महाशिवरात्री: ‘असे’ करा शास्त्रशुद्ध शिवपूजन; पाहा, योग्य पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:53 PM2024-03-06T12:53:18+5:302024-03-06T12:53:48+5:30

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला लाखो घरांमध्ये शिवपूजन केले जाते. शास्त्रशुद्ध सोपी पद्धत जाणून घ्या...

mahashivratri 2024 know about shubh muhurat and vrat puja vidhi of mahadev lord shiva on mahashivratri | महाशिवरात्री: ‘असे’ करा शास्त्रशुद्ध शिवपूजन; पाहा, योग्य पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता

महाशिवरात्री: ‘असे’ करा शास्त्रशुद्ध शिवपूजन; पाहा, योग्य पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता

Mahashivratri 2024: ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. मराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. महाशिवरात्रीला लाखो घरांमध्ये शिवपूजन केले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवपूजन कसे करावे? कोणत्या मुहुर्तांवर शिवपूजन करणे पुण्यफलदायी ठरू शकते? जाणून घ्या...

महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवांसह गणपती, कार्तिकेय, पार्वती देवी यांचे पूजन केले जाते.

महाशिवरात्रीचे शुभ मुहूर्त

महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ जुळून येत आहे. ०८ मार्च रोजी सूर्योदयापासून ते रात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटांपर्यंत त्रयोदशी आहे. त्यानंतर चतुर्दशी प्रारंभ होणार आहे. ०९ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजून १६ मिनिटांनी चतुर्दशी समाप्त होईल. ०८ मार्च रोजी मध्यरात्रौ १२ वाजून २५ मिनिटे ते उत्तररात्रौ ०१ वाजून १३ मिनिटे हा निशीथकाल असणार आहे. तर ०८ मार्च रोजी सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे. त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होईल. ०८ मार्च रोजी चतुर्दशीला रात्री ०९ वाजून ५८ पासून भगवान शंकराची पूजा आणि अभिषेक करणे उत्तम राहील. दिवसभरात सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटे ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंतचा काळ शुभ राहील. यानंतर दुपारी १२ वाजून ३२ मिनिटे ते २ वाजेपर्यंतचा काळ पूजेसाठी चांगला आहे. प्रदोषकाळात ०४ वाजून ५७ मिनिटे ते ०६ वाजून पर्यंतची वेळ पूजेसाठी उत्तम राहील, असे सांगितले जात आहे. 

महाशिवरात्रीचा शिवपूजन विधी

महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन `शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते। असा संकल्प करावा. ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जत नसेल त्यांनी `हे जगत्पतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याचे चांगले फळ मला मिळो' असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्पाचे अर्घ्य देऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे. पूजा करताना खालील मंत्र म्हणावा,

ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।
रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् ।।
पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्।
विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालोद्भव सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. वरीलप्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ॐ शिवाय नमः या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी. 

निशीथकाल आणि शिवपूजन

काही मान्यतांनुसार, महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात पूजा करताना 'श्रीशिवाय नमः' असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात पूजा करताना 'श्रीशंकराय नमः' असे म्हणावे. निशीथकाली पूजा करताना 'श्रीसांबसदाशिवाय नमः' असे जपावे. तिसऱ्या प्रहरात करताना 'श्रीमहेश्वराय नमः' आणि चौथ्या प्रहरात पूजा करताना 'श्रीरुद्राय नमः' असा नामोच्चार करून समर्पण करावे, असे सांगितले जाते. शंकर ही देवता सर्वप्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. शंकर हा महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी आणि विरागी वृत्तीचा आहे. तो स्मशानात राहतो. तो रुद्र आहे. उग्र आहे, तरीही मुनिजन सुखकारी आहे. तो भोळा आहे. आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारा आहे. तो भक्तांची इच्छा पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. 

 

Web Title: mahashivratri 2024 know about shubh muhurat and vrat puja vidhi of mahadev lord shiva on mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.