Marbat Festival: १४० वर्षांची परंपरा आणि महाभारतात सापडते मूळ; वाचा या अनोख्या मिरवणुकीची माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:01 PM2024-09-03T16:01:18+5:302024-09-03T16:01:54+5:30
Marbat Festival 2024: नागपूर येथे २ सप्टेंबरच्या रात्री पारंपरिक आणि ऐतिहासिक मिरवणूक निघाली, ती होती पिवळ्या काळ्या मारबतीची; त्याबद्दल जाणून घ्या!
>> सर्वेश फडणवीस, नागपूर
‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’.....'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच बघायला मिळतो. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरने १४० आणि १४४ वर्षांपासून चालत आलेल्या या ऐतिहासिक वारशाचं जतन केलं आहे. बडग्या - मारबत या परंपरेमुळे नागपूरला ऐतिहासिक अशी ओळख मिळाली आहे. लहानपणापासून बडकस चौकात जाऊन मारबत बघतांना कायमच आनंद मिळत होता. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मारबत निघायची आणि ती बघण्याचा योग अनेक वर्षे आला. खरंतर या काळात पावसामुळे रोगराई वाढलेली असते त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो.
मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे असावा असे वाटते आणि ही मारबत बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातून पण अनेकजण येतात. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. जुन्या नागपूर भागात ही परंपरा आजही बघायला मिळते. काळी मारबत १४० वर्षांपासून चालू आहे. या काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची धिंड अर्थात मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर पुन्हा कधीही समस्या, संकटे आली नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही काळी - पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे.
अशी ही कथा आहे की, इंग्रजी राजवटीत जनता त्रस्त होती. परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तसेच देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी सत्याग्रहींच्या गुप्त बैठकांसाठी १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. त्यावेळी दिवंगत आप्पाजी व बटानजी भाऊ खोपडे यांनी बांबुच्या कमच्या व कागद लावून ३ ते ४ फूट उंचीची बाहुलीसारखी मारबत तयार करून लोकांच्या मदतीने शहरात तिची मिरवणूक काढली आणि हा ऐतिहासिक उत्सव सुरू झाला.
डॉ भालचंद्र अंधारे यांच्या नुसार बाकाबाईच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे १८८५ मध्ये तऱ्हाने तेली समाजाकडून मारबत उत्सव सुरू झाला आहे. मग बाकाबाईचा संबंध मारबत मिरवणुकीशी कसा काय ? तर त्याचे कारण असे की श्रावण अमावस्या शके १७८० म्हणजेच ७ सप्टेंबर १८५८ रोजी श्रीमंत बाकाबाईसाहेब भोसले यांचे निधन झाले आणि त्यादिवशी मोठा पोळा होता. ८ सप्टेंबर १८५८ रोजी तान्हा पोळ्याच्या दिवशी श्रीमंत बाकाबाई यांची अंत्ययात्रा निघाली होती आणि श्रीमंत बाकाबाई यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि त्याचा निषेध म्हणून पुढे मारबत मिरवणुकीचा संबंध श्रीमंत महाराणी बाकाबाई साहेबांशी जोडला गेला आणि तो आजतागायत कायम आहे.
या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. चार दिवस तिची विधिवत स्थापना केली जाते. लहान मोठे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने होतात. महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि तान्ह्या पोळ्याच्या दिवशी यांची मिरवणूक काढली जाते. आणि दहन केले जाते. लहान मोठे सगळेजण मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात. आज या शेकडो वर्षांच्या परंपरेला टिकवून आपल्या नागपूरची ओळख आणि वेगळेपण आजही टिकून आहे आणि काल रात्री हे बघून आल्यावर तेथील सगळा एकंदरीत माहोल बघितल्यावर जाणवले की हे नक्की टिकून राहणार आहे. नागपूर नगरीचा हे वेगळेपण जपून आहे आणि अनेकांना कळावे यासाठी हे लेखन आहे. आता काही वेळात या काळी आणि पिवळी मारबतीची मिरवणूक निघेल आणि मग तिचे दहन होईल. ही परंपरा आणि या श्रद्धेला मोल नाही. काल रात्री सुद्धा भाविक रांगेतून दर्शन घेत होते. ही परंपरा ऐतिहासिक अशीच आहे आणि प्रत्यक्षात एकदा तरी अनुभवायला हवी हेच या उत्सवाचे प्रयोजन आहे.