Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांची परंपरा का? त्यामागचे नेमके कारण काय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 11:22 AM2023-01-05T11:22:26+5:302023-01-05T11:23:45+5:30

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला हळदी-कुंकू समारंभ असतोच, पण त्याबरोबर लेकी, सुना, नातवंडं, जावई यांचेही कोडकौतुक केले जाते, कसे ते पहा. 

Makar Sankranti 2023: Why the tradition of halwa ornaments on Makar Sankranti? What is the exact reason behind it? Find out! | Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांची परंपरा का? त्यामागचे नेमके कारण काय? जाणून घ्या!

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांची परंपरा का? त्यामागचे नेमके कारण काय? जाणून घ्या!

googlenewsNext

सण-उत्सव-हौस-मौज-सजणे-नटणे-मुरडणे-गोड-धोड हे सगळे हॅशटॅग नसून उत्सवाच्या नाना छटा आहेत. याशिवाय उत्सवाला पूर्णत्व नाहीच. मकरसंक्रांतीच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी तीळ गुळ आणि गुळाच्या पोळीच्या जोडीला हलव्याचे दागिने करणे, ही आपली परंपरा आहे. यानिमित्ताने नव दांपत्याचे, सुनेचे, लेकीचे आणि तान्ह्या बाळापासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचे कोडकौतुक करणे, हाच त्यामागचा हेतू. 

अलीकडच्या काळात आधुनिक राहणीमान असलेल्या मुला-मुलींनाही ते दागिने घालून मिरवण्यात अजिबात कमीपणा वाटत नाही. कारण, सोन्या-चांदीच्या दागिन्यांत असतात, तसे शेकडो प्रकार आता हलव्याच्या दागिन्यांमध्येही बघायला मिळतात. 

संक्रांतीला जावयाला ५ प्रकारचा हलवा देण्याची प्रथा आहे. बाजारात ३५हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. यात भोपळ्याची बी, टरबुजाची बी, कलिंगडाची बी, चुरमुरे, बडीशेप, काजू, पिस्ता, बदाम, लवंग, वेलची असे अनेक खाण्याच्या हलव्यांचे प्रकार आहेत. तर, दागिन्यांसाठी साबूदाणा, वरई, शेवई, तांदूळ यांवर काटेरी हलवा बनवला जातो. तो हलवा वापरून दागिन्यांसाठी पाना-फुलांचे छान नक्षीकाम केले जाते.

पूर्वी ठसठशीत दागिने घालण्याची पद्धत होती. १९९५ पासून डिझायनर दागिन्यांना मुलींची पसंती मिळू लागली. ग्राहकांची आवड लक्षात घेता दागिन्यातही नवे प्रकार दिसू लागले. कुंदन, टिकल्या, झीक, वेगवेगळ्या प्रकारचे मणी, हलवा यांनी युक्त मंगळसूत्र, ठुशी, हार, नथ, कानातले, वेल, बांगड्या, तोडे, कंठी, चिंचपेटी, गजरा, बाजूबंध तसेच नाजूक नक्षीकाम केलेले हलव्याचे दागिने ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतात. 

पुरुषांसाठी हलव्याच्या माळांनी सजवलेला फेटा, पगडी, हार, अंगठी, भिकबाळी, उपरणे तसेच मोबाईल, पेन, लॅपटॉप यांसह पारंपरिक हलव्याच्या दाण्यांनी सजवलेले श्रीफळ बनवून देतात.

तान्ह्या बाळाचे बोरन्हाण करण्यासाठी `वाळा सेट' बनवला जातो, ज्यात श्रीकृष्णाच्या पेहराव्यासकट, गळ्यातला हार, गजरे, मुकुट, बासरी, मोरपीस असते. तर, छोट्या मुलींसाठी हेअरबँड मुकुट (टियारा), माळ, हेअरपीन, कानातले, बांगड्या ह्यांचा सेट मिळतो. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तऱ्हेतऱ्हेचे दागिने मिळतात. 

मुलींची वाढती हौस पाहता हलव्याच्या दागिन्यांमध्ये आता हलव्याची सजावट केलेली साडी, हेअरक्लिप, चप्पल, पर्स ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंडावळ्या आणि फुलांच्या वाडीप्रमाणे हलव्याची वाडीही विक्रीस ठेवण्यात आली आहे. तर, जावयांना त्यांच्या व्यवसायाप्रमाणे भेट देण्यासाठी- लेखकाला हलव्याचे पेन, वैमानिकाला हलव्याचे विमान, मोटरमनला हलव्याची ट्रेन असेही पर्याय उपलब्ध केले जातात. आता तर बायका तिळवणासाठी जाताना मैत्रीणीच्या सुनेला, जावयाला, बाळाला 'भेट' म्हणूनही हलव्याचे छोटे-मोठे दागिने घेऊन जातात. 

हलव्याच्या दागिन्यांची हौस आता महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सातासमुद्रापार जाऊन पोहोचली आहे. एका सणाने, परंपरेने, संस्कृतीने किती गोष्टी, लोक जोडले जातात, ह्याचे उदाहरण आपल्याला ह्या 'शुभ्र दागिन्यांच्या परंपरेतून' लक्षात आलेच असेल. तर आपणही आनंदाची परंपरा आपल्या घरातूनही रुजू द्या, त्यासाठी तिळगूळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड गोड दिसा!

Web Title: Makar Sankranti 2023: Why the tradition of halwa ornaments on Makar Sankranti? What is the exact reason behind it? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.