आयुष्य संपवायला निघालेल्या माणसाला मिळाला इच्छापूर्ती करणारा घडा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 02:34 PM2021-12-30T14:34:05+5:302021-12-30T14:34:33+5:30
कोणता क्षण आपल्यासाठी काय घेऊन येईल सांगता येत नाही. त्यामुळे हिम्मत न हारता थोडा संयम बाळगला तर दिवस नक्की पालटतील.
एक नैराश्यग्रस्त तरुण सगळ्या क्षेत्रात आणि कौटुंबिक जबाबदारीत अपयश मिळाल्यामुळे आत्महत्या करायला एका नदीवर आला. तिथल्या पुलावरून त्याने नदीत जीव द्यायचा निर्णय घेतला. त्याचवेळेस त्या नदीत एक साधू संध्या करत होते. त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले. त्याच्या देहबोलीवरून तो आत्महत्या करणार हे स्पष्ट दिसत होते. साधू त्याला अडवणार तोच त्या तरुणाने नदीत झेप घेतली आणि मृत्यूला मिठी मारली. साधूंनी मागचा पुढचा विचार न करता स्वतःला नदीत झोकून दिले आणि पोहत पोहत त्या तरुणाला सावरले. नाका तोंडात पाणी गेल्याने तो तरुण बेशुद्ध पडला होता. साधूंनी त्याला ओढत तीरावर आणले.
काही वेळाने तरुण शुद्धीवर आला. साधूंनी त्याला अनेक प्रश्न विचारले आणि आत्महत्येचे कारण विचारले. तरुण म्हणाला, 'महाराज मी सगळीकडे अपयशी ठरलो. आता मृत्यू कवटाळायचा ठरवला तर त्यातही अपयशीच झालो. मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला असमर्थ ठरलो म्हणून जीव देत होतो.
साधू म्हणाले, 'अरे वेड्या, एवढंच ना. त्यासाठी जीव कशाला द्यायचा? माझ्याकडे एक घडा आहे. त्याच्यात तू डोकावून तुझी इच्छा प्रगट केलीस तर तुझी इच्छापूर्ती होईल. मात्र तो घडा मिळवण्यासाठी तू माझ्या सान्निध्यात किमान दोन वर्षे राहायला हवे. तू नीट वागलास, माझी आज्ञा पालन केलीस तर मी तुला तो घडा बक्षीस म्हणून देईन. आणि तू पाच वर्षे माझ्याकडे राहिलास तर तुला इच्छापूर्ती घडा कसा बनवायचा हे शिकवेन.'
तरुणाने खूप विचार केला आणि म्हणाला, 'महाराज मी दोन वर्षे राहायला तयार आहे!'
साधू महाराजांनी त्याला खूप छान शिकवण, संस्कार, आदर्श जीवन आणि यशस्वी होण्याचे मंत्र दिले. त्याने चांगल्या शिष्याप्रमाणे सगळी विद्या संपादन केली आणि दोन वर्षांनी साधूंकडून तो घडा मिळवला. तो घडा खरोखरंच चमत्कारिक होता. त्याने पैशांची मागणी करताच पैसे मिळाले. सोने नाणे मिळाले. साधू म्हणाले 'आणखी तीन वर्षे थांबलास तर तुला हा घडा कसा बनवायचा हेही शिकवतो.'
तरुणाचे काम साधले होते. त्याने घडा घेतला साधू महाराजांना नमस्कार केला आणि निघाला. बघता बघता तो धनाढ्य झाला. त्याला जे हवे ते सर्वकाही मिळाले. आता आयुष्यात काही मिळवायची अपेक्षाच राहिली नव्हती. घड्यात डोकावले की जे हवे ते मिळे. या सर्व सुखामुळे तो विलासी आयुष्य जगू लागला. यातच त्याला वाईट सवयीदेखील जडल्या. तो मद्यपान करू लागला. घरात, समाजात हैदोस घालू लागला. आपल्याकडे असलेल्या घड्याचा आणि त्यामुळे मिळालेल्या श्रीमंतीचा त्याला गर्व झाला. आणि एके दिवशी नशेच्या भरात त्याच्याकडून तो इच्छापूर्तीचा घडा फुटला.
घडा फुटताच त्याची नशा उतरली आणि सगळे वैभव लुप्त झाले. तो धाय मोकलून रडू लागला. त्याला साधू महाराजांची आठवण आली. आज ना उद्या घडा फुटणार होता. पण आपण दोन वर्षे राहिलो त्याजागी पाच वर्षे राहून सेवा केली असती, तर मला असे अनेक घडे साकारता आले असते आणि ते विकून अमाप पैसा कमवता आला असता. पण आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालो आणि संयम गमावून बसलो.
तरुणाच्या हातून घडा फुटला पण साधूंच्या सान्निध्यात शिकलेल्या गोष्टींमुळे त्याला जीवनाला सुयोग्य वळण मिळाले आणि त्याने कष्टाने गतवैभव पुनश्च उभे केले.
म्हणूनच थोर मंडळी सांगतात, एक तर सत्पुरुषांचा संग धरा अन्यथा ज्ञानाची कास धरा. या दोन्ही गोष्टी अर्धवट सोडल्या तर तुम्हाला खरे ज्ञान कधीच मिळणार नाही आणि तुमचा अनुभवाचा घडा कायम पालथाच राहील.... !