवर्जून आरती म्हटली जाते. आरती करताना काही नियम पाळावेत, असे सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या विविध आरत्या म्हटल्या जातात.

mahashivratri 2024 know about shankarachi aarti in marathi | महाशिवरात्री: ‘या’ आहेत शंकराच्या विविध आरत्या; आवर्जून म्हणा अन् अपार लाभ मिळवा

महाशिवरात्री: ‘या’ आहेत शंकराच्या विविध आरत्या; आवर्जून म्हणा अन् अपार लाभ मिळवा

Mahashivratri 2024: ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. भारतासह परदेशातही महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. महाशिवरात्री हा दिवस महादेवांच्या पूजनासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो. याचे कारण या दिवशी पृथ्वीवर शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात असते, असे मानले जाते. भारतात विविध ठिकाणी त्या त्या प्रांताच्या परंपरांनुसार महाशिवरात्री साजरी केली जाते. लाखो घरातही महाशिवरात्रीची पूजा करताना कुळधर्म, कुळाचार, परंपरा पाळल्या जातात. पूजेनंतर सर्वजण एकत्रितपणे आरती करतात.

पूजा कोणतीही असो, गणपतीची असो वा सत्यनारायणाची असो, विशेष पूजनानंतर आरती म्हटली जाते. आरती म्हणजे देवाची स्तूती. आरती खड्या आवाजात आणि लयीत म्हटली जाते. आरती करताना एकारत किंवा पंचारत ओवाळली जाते. अनेक ठिकाणी परंपरांनुसार यात बदल होत असतो. शक्यतो उभे राहून आरती केली जाते. ऋषी, संत-महंत यांसह दिग्गज रचनाकारांनी देवतांच्या विविध आरत्या रचल्या आहेत. आपल्या आराध्याची स्तुती करताना रचनाकारांनी वैविध्यपूर्ण रचना केल्याचे आढळून येते. 

आरती करताना काय काळजी घ्यावी?

भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे, या भावनेने आरती म्हणतात. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी, असे सांगितले जाते. आरती म्हणतांना शब्दोच्चार योग्य असावा लागतो. प्राथमिक अवस्थेतील ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवतात. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवतातत. घंटा मंजुळ ध्वनीत वाजवतात आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवतात. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ देतात. आरती म्हणत असतांना देवाला ओवाळले जाते. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळत नाहीत, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळली जाते. 

समर्थ रामदास स्वामी रचित आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

श्री व्याडेश्वराची आरती

भार्गवनिर्मित पावन अपरांत भूमी ।
त्यामाजी अवतरला जगताचा स्वामी ॥
व्याडी स्थापित लिंगे गुप्तची राहिला ।
शरणागत जे भाविक तारित त्यां सकळा ॥१॥
जयदेव जयदेव श्री व्याडेश्वरा, प्रणिपात साष्टांग तुज गंगाधरा जय देव जय देव ॥ धृ ॥

अंबामाता आणिक शोभे गणपती ।
गरुडासह मारुती नंदी तो पुढती ॥
श्रीपती लक्ष्मी सूर्य भवती बैसले ।
पंचायतन रूपे मंदिर शोभले ॥२॥
जयदेव जयदेव श्री व्याडेश्वरा, प्रणिपात साष्टांग तुज गंगाधरा जय देव जय देव ॥ धृ ॥

सात्विक तो गाभारा पिंडी तव त्यात ।
सप्त वदनी फणिधर धरतो वरि छत्र ॥
संतत धार धराया अभिषेक पात्र ।
ध्यानचि सुंदर दिसले गिरीशा सुपात्र  ॥३॥
जयदेव जयदेव श्री व्याडेश्वरा, प्रणिपात साष्टांग तुज गंगाधरा जय देव जय देव ॥ धृ ॥

महादेव त्र्यंबकेश्वराची आरती...

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो ।
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ।
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥

पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ।
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥
प्रसन्न हो‍उनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो ।
आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ।
तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥

ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ।
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ।
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥

लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ।
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ।
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥

कर्पूरगौराची आरती

त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा ।
उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा ।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न हो‍उनि पावसि भक्ताला ॥ १ ॥

ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी ।
जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥

सांबसदाशिवाची आरती

जय देव जय देव जय शंकर सांबा ।
ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥

जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ।
पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥
भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ।
अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥

जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ।
सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥
प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ।
हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव० ॥ २ ॥

गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥
भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥
करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका ।
तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥ ३ ॥

शिवेश्वराची आरती

जटा धारिल्या शीर्षावरती झेलियली गंगाधारा आणि खोविला आभूषणात्मक शीतल शशि कचसंभारा भालावरल्या नेत्रामधुनी बरसवुनी खदिरांगारा मदनदहन करूनिया शमविला क्रोध तुवा अतिबलेश्वरा जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा॥ १ ॥

विश्वाचा समतोल राखण्या अवलंबिशी तू संहारा कठोर जितुका तितुका भोळा असशी तू तारणहारा कर्पुरगोर्‍या अंगांगावर भस्म लेपिशी उग्रतरा व्याघ्रांबरधारका महेशा, मम वंदन तुज हरेश्वरा जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा॥ २ ॥

कंठ तुझा जाहला निळा जधि प्राशन केले हलाहला दाह तयाचा शमवायाला नाग धारिला जशि माला तांडवप्रिया, रूद्रनायका, कैलाशपती, त्रिशुलधरा अर्पण ही आरती चरणि तव नीलग्रीवा पशुपतेश्वरा जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा॥ ३ ॥

॥ हर हर महादेव ॥

Web Title: mahashivratri 2024 know about shankarachi aarti in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.