२६ की २७ फेब्रुवारी? नेमकी महाशिवरात्री कधी? पाहा, निशीथकाल मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:42 IST2025-02-05T15:39:50+5:302025-02-05T15:42:43+5:30

Mahashivratri 2025 Date Time And Shubh Muhurat In Marathi: २०२५मध्ये महाशिवरात्री व्रत नेमके कधी करावे? शुभ मुहूर्त अन् निशीथकालाची वेळ जाणून घ्या...

mahashivratri 2025 know about date shubh muhurat nishita kaal timing and significance of maha shivratri vrat in marathi | २६ की २७ फेब्रुवारी? नेमकी महाशिवरात्री कधी? पाहा, निशीथकाल मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता

२६ की २७ फेब्रुवारी? नेमकी महाशिवरात्री कधी? पाहा, निशीथकाल मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता

Mahashivratri 2025 Date Time And Shubh Muhurat In Marathi: महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून, त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. सन २०२५ मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी? व्रताचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...

नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत. पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोजची रात्र ही  नित्यशिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासशिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योगशिवरात्र मानली जाते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून रहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो. स्नान, शिवपूजन द्वारे व्रत पूर्ण करावे. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. रात्रीच्या ४ प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेंची पाने वाहिली जातात. विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते. 

सन २०२५ मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी?

महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम्, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर इ.असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी माघ वद्य चतुर्दशी सुरू होत आहे. तर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ०८ वाजून ५४ मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहे. अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु, महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारी २०२५ च्या रात्री शिवपूजन करावे, असे सांगितले जात आहे. 

महाशिवरात्री २०२५चे शुभ मुहूर्त

महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. जलाभिषेकाचा रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ०१ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ४ प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पहिला सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून २५ पर्यंत असेल. दुसरा रात्री ९ वाजून २६ मिनिटांपासून वाजता सुरू होईल. रात्री १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल. तिसरा प्रहर मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांपासून ते उत्तररात्रो ३ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. चौथा आणि शेवटचा प्रहर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ४१ मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. महाशिवरात्रीला सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला निशीथकाल रात्री १२ वाजून २७ मिनिटांपासून ते ०१ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. 

महाशिवरात्री व्रताच्या काही मान्यता

देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. काही कथांनुसार, समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथांनुसार, या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला ‘जलरात्री’ असे संबोधले जाते. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो, असेही म्हटले जाते. 
 

Web Title: mahashivratri 2025 know about date shubh muhurat nishita kaal timing and significance of maha shivratri vrat in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.