Mangalagauri 2024: मंगळागौरीच्या व्रतामध्ये असते मौनाचे महत्त्व, पण का? जाणून घ्या आणि वाचा पूजाविधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 07:00 AM2024-08-06T07:00:00+5:302024-08-06T07:00:01+5:30

Mangalagauri 2024: यंदा ६ ऑगस्ट रोजी मंगळागौरीचे व्रत सुरू होईल, ते श्रावणातील चार मंगळवार कसे करायचे ते जाणून घ्या.

Mangalagauri 2024: Mangalagauri's Vrat has significance of silence, but why? Learn and read the rituals! | Mangalagauri 2024: मंगळागौरीच्या व्रतामध्ये असते मौनाचे महत्त्व, पण का? जाणून घ्या आणि वाचा पूजाविधी!

Mangalagauri 2024: मंगळागौरीच्या व्रतामध्ये असते मौनाचे महत्त्व, पण का? जाणून घ्या आणि वाचा पूजाविधी!

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांकडून मंगळागौरीचे (Mangalagauri vrat 2024) व्रत केले जाते. सुवासिनी स्त्रिया लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत हे व्रत करतात. वटसावित्रीप्रमाणे हे व्रतही सौभाग्यदायक असून त्यायोगे पतीचे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे. हे व्रत पहिल्या वर्षी माहेरी आणि पुढची चार वर्षे सासरी करतात.

मंगळागगौरीची पूजा म्हणजे उमामहेश्वराची पूजा. पती-पत्नी दोघांतील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठीच ही पूजा केली जाते.

मंगळागौरीचा पूजा विधी -

मंगळागौरीच्या व्रतात शिव व गणपती यांच्यासह गौरीची पूजा करतात. पूजेसाठी चौरंग मांडतात. त्याला केळीचे खुंट बांधून मखर तयार करतात. ते फुलांनी सजवतात. त्या भोवती रांगोळी काढतात. पूजेला लागणारे साहित्य तयार करून ठेवतात. 

या पूजेत १६ संख्येचे विशेष महत्त्व आहे. सोळा प्रकारची पत्री, सोळा प्रकारची फुले आणि पुरणाचे सोळा दिवे यांसह षोडशोपचारे गौरीची पूजा केली जाते. तसेच गौरीसाठी पुरणाचे अलंकार केले जातात. त्यात दागिने, हार, गजरा, भातुकली, फणी असे प्रकार पुरणापासून बनवले जातात व पूजा करतेवेळी गौरीला अर्पण केले जातात.

या पूजेत अंगपूजा, पत्रीपूजा, पुष्पपूजा अशा अंगभूत पूजा असतात. मंगळागौरीचे व्रत करणाऱ्या मुली न्हाऊन माखून पूजेला बसतात. पूजेकरता पुरोहित बोलावून यथासांग पूजा केली जाते. मंगलारती झाल्यावर कहाणीवाचन केले जाते.

आपल्या मातेस व मातेसमान असलेल्या उपस्थित सर्व महिलांना नमस्कार केला जातो. फराळ दिला जातो. सुवासिनींना हळद कुंकू, काजळ, करंडा, फणी, तांदूळ, खण, नारळ, सुपारी व दक्षिणा यांनी युक्त असलेले ताट दिले जाते. पुरोहितांना दक्षिणा दिली जाते. 

या व्रतात मौनाचे महत्त्व आहे. पूजा करते वेळी मौन पाळून भक्तीपूर्वक देवीला शरण जावे, हा त्यामागील हेतू असतो. पूजा झाल्यावर सुवासिनीसमवेत आप्त नातलग मिळून स्नेहभोजन करतात. त्यावेळी ज्या वशेळ्या अर्थात नवीन लग्न झालेल्या आणि पूजेला बसलेल्या मुलींना विडा आणि दक्षिणा दिली जाते. हे सर्व होईपर्यंत मौन पाळायचे असते. जेवून तुळशीचे पान खाऊन मगच मौन सोडायचे असा या पूजेचा नेम असतो. गप्पा गोष्टींमध्ये चित्त विचलित होऊ नये व पूजेप्रती समर्पण भाव असावा यासाठी मौनाचे महत्त्व सांगितले आहे. 

रात्रीच्या वेळी सोळा काडवातींनी मंगलारती केली जाते. शिवगौरीच्या गुणगौरवाची, महिम्याची गीते, फुगड्या, गाणी, भेंड्या, आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेणे, असे नानाविध कार्यक्रम करून हसत खेळत मंगळागौर जागवली जाते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेनंतर गौरीचे विसर्जन केले जाते. 

Web Title: Mangalagauri 2024: Mangalagauri's Vrat has significance of silence, but why? Learn and read the rituals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.