महाशिवरात्री: घरात शिवलिंग, शिवप्रतिमा नाही; पण व्रत करायचे आहे, मग काय करावे? पाहा, पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:57 PM2024-03-07T14:57:04+5:302024-03-07T14:58:28+5:30

Mahashivratri 2024: प्रत्येक प्रांतानुसार असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. महाशिवरात्रीला शिवपूजनाचे पर्याय जाणून घ्या...

mahashivratri 2024 know about what is option to do mahashivratri vrat if do not have shivling or shiv murti pratima at home | महाशिवरात्री: घरात शिवलिंग, शिवप्रतिमा नाही; पण व्रत करायचे आहे, मग काय करावे? पाहा, पर्याय

महाशिवरात्री: घरात शिवलिंग, शिवप्रतिमा नाही; पण व्रत करायचे आहे, मग काय करावे? पाहा, पर्याय

Mahashivratri 2024: मराठी वर्षांत महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी लाखो शिवभक्त मंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घेतात. जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. यंदा ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची ३ अंगे आहेत. मात्र, अनेकांच्या घरात शिवलिंग, शिवमूर्ती किंवा शिवाची प्रतिमा असतेच, असे नाही. पण व्रत करायची इच्छा असते. अशा परिस्थितीत भाविकांसमोर काय पर्याय आहेत? जाणून घेऊया...

प्रत्येक प्रांतानुसार त्या-त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते. कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली आहे. देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. 'कलियुगी नामची आधार", असे संतांनी सांगितले आहे. नामाचा संस्कार मनावर रुजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करताना; तसेच ते नाम ऐकताना देवतेच्या तत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. याप्रमाणे नामजप करताना तो एकाग्रतेने करावा, असे सांगितले जाते. 

शिवपूजेसाठीचे पर्याय

जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी. शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. यांपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा 'ॐ नमः शिवाय।' हा नाममंत्र लिहून त्याची पूजा करू शकतो. तसेच 'स्थूलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ', हा अध्यात्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. जसे साध्या बॉम्बपेक्षा अणुबॉम्ब आणि त्यापेक्षा परमाणू बॉम्ब हा अधिक शक्तिशाली असतो, त्याप्रमाणे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म गोष्टींमध्ये अधिक सामर्थ्य असते. या तत्त्वानुसार प्रत्यक्ष शिवपूजा करणे शक्य नसल्यास शिवाची मानसपूजाही करू शकतो. 'ॐ नमः शिवाय।' हा नामजप अधिकाधिक करा.

महाशिवरात्रीचा शिवपूजन विधी

महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन `शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते। असा संकल्प करावा. ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जत नसेल त्यांनी `हे जगत्पतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याचे चांगले फळ मला मिळो' असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्प करुन झाल्यावर शंकराचे आवाहन करावे. शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालोद्भव सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. वरीलप्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ॐ शिवाय नमः या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी. 
 

Web Title: mahashivratri 2024 know about what is option to do mahashivratri vrat if do not have shivling or shiv murti pratima at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.