Makarsankranti 2021 : सण भोगीचा, ठेवा आनंदाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 13, 2021 07:31 PM2021-01-13T19:31:57+5:302021-01-13T19:33:16+5:30

Makarsankranti 2021: भोगी म्हणजे भोगणे. परंतु हे भोग चांगल्या अर्थाने उपभोगा. उत्सवाच्या क्षणांना मनावरचे मळभ दूर करून प्रत्येक क्षण साजरा करा, उपभोगून घ्या, असा त्याचा अर्थ आहे.

Makarsankranti 2021: Importance of Bhogi festival celebrating Before Makar Sankranti | Makarsankranti 2021 : सण भोगीचा, ठेवा आनंदाचा!

Makarsankranti 2021 : सण भोगीचा, ठेवा आनंदाचा!

googlenewsNext

आज मकर संक्रांतीच्या आदला दिवस, भोगीचा म्हणून ओळखला जातो. घरोघरी भोगी निमित्त मिश्र भाज्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि सर्वांची आवडती खिचडी असा बेत आखलेला असेल. हेच वैशिष्ट्य आहे भोगीचे!

भोगी म्हणजे भोगणे. परंतु हे भोग चांगल्या अर्थाने उपभोगा, असे सांगितले आहे. उत्सवाच्या क्षणांना मनावरचे मळभ दूर करून प्रत्येक क्षण साजरा करा, उपभोगून घ्या, असा त्याचा अर्थ आहे. कारण इंग्रजी वर्षाची सुरुवात या मकर संक्रांतीच्या सणाने होते. हा सण आयुष्याचा गोडवा वाढवणारा आहे. हा गोडवा वर्षभर टिकवायचा, म्हणून हा आनंद पुरवून पुरवून उपभोगी, जणू काही अशी सूचना आपल्या संस्कृतीने केली आहे. म्हणून भोगीचे महत्त्व!

हेही वाचा : Makarsankranti 2021: मकर संक्रांतीला होतील 'छोट्या' दानाचे 'मोठे' फायदे!

तसेच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे, याला भोग चढवणे असे म्हणतात. त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी,

तिळाची तेल कापसाची वात,
दिवा तेवो मध्यान्ह रात!

दोन ओळीत केवढा आशय सामावला आहे पहा. तीळाचे तेल आणि कापसाची वात, बाजारातून विकत आणलेली नाही बरं, तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो, एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठायी असू दे रे देवा महाराजा! आपल्याकडे शेत नाही, की आपण शेतकरी नाही. परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होवो म्हणून नक्कीच करू शकतो. कारण आपला अन्नदाता सुखी राहिला, तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी!

भोगी साजरी का करावी?

या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतो. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरूवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत.  तामिळनाडूत हा सण "पोंगल " व आसाम मध्ये " भोगली बिहू " आणि पंजाब मध्ये " लोहिरी " ,राजस्थान मध्ये " उत्तरावन " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगिकारलं जातं. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे.

या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी  अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. म्हणजे तुम्ही वसई-पालघरकडे वाडवळांकडे जेवायला गेलात, तर त्यांची पद्धत एकदम भिन्न असलेली दिसते. किंबहुना त्यांची पद्धत उंधियुच्या एकदम जवळ जाणारी आहे आणि त्यांनी या भाजीला दिलेलं नावही भन्नाट आहे-उकडहंडी. भोगीची भाजी करायची अजून एक पद्धत आहे. ही पद्धत कोकणातल्या माणसांची आहे. भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी, कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते. 

हेही वाचा :Makarsankranti 2021: मकर संक्रांत विशेष हलव्याच्या दागिन्यांची परंपरा आणि त्याला आधुनिकतेची जोड!

Web Title: Makarsankranti 2021: Importance of Bhogi festival celebrating Before Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.