Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला 'या' वस्तूंचे दान पापांचा हलका करतील भार आणि उघडेल भाग्याचे द्वार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:59 IST2025-01-08T12:59:00+5:302025-01-08T12:59:26+5:30
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला तुमच्या नशिबाची पतंग उंचच उंच भरारी मारत वर जावी म्हणून ज्योतिष शास्त्राने सांगितलेला उपाय करा.

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला 'या' वस्तूंचे दान पापांचा हलका करतील भार आणि उघडेल भाग्याचे द्वार!
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते, त्यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठा होतो. तसेच हा कालावधी पुण्यसंचयाचा काळ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या पर्वात पुढील गोष्टी केल्यास लाभ होतो.
जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2025) सण साजरा केला जातो. २०२५ मध्ये, १४ जानेवारी रोजी तो साजरा केला जाणार आहे. हा सण देशातील सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. नाव वेगवेगळे असले तरी आनंद, उत्साह सर्वत्र सारखाच असतो आणि या आनंदाच्या क्षणांत दुसऱ्यांनाही आनंद देता यावा या दृष्टीने दान धर्मदेखील केला जातो. मात्र दान कोणत्या वस्तूंचे करावे ते जाणून घेऊ.
दानाचे महत्त्व :
ज्योतिष तज्ज्ञ सांगतात मकर संक्रांतीला दानाचे महत्त्व- 'मकर संक्रांती यावेळी १४ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांत साजरी करण्याचे विशेष कारण म्हणजे सूर्य धनु राशीतून मकर राशीत जातो. उत्तरायण सुरु होते. या निमित्ताने नात्यांची स्निग्धता आणि गोडवा वाढावा म्हणून तीळ, गूळ, तांदूळ, उडीद अशा पदार्थांचे दान करावे असे सांगितले जाते.
असेही करता येईल दान :
मकर संक्रांतीच्या दिवशी लोक दान करतात, उपवास करतात, स्नान करतात आणि विधी करतात. मकर संक्रांतीनंतर थेट होळी पर्यंत थंडी सुरु असते. त्यामुळे या काळात संक्रांतीच्या निमित्ताने गोर गरिबांना शाल, स्वेटर, हात मोजे, पाय मोजे दान करू शकता. अन्नदान करू शकता. आधुनिक काळाची गरज ओळखून रक्तदानदेखील करू शकता. आपण केवळ घेण्यासाठी नाही तर देण्यासाठीही जन्माला आलो आहोत याची जाणीव या सणांच्या निमित्ताने धर्म शास्त्राकडून केली जाते, तिचे पालन करूया आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवून पुण्यसंचय करूया. तसेच मिठाई, गजक, तिळवडी, गुळपोळी, खिचडी, भाजी, भाकरी असेही पदार्थ दान करू शकता.
कुमारिकांना दान :
पूर्वीच्या काळी संक्रांतीच्या निमित्ताने ब्राह्मण भोजन दिले जाई. आताही आपण ते करू शकता. भोजन शक्य नसेल तर शिधा देऊ शकता. त्याबरोबरच कुमारिकांना शालेय उपयोगी वस्तू तसेच गोर गरिबांना अन्न, धान्य दान करू शकता. ज्यामुळे तुम्हाला पुण्यसंचय करता येईल.