Mangala Gauri Vrat 2022: लग्नाच्या पहिल्या पाच वर्षांत नववधू मंगळागौरीची पूजा का करतात,त्यामागे आहे 'ही' कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 03:47 PM2022-08-01T15:47:59+5:302022-08-01T15:48:34+5:30
Mangala Gauri Vrat 2022: अखंड सौभाग्य आणि सद्भाग्यप्राप्तीसाठी हे व्रत सांगितले जाते. वाचा त्यामागची कथा...
नवीन लग्न झालेल्या मुलींना वशेळी म्हणतात. या मुली सौभाग्य टिकून राहावे यासाठी लग्नानंतर पहिली पाच वर्षे मंगळागौरीची यथासांग पूजा करतात, जागरण करतात, देवीची आरती करतात आणि तिची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करतात. हे व्रत करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ही कथा साधारण सत्यनारायण कथेप्रमाणे आहे. साधू वाण्याप्रमाणे इथेही एक धनपाल वाणी आहे. त्या कथेचा सारांश असा-
धनपाल वाण्याला मूल नव्हते. त्याच्या दारात रोज एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी येत असे. पण अपत्यहीन वाण्याकडची भिक्षा नाकारून तसाच परत जाई. एकदा वाण्याच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने लपून बसून अचानक पुढे होऊन त्या गोसाव्याला भिक्षा वाढली. त्यामुळे गोसावी रागावला. परंतु वाण्याच्या बायकोने क्षमायाचना केल्यावर त्याने दया येऊन एक उपाय सुचवला.
त्यानुसार निळ्या घोडीवर निळा पोशाख करून वाणी वनातून जात असताना जिथे घोडा अडला, तिथे खणल्यावर त्याला पार्वतीचे देऊळ लागले. पार्वतीमातेला त्याने आपली व्यथा सांगितली. पार्वतीमातेने त्याला दीर्घायुषी आंधला अथवा गुणी पण अल्पायुषी या दोघांपैकी कसा मुलगा हवा ते विचारले. त्यावेळी वाण्याने गुणी परंतु अल्पायुषी मुलगा चालेल असे सांगितले. मग देवीने त्याला देवळाच्या पाठच्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून तो पत्नीला खाऊ घालण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्या वाण्याने एक आंबा पत्नीला नेऊन दिला. तिने तो खाल्ला. पुढे देवीच्या कृपेने तिला मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचे नाव शिव ठेवले. यथाकाल त्याची मुंज केली. तो दहा वर्षांचा असतानाच त्याला मुली सांगून येऊ लागल्या. तो ससेमिरा चुकवण्यासाठी मग वाण्याने मामासह शिवाला काशीयात्रेला पाठवले.
वाटेत एका नगरातील बागेजवळून जाताना लहान मुलींचे भांडन होत होते. ते मामांनी ऐकले. त्यातील एका मुलीने सुशीला नावाच्या दुसऱ्या मुलीला काही अपशब्द ऐकवला. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, 'माझ्या आईने गौरीव्रत केल्यामुळे मी कधीच विधवा होणार नाही.' हे ऐकून शिवाच्या मामाने या मुलीशी शिवाचे लग्न लावून द्यायचे असे ठरवले. पुढे यथाकाल अडचणींना सामोरे जात त्यांचा विवाह, वियोग आणि पुनर्मिलन होते.
असे हे गौरीव्रत करून आपले आयुष्य मंगलमयी करावे व सौभाग्य, सद्भाग्य प्राप्त करून जीवन आनंदाने व्यतीत करावे, हे सांगणारी मंगळागौरीची कथा सुफळ संपूर्ण!