२०२५ला मकरसंक्रांती कधी? अद्भूत योगात करा दान; पाहा, संक्रमण पुण्यकाल अन् शुभ मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:15 IST2025-01-04T10:08:28+5:302025-01-04T10:15:38+5:30

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जातो. शुभ योग, शुभ मुहूर्त जाणून घ्या...

makar sankranti 2025 know about date time shubh muhurat yoga and significance in marathi | २०२५ला मकरसंक्रांती कधी? अद्भूत योगात करा दान; पाहा, संक्रमण पुण्यकाल अन् शुभ मुहूर्त

२०२५ला मकरसंक्रांती कधी? अद्भूत योगात करा दान; पाहा, संक्रमण पुण्यकाल अन् शुभ मुहूर्त

Makar Sankranti 2025 Date And Time: सन २०२५ मधील पहिला मोठा सण म्हणजे मकरसंक्रांती. इंग्रजी नववर्ष सुरू झाले की, बाजारात पतंग, सुगड, तिळगूळाचे सामान, वाण सामान यांचा भरणा सुरू होतो. मकरसंक्रांतीची लगबग सुरू होते. संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रात म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. सन २०२५ मध्ये मकरसंक्रांती कधी आहे? मकरसंक्रांतीला येणारे शुभ योग, शुभ मुहूर्त जाणून घेऊया...

भारतीय सणांना केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते, असे नाही. वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही भारतीय सणांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचे अवयव आखडून जातात. रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. त्यामुळेच मकरसंक्रांतीला तिळगूळ खाण्याला महत्त्व असते. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे. सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात, एखाद्या इमारतीच्या छपरावर जावे लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते.

मकरसंक्रांती: १४ जानेवारी २०२५

संक्रमण पुण्यकाल: सकाळी ०८ वाजून ५४ मिनिटे ते सायंकाळी ०४ वाजून ५४ मिनिटे.

अभिजित मुहूर्त: दुपारी १२ वाजून ०९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ५१ मिनिटे.

विजय मुहूर्त: दुपारी ०२ वाजून १५ मिनिटे ते दुपारी ०२ वाजून ५७ मिनिटे.

गोधूली मुहूर्त: सायंकाळी ०५ वाजून ४३ मिनिटे ते ०६ वाजून १० मिनिटे.

अमृत ​​काल: सकाळी ०७ वाजून ५५ मिनिटे ते ९ वाजून २९ मिनिटे.

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते.  मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यांमध्ये उत्तरायण, पोंगल इत्यादी नावांनी ओळखला जातो. सर्वसाधारणपणे मकरसंक्रांती १४ जानेवारी रोजी येते. भारतीय संस्कृतीतील सगळ्या सणात इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकरसंक्रांत होय. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत वर्षभरात बारा राशीतून फिरताना दिसतो. अशा बारा संक्रांतींपैकी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आपण मकरसंक्रांत म्हणून साजरे करतो. सध्या १४-१५ जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून हा सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आहे. यंदाच्या मकरसंक्रातीला पुष्य नक्षत्राचा योग जुळून येत आहे. 

संपूर्ण भारतात मकरसंक्रमण साजरे केले जाते
 
मकर संक्रमणापेक्षा उत्तरायण आरंभ ही या सणाची मुलभूत संकल्पना आहे. सूर्याचे रोज निरीक्षण केले असता सूर्य हा सहा महिने उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकताना दिसतो.  थंडीपासून बचाव करण्यासाठी तीळ-गूळ यासारखे उष्ण पदार्थ खाणे, काळे कपडे घालणे अशा प्रथा सुरु झाल्या. कृषी संस्कृतीच्या साहचर्यातून या काळात शेतात पिकलेले धान्य, फळे देवाला अर्पण करून एकमेकांना वाण देणे सुरु झाले. लोहडी (पंजाब ), भोगाली बिहु (आसाम), खिचडी संक्रांत (बिहार). पौष संक्रान्ति (बंगाल), पोंगल(तमिळनाडू), मकर वल्लाकु (केरळ) अशा वेगवेगळ्या नावाने संपूर्ण भारतात मकरसंक्रमण साजरे केले जाते. या काळात स्नान, दान-धर्म आदी कार्ये शुभ मानली जातात.

दरम्यान, महाराष्ट्रात तीन दिवस हा सण साजरा करतात. १३ तारखेला भोगी, १४ तारखेला संक्रात आणि १५ तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते. संक्रांत म्हणजे संक्रमण. ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. मकरसंक्रातीला दान करणे, गंगा स्नान करणे शुभ मानले गेले आहे.

 

Web Title: makar sankranti 2025 know about date time shubh muhurat yoga and significance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.