Mahashivratri 2024: शिवकृपा होईल, वास्तुदोष दूर करता येईल; महाशिवरात्रीला ‘या’ गोष्टी करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 04:23 PM2024-02-29T16:23:20+5:302024-02-29T16:23:45+5:30
Mahashivratri 2024: शिवपूजनासह महाशिवरात्रीला काही उपाय केल्यास शिवकृपेचा शुभलाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जाते.
Mahashivratri 2024: संपूर्ण मराठी वर्षातील एक महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते. शिवपूजनासाठी महाशिवरात्री हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. देशभरातील हजारो शिवमंदिरांमध्ये या दिवशी वैविध्यपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवलिंगावर रुद्राभिषेक, जलाभिषेक केले जातात. मात्र, यासह महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केल्यास घरात काही वास्तूदोष असेल, तर तो दूर केला जाऊ शकतो किंवा त्याचा प्रभाव अल्प केला जाऊ शकतो, असे म्हटले जाते.
सन २०२४ मध्ये ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. आपापल्या कुळाचार, कुळधर्म, परंपरांनुसार शिवपूजन केले जाते. तसेच विविध उपासना, श्लोक, मंत्र, नामस्मरण, जप करून शिवाची आराधना केली जाते. शिवकृपा होण्यासाठी विविध उपायही सांगितले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे.
महाशिवरात्रीला ‘या’ गोष्टी करा!
- पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र, याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी, असे सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.
- पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.
- महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक करून जलधारीचे पाणी घरी आणावे. यानंतर 'ओम नमः शांभवाय च, मायोभवाय च नमः शंकराय च'. या मंत्राचा जप करत ते तीर्थ घरभर शिंपडावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.
- घरातील उत्तर-पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला कोणतीही तुटलेली वस्तू किंवा भांडी पडू नयेत. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते, असे सांगितले जाते.
- एकाच घरात आपसी कलह, रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते.
- घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो.
- घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते.
- यादिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.