March Born Astro: मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांची आयुष्यात लवकर होते फसगत; 'हे' नियम जरूर पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:42 IST2025-02-28T12:41:43+5:302025-02-28T12:42:24+5:30
March Born Astro: व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात झाला, त्यानुसारही त्याचे गुण दोष सांगितले जातात; इथे मार्च मधल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊ.

March Born Astro: मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांची आयुष्यात लवकर होते फसगत; 'हे' नियम जरूर पाळा!
आपली जन्मतारिखच नाही, तर आपला जन्म मासदेखील आपल्या व्यक्तीमत्त्वाबद्दल भाकित करतो. तुमचा वाढदिवस जर मार्चमध्ये असेल, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वात पुढीलपैकी कोणकोणते गुण आहेत, हे तपासून घ्या आणि जे चांगले गुण तुमच्यात नसतील, ते अंगी बाणून घेण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या अंगभूत कलागुणांची पटकन कोणाला कल्पना येणार नाही, परंतु जसाजसा व्यक्तिपरिचय होत जाईल, तस तसे तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल लोकांमध्ये आकर्षण वाढत जाईल.
तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असता. त्यासाठी कष्ट सोसायची तुमची तयारी असते. कोणत्याही विषयावर मत प्रगट करण्याआधी तुम्ही त्या विषयाची सखोल माहिती घेता आणि मगच मतप्रदर्शन करता. या चांगल्या सवयीमुळे लोक तुमचे मत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
या महिन्यातील व्यक्तींमध्ये दोन गट पडतात. काही जण अतिशय रसिक असतात, तर काही अगदी विरुद्ध टोकाचे म्हणजेच अरसिक असतात. बाकी कशात रस नसला, तरी गप्पांमध्ये यांचा हातच काय, तर तोंडही कोणी धरू शकत नाही. त्यामुळे सण-समारंभात रंग भरण्याची जबाबदारी यांच्यावर येऊन ठेपते. ते समारंभाचा अविभाज्य भाग ठरतात.
या लोकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. एकदा लागलेली सवय सोडवणे अतिशय कठीण जाते. आणि नशेमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण झाकोळले जातील व तुमची प्रतिमा मलीन होईल. यासाठी व्यसन आणि व्यसनी लोकांना चार हात दूर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा.
या लोकांच्या मनात, डोक्यात विचारांची स्पष्टता नसते. ते सतत दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपयशीदेखील ठरतात. मनात सतत द्वंद्व असल्यामुळे मन अस्वस्थ राहते, स्वभाव बिघडतो, चिडचिड होते आणि एकामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून अशा लोकांनी ध्यानधारणेवर भर दिला पाहिजे.
तुमच्या द्विधा मनस्थितीमुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवताना घाबरतात. तुमचा निर्णय घटकेत कधी बदलेल, हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. या स्वभावामुळे तुमची विश्वासार्हता कमी होते आणि लोक तुम्हाला ग्राह्य धरत नाहीत. यासाठी एका निर्णयावर ठाम राहणे, संयम बाळगणे, विचारपूर्वक काम करणे, या सवयी लावून घ्या. त्याचा उपयोग तुम्हाला करिअरमध्येही होईल. यशस्वी व्हाल आणि लोकांच्या नजरेतही तुमचे स्थान कायम कराल.
शुभ अंक : ३,७,९
शुभ रंग : हिरवा, पिवळा, गुलाबी
शुभ वार : शनिवार, रविवार, सोमवार
शुभ कर्म : पाण्यात मध मिसळून रोज सूर्याला अर्घ्य द्यावे.
या महिन्यात जन्मलेली यशस्वी भारतीय व्यक्तिमत्त्व : डॉ. कल्पना चावला, मेरी कोम, स्मृती इराणी, अनुपम खेर, श्रेया घोषाल, आमिर खान इ.