makarsankranti 2021 : मकर संक्रांतीच्या दिवशी चुकवू नयेत, असे शुभ मुहूर्त!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 13, 2021 07:42 PM2021-01-13T19:42:02+5:302021-01-13T19:42:39+5:30
Makarsankranti 2021: मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्यामुळे अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते.
मकर संक्रांतीपासून वर्षातील सणांची सुरुवात होते. त्यामुळे मकर संक्रांती सणाचे विशेष महत्त्व आहे. सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतात, त्याला मकर संक्रांत म्हणतात. तसेच सूर्याचे उत्तर दिशेने भ्रमण सुरु होते, याला उत्तरायण असे म्हणतात. खरमास समाप्त होतो. उत्तरायणामुळे अंधाराचे प्राबल्य कमी होऊन प्रकाशाचे प्राबल्य वाढू लागते. यासुमारात देवही जागे होतात. म्हणून प्रकाशाच्या साक्षीने मंगलकार्याला सुरुवात होते. म्हणून पंचांगाच्या मदतीने शुभ मुहूर्त देत आहोत.
मकर संक्रांतीची शुभ वेळ:
१४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. यादिवशी सकाळी ८.३० वाजता सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणार आहे. यादिवशी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ ९ तास १६ मीनिटे असणार आहे. सकाळी ८.३० मीनिटांपासून सुरू होऊन सायंकाळी ५ वाजून ४६ मीनिटांपर्यंत असणार आहे. दानधर्माच्या दृष्टीने सकाळी ८.३० ते १०. १५ ही वेळ शुभ आहे.
हेही वाचा : Makarsankranti 2021: मकर संक्रांतीला होतील 'छोट्या' दानाचे 'मोठे' फायदे!
मकर संक्रांतीचे महत्त्व :
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यस्नान, दान आणि सूर्यपूजा या तीन गोष्टींना विशेष महत्त्व असते. सूर्याची पूजा करून लाल वस्त्र, गहू, गुळ, मसूर डाळ, सुपारी, लाल फुल, नारळ दक्षिणा असा शिधा गरजू व्यक्तीला दान दिला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्यामुळे अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते.
धार्मिक शास्त्रानुसार मकर संक्रांतिच्या दिवशी सूर्यदेवाचा रथ उत्तर दिशेला वळण घेतो. त्यामुळे सूर्याचे मुख पृथ्वीच्या दिशेने वळते आणि सूर्य पृथ्वीच्या अधिकाधिक निकट येताना दिसू लागतो. त्यामुळे पिकांची भरघोस वाढ होते. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मकर संक्रांतीला सूर्याला सुगड पूजन केले जाते. तसेच सवाष्ण स्त्रियांना वाण देताना ऊसाचे कर्वे, बोर, चिंच हे वैभवाचे प्रतीक म्हणून दान देतात. जशी माझ्या घरात भरभराट झाली, तशी तुझ्याही घरी होवो, ही त्यामागील सद्भावना असते.