Makarsankranti 2021 : मकर संक्रांतीची तारीख दर ७६ वर्षांनी तारीख पुढे सरकते; का ते सविस्तर वाचा!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 14, 2021 04:19 PM2021-01-14T16:19:03+5:302021-01-14T16:32:28+5:30
Makarsankranti 2021 : अगदी पूर्वी मकर संक्रांत दहा जानेवारीला येत असे, नंतर ती एकेका दिवसाने वाढत चौदा जानेवारीला आणि आता मध्येच ती पंधरा जानेवारीलादेखील येते. आणखी काही वर्षांनी १४-१५ जानेवारी करता ती १५ जानेवारीला येऊ लागेल.
मकर संक्रांत सण अतिप्राचीन मानला जातो. मकर संक्रांती पौष मासात येत असली, तरी तिची तिथी निश्चित नाही. त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे. नेमकेपणाने सांगायचे, तर सूर्याचा मकर राशीतील प्रवेश अधिक मासामुळे शुक्ल किंवा कृष्ण पक्षात होतो. मात्र, संक्रांतीची तिथी निश्चित नसली, तरी लाघवीय पंचांगानुसार ती इंग्रजी महिन्याच्या १४ जानेवारी या तारखेला येते. 'धर्मबोध' या ग्रंथात ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर यांनी माहिती दिली आहे, की-
या तारखेतही दर ७६ वर्षांनी फरक पडून ती एका दिवसाने पुढे जाताना दिसते. अगदी पूर्वी ती दहा जानेवारीला येत असे, नंतर ती एकेका दिवसाने वाढत चौदा जानेवारीला आणि आता मध्येच ती पंधरा जानेवारीलादेखील येते. आणखी काही वर्षांनी १४-१५ जानेवारी करता ती १५ जानेवारीला येऊ लागेल. या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो, म्हणून या संक्रांतीला अयन-संक्रांती असे म्हटले जाते.
संक्रांती ही देवता आहे, असे मानून हिंदू पंचांगामध्ये तिचे चित्र आणि त्या त्या वर्षीचे स्वरूप वर्णन दिलेले असते. दरवर्षी तिची भूषणे, वाहन, भक्षणपदार्थ, भोजनाचे पात्र, वय, आयुधे आणि नाव बदलत असते. सर्वांन नवे वर्ष कसे जाईल, याचा अंदाज संक्रांतीच्या त्या वर्षीच्या स्वरूपावरून केला जातो.
हेही वाचा : makarsankranti 2021 : मकर संक्रांतीच्या दिवशी चुकवू नयेत, असे शुभ मुहूर्त!
या संक्रांतीने संकासूर नावाच्या दैत्याचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले, अशीही एक कथा आहे. अनेक विचारवंतांनी संक्रांतीचा संबंध अतिप्राचीन काळाशी जोडला आहे. ध्रुव प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आर्यांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत होती, असे मानले जाते.
ध्रुव प्रदेशात सहा महिने रात्र व सहा महिने दिवस अशा दोन भागांमध्ये वर्षाची विभागणी होई. त्या दिवशी सूर्यकिरणांनी अंधाराचे साम्राज्य नष्ट होई. थंडीने गारठलेल्यांना सूर्याची सुखद उब मिळू लागे. त्यानंतर सर्व जण आनंदून हा दिवस सण म्हणून साजरा करू लागले. त्या काळात शिशिर ऋतूला नवीन वर्षाचा प्रारंभ होत असे. साहजिकच नव्या वर्षाचा पहिला सण म्हणून तो उत्साहाने साजरा होऊ लागला. पुढे कालगणनेतील बदलातून वसंत ऋतू हा वर्षाचा पहिला ऋतू मानला जाऊ लागला.