महाशिवरात्री: ‘ही’ प्रतीके आहेत महादेवांची ओळख, मानली जातात शुभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 12:20 PM2024-03-03T12:20:50+5:302024-03-03T12:29:19+5:30
Mahashivratri 2024: महादेवांच्या प्रतिकांना महत्त्व असून, त्याबाबत काही मान्यताही प्रचिलत असल्याचे पाहायला मिळते.
Mahashivratri 2024: ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून महादेव असे संबोधले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला. म्हणून नीलकंठ म्हटले जाऊ लागले. समस्त प्राणिमात्रा व पशूंचे स्वामी असल्याने ते पशुपती म्हणून ओळखले जातात. भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे. शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरू, प्रथम गुरू आहेत अशी मान्यता आहे. भारतीय सप्तऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिले, असे मानले जाते. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. शैव संप्रदायाचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. महादेवांची काही प्रतीके सांगितली जातात. ती शुभ मानली केली असून, त्याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते.
आजचे शिवस्वरुप म्हणजे ऋग्वेदातील रुद्र असे मानले जाते. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. उपवास, पूजा, रुद्र पठन, विविध शिव मंदिरातील यात्रा आणि जत्रा यांनी महाशिवरात्री उत्सव संपूर्ण भारत देशात संपन्न केला जातो. भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत. जाणून घेऊया, महादेवांच्या प्रतिकांविषयी...
‘ही’ प्रतीके आहेत महादेवांची ओळख
- शिवलिंग: भगवान शिवाचे निर्गुण आणि निराकार रूपाचे प्रतीक असलेले शिवलिंग ब्रह्मा, आत्मा आणि ब्रह्माण्डाचे प्रतीक आहे. वायु पुराणानुसार प्रलय काळात सर्व सृष्टी ज्यामध्ये मिळून जाते. पुन्हा सृष्टीकाळात ज्यापासून सृष्टी प्रकट होते त्यालाच शिवलिंग म्हणतात, असे सांगितले जाते.
- त्रिशूळ: भगवान शिवाजवळ नेहमी एक त्रिशूळ असते. त्रिशूल हे तीन प्रकाराच्या दैनंदिन, दैवीय, शारीरिक त्रासांच्या नायनाट करण्याचे सूचक आहेत. यामध्ये सत, रज आणि तम तीन प्रकारच्या शक्ती आहे. त्रिशुळाचे तीन शूळ सृष्टीच्या उदय, संरक्षण आणि लयीभूत होण्याचे प्रतिनिधित्व करतात. शैव मतानुसार शिव या तिन्ही भूमिकांचे अधिपती आहेत. हे शैव सिद्धांताच्या पशुपती, पशु आणि पाश यांचे प्रतिनिधित्व करतात.
- रुद्राक्ष : अशी आख्यायिका आहे की रुद्राक्षाचा जन्म शिवाच्या अश्रूंपासून झाला आहे. धार्मिक ग्रंथानुसार २१ मुखी रुद्राक्ष असल्याचे पुरावे आहेत, पण सध्या १४ मुखीनंतरचे सर्व रुद्राक्ष दुर्गम, दुर्मिळ आहेत. हे धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी मान्यता आहे.
- त्रिपुंड: भगवान शिव त्रिपुंड लावतात. हा तीन लांब पट्ट्या असलेला टिळा असतो. हे त्रेलोक्य आणि त्रिगुणांचे प्रतीक आहेत. हे सतोगुण, रजोगुण आणि तपोगुणाचे प्रतीक आहेत. त्रिपुंड दोन प्रकारचे असतात. पहिले तीन पट्ट्यांच्या मध्ये लाल रंगाचे ठिपके किंवा बिंदू असते. हा ठिपका शक्तीचा प्रतीक आहेत. सामान्य माणसाने अश्या प्रकाराचे त्रिपुंड लावू नये. दुसरे असतात फक्त तीन पट्ट्या असलेले त्रिपुंड. यामुळे मन एकाग्र होते, असे म्हणतात.
- रक्षा किंवा उदी: महादेव आपल्या शरीरावर उदी किंवा अंगारा लावतात. उदी जगाच्या निरर्थकतेचा बोध करवते. उदी आकर्षण, मोह, इत्यादी पासून विरक्तीचे प्रतीक आहे. देशातले एकमेव स्थळ उज्जैनच्या महाकाल मंदिरात शिवाची भस्मारती होते. यज्ञाच्या रक्षेत अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. प्रलय आल्यावर साऱ्या जगाचे नायनाट झाल्यावर उरते फक्त रक्षा.
- चंद्र: शिवाने भाली म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे. चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.
- नाग: महादेवांनी हलाहल हे समुद्रमंथनामधून निघालेले विष प्राशन केले; या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने गळ्यात घातला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते, यामुळे शिवाला नागेन्द्र असे संबोधले जाते.
- डमरू: हिंदू धर्मात सर्व देवी आणि देवतांकडे कोणते न कोणते वाद्य असल्याचे दिसून येते. त्याच प्रकारे भगवान शिवाकडे डमरू आहे, जे नादाचे प्रतीक आहे. भगवान शिवाला संगीताचे जनक मानतात. नाद म्हणजे एक असा ध्वनी किंवा आवाज जो संपूर्ण विश्वात सतत येत असतो ज्याला 'ॐ' असे म्हणतात. संगीतात अन्य स्वर ये-जा करतात, त्यांचा मधील असलेला स्वरच नाद किंवा आवाज आहे. नादातूनच वाणीच्या चारही रूपांचे पर, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी उत्पन्न झाल्याचे म्हटले जाते.
- कमंडलू: यामध्ये पाणी भरलेले असते, जे अमृताचे प्रतीक आहे. कमंडळू प्रत्येक योगी किंवा संतांकडे असल्याचे पाहायला मिळते.
- गंगा: गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता. म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले, म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.
- तिसरा डोळा: महादेवाच्या कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे. हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते की, जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही जळून खाक होऊ शकते, अशी मान्यता आहे. मदनाचा म्हणजेच कामदेवाचा मृत्यू असाच झाला, असे सांगितले जाते. महादेवांचा तिसरा डोळा हा खरा सत्यदर्शक प्रतिक आहे. त्यात क्रोध ही आहे आणि ममत्व ही. न्याय अन्याय यापलिकडे जाऊन तो सत्य पाहतो आणि दर्शवतो.
- व्याघ्रांबर: वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघरुपी रज-तमांवर विजय प्राप्त करून शिवाने त्याचे आसन केले आहे.
- नंदी: वृषभ हे शिवाचे वाहन आहेत. ते नेहमीच शिवासोबत असतात. वृषभ म्हणजे धर्म. वेदांनी धर्माला ४ पायांचे प्राणी म्हटलं आहे. त्यांचे ४ पाय म्हणजे धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष आहे. महादेव या ४ पाय असलेल्या वृषभाची स्वारी करतात. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्याचा स्वाधीन आहेत. एका मान्यतेनुसार, वृषभाला नंदी म्हणतात, जे शिवाचे एक गण आहे.