महाशिवरात्री: बिल्वपत्रासह ‘ही’ पानेही करा अर्पण, शिवपूजनात सर्वाधिक महत्त्व; पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 05:20 PM2024-03-02T17:20:48+5:302024-03-02T17:23:09+5:30
Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला बेलपानांसह देशभरात विविध विशेष पाने, फुले वाहण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...
Mahashivratri 2024: मराठी वर्षातील माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेकविध सण-उत्सव, व्रते साजरी केली जातात. मराठी वर्षातील श्रावणानंतर महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम मानला गेलेला दिवस म्हणजे महाशिवरात्री. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री देशभरात साजरी केली जाते. यंदा ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. देशभरातील हजारो शिवमंदिरात जाऊन लाखो भाविक जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. विशेष व्रताचरण, पूजन, नामस्मरण, जप-मंत्रांचे पठण अशा अनेक गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिवपूजनात बिल्वपत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यासह अन्य काही पाने आहेत, जी महाशिवरात्रीला शंकराला अर्पण करावीत, असे सांगितले जाते.
महाशिवरात्रीला भारतातील अनेकविध ठिकाणी महादेवाची पूजा मोठ्या प्रमाणात करता येते. तसे पाहिल्यास प्रत्येक मराठी महिन्यात शिवरात्र असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्र, महाशिवरात्री म्हणून साजरी करण्यात येते. महाशिवरात्रीच्या शिवपूजनावेळी काही पानांना अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बिल्व पत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.
धोत्र्याचे पान/फळ
महाशिवरात्रीच्या शिवपूजनात धोत्र्याचे पान आणि फळ यांचा समावेश केला जातो. शिवपुराणानुसार, शिवाला धोत्रा अत्यंत प्रिय आहे. धोत्र्याचे पान, फळ आणि फूल अत्यंत औषधी मानले गेले आहे. शिवपूजनात धोत्र्याचे पान आणि फळ वाहिले जाते. भगवान महादेवाला भांग प्रिय असल्याची मान्यता आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला शंकराला भांगाची पाने अर्पण केली जातात. वास्तविक पाहता भांगाच्या पानाचे औषधी महत्त्व जास्त आहे. समुद्र मंथनावेळी शंकराने विष प्राशन केले होते, त्यावेळी उपचार करण्यासाठी भांगाच्या पानाचा वापर करण्यात आला होता, अशी कथा सांगितली जाते. यासाठी शिवपूजनात भांगाच्या पानाचे महत्त्व आहे, असे म्हटले जाते.
‘ही’ पानेही अर्पण करण्याची परंपरा
बिल्वपत्र, भांगाचे पान, धोत्र्याचे पान/फळ याव्यतिरिक्त घोंगलाचे फूल वाहण्याची विदर्भात परंपरा आहे. तर काही ठिकाणी तुळशीची पाने शिवपूजनावेळी वाहिली जातात, असे म्हटले जाते. तसेच दक्षिण भारतात महाशिवरात्रीला शंकराला निळी कमळे वाहण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वाहिली जातात, असे सांगतात.