Makarsankranti 2021 : तुमच्या भाग्याचा पतंग घेईल भरारी, जर मकर संक्रांती राशीप्रमाणे कराल साजरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 04:57 PM2021-01-11T16:57:21+5:302021-01-11T17:00:11+5:30
Makarsankranti 2021 : बारा राशींसाठी विशिष्ट पूजा शास्त्रात सुचवली आहे. आपल्या राशीप्रमाणे दिलेल्या सूचनेचा अवलंब केल्यास पुढील वर्षभर आपल्या भाग्याचा पतंग आकाशात भरारी घेत राहील.
१४ जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. त्याच दिवशी उत्तरायणास सुरुवात होत आहे. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत म्हटले जाते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून या काळाला उत्तरायण असेही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले असते. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्यादेखील आगळे महत्त्व आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच या दिवसापासून पुढे वर्षभर सूर्याला अर्घ्य देत, सूर्याची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार सुरू केल्यास सुदृढ आरोग्य लाभते. तसेच संक्रांतीचा काळ थंडीचा असल्यामुळे गोरगरीबांना अन्न, वस्त्र दान करणे उचित ठरते. नात्यांमधील वितुष्ट दूर करण्यासाठी तिळगुळाचे वाण देऊन हितशत्रूंपासूनही मुक्तता करता येते.
याशिवाय, बारा राशींसाठी विशिष्ट पूजाही शास्त्रात सुचवली आहे. आपल्या राशीप्रमाणे दिलेल्या सूचनेचा अवलंब केल्यास पुढील वर्षभर आपल्या भाग्याचा पतंग आकाशात भरारी घेत राहील.
मेष : पाण्यात पिवळे फुल , हळद, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच तीळ गुळाचे दान द्यावे.
वृषभ : पाण्यात चंदन, दूध, पांढरे फुल , तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे.
मिथुन : पाण्यात केवळ तीळ टाकून सूर्याची बारा नावे घेत अर्घ्य द्यावे.
कर्क : पाण्यात दूध, तांदूळ, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. संकटातून मुक्ती मिळेल.
सिंह : पाण्यात लाल फुल आणि कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे.
कन्या : पाण्यात दूध, तांदूळ, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे.
तुळ : चंदन, दूध, तांदळाचे दान करावे.
वृश्चिक : पाण्यात लाल फुल , कुंकू मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे, तसेच गुळाचे दान करावे.
धनु : पाण्यात हळद, केशर, पिवळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे.
मकर : पाण्यात काळे तीळ, निळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे.
कुंभ : पाण्यात काळे तीळ, निळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे व काळ्या तीळाचे दान करावे.
मीन : पाण्यात केशर, हळद आणि पिवळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे.