Makar Sankranti 2024: संक्रांती एक दिवसाचा उत्सव नाही तर ही संघटित होण्याची प्रक्रिया!- प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:31 PM2024-01-16T12:31:27+5:302024-01-16T12:31:41+5:30
Makar Sankranti 2024: संक्रांतीला काळ्या रंगाला, तीळगुळाला, पतंगाला महत्त्व आहेच, पण या सणाचे विस्तृत स्वरूप जाणून घेऊया आठवले शास्त्री यांच्या विचारांतून!
संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत म्हटले जाते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून या काळाला उत्तरायण असेही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले असते. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्यादेखील आगळे महत्त्व आहे.
'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे प्रयाण करणयाची वैदिक ऋषींची प्रार्थना. या दिवसापासून अंधार हळू हळू कमी होत जातो. देव देखील या दिवशी झोपेतून उठतात. चांगली कामे करायला या शुभ दिवसाने सुरुवात होते. धार्मिक हिंदू मकर संक्रांतीनंतर मृत्यू यावा असा जप करतात. भीष्मपितामह याचे ज्वलंत उदाहरण आहे. उत्तरायणात मृत्यूची आकांक्षा महणजे तेजस्वी व प्रकाशमय मरणाचा जप.
मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय. मानवाचे जीवनही अंधकार व प्रकाश यांनी वेढले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या पांढऱ्या तंतूंनी विणलेले आहे. संक्रांतीच्या दिवशी माणसानेही संक्रमण करण्याचा शुभसंकल्प करायचा असतो.
संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांतीमध्ये परिस्थिती परिवर्तनाची आकांक्षा असते. तर संक्रांतीमध्ये सम्यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. हे विचारक्रांतीने शक्य आहे. क्रांतीमध्ये हिंसेला महत्त्व असू शकते, परंतु संक्रांतीध्ये समजुतीचे साम्राज्य पसरलेले असते.
संक्रांती म्हणजे संग क्रांती. माणसाने या दिवशी संगयुक्त होण्याचा संकल्प केला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांच्या परिमाणापासून शक्य तेवढे मुक्त राहिले पाहिजे.
संक्रांती म्हणजे संघ क्रांती. कोणत्याही महान कार्याला संघटनेची गरज असते. संघे शक्ति कलौ युगे. अर्थात संघात विशिष्ट शक्ती निर्माण होते. ह्या विशाल विश्वात कोणतेही काम करण्यासाठी एकटा माणूस अपुरा आहे. त्याच्या शक्तीला मर्यादा आहेत. संघामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती विपुल प्रमाणात असते. कोणतेही कठीण कार्य सोपे बनवते. संघनिष्ठेच्या कार्यात प्रभू निष्ठा असली पाहिजे.