पुढच्या वर्षाचे नाही, तर पुढच्या पाच वर्षांचे संकल्प आखा आणि त्यावर काम सुरू करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:41 PM2021-12-09T14:41:21+5:302021-12-09T14:42:25+5:30
प्रत्येक बाबतील दूरदृष्टी हवी. 'पुढे काय?' या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत असेल तर आपण बेसावध कधीच राहत नाही.
नवीन वर्ष येताच आपल्याला पहिली गोष्ट आठवते, ती म्हणजे संकल्पांची! गेल्या वर्षीचे संकल्प बारगळलेले असतातच, तरीदेखील आपले मन पुढच्या वर्षाच्या संकल्पाची यादी आपल्यासमोर ठेवते. परंतु, तुम्ही जर सुज्ञ असाल, हुशार असाल, तर केवळ पुढच्या वर्षीचा नाही, तर पुढच्या पाच वर्षांच्या संकल्पाची आखणी कराल आणि त्यावर मेहनत सुरू कराल. जशी 'या' राजाने केली....
एका गावाचा नियम होता. त्या गावात जी व्यक्ती राजा म्हणून नियुक्त होईल, तिला सगळा राजेशाही थाटमाट, आदर, श्रीमंती उपभोगण्यास मिळत असे. परंतु राजपदाचा कार्यकाल केवळ पाच वर्षांचा असे. त्यानंतर गावकरी स्वत: त्या राजाची मिरवणुक काढत नदीपलीकडच्या जंगलात सोडून येत असत. तिथे गेलेली व्यक्ती आजवर कधीच परतली नव्हती. त्यामुळे राजपदावर बसण्याच्या वेळी पुढच्या पाच वर्षांनंतरची मृत्यूची भीती राजाला अस्वस्थ करीत असे.
त्या गावात एक विद्वान होता. गावकऱ्यांची इच्छा होती की यंदाच्या निवडणुकीत त्या विद्वानाने राज्यपदी बसावे. मात्र विद्वानाला नियम माहित असल्याने त्याने स्पष्ट नकार दिला. तरी गावकऱ्यांनी तगादा लावल्याने विद्वान राज्यपदावर बसायला तयार झाला. त्याआधी त्याने नदीपलीकडचे जंगल बघायचे ठरवले. व त्यानुसार जंगलाची पाहणी केली. तिथे त्याला यापूर्वीच्या राजांचे सापळे दिसले. कारण जंगली प्राण्यांनी त्यांना मारून त्यांचे मांस खाऊन टाकले होते. विद्वानाने दोन चार गावकऱ्यांना हाताशी घेऊन सर्व जंगलाची पाहणी केली व राज्याभिषेक झाल्यावर तो राज्य सांभाळू लागला.
राज्याचे कामकाज करत असतानाच त्याने नदीकडून पलीकडचा परिसर यांना जोडणारा चांगला मार्ग बनवून घेतला. पुढच्या वर्षी त्याने प्राणिमित्रांना बोलावून जंगलातील हिंस्त्र श्वापदांचे आणखी घनदाट जंगलात स्थलांतर केले. त्यानंतर पलीकडची जागा शेतीसाठी अनुकूल करून घेतली. रोजगार उपलब्ध झाल्याने लोक तिथे वस्तीसाठी जाऊ लागले. अन्य लोकांचीही भीड चेपली. दोन्ही बाजूला येजा सुरू झाली.
असे कामकाज पूर्ण करून विद्वान राजा म्हणून निवृत्तीसाठी तयार झाला. त्याला पाहण्यासाठी गाव गोळा झाले. मात्र या आधीच्या राजांसारखे त्याच्या चेहऱ्यावर भय, पश्चात्ताप, चिंता काहीच दिसले नाही. लोकांनी त्याला निरोप दिला आणि त्याच्या आनंदाचे कारण विचारले, तेव्हा विद्वान म्हणाला, `आजवर लोकांना ज्या जागेची भीती वाटत होती, त्या परिसराचे आज नंदनवन झाले आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. मला कसलीही भीती नाही. तिथे जावे लागणार हे माहित असल्याने मी पाच वर्षांच्या कार्यकालात राजपद सांभाळून पुढच्या आयुष्याची तजवीज केला आणि आता त्या नव्या गावात मला राजा होण्याची संधी परत चालून आली आहे.
याला म्हणतात दूरदृष्टी! तिचा अभाव असून उपयोग नाही. आयुष्यातल्या प्रतिकूल प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आधीपासून केलेली असते, तेव्हा भविष्याच्या काळजीने वर्तमान बिघडत नाही!