मार्गशीर्षारंभ: अत्यंत प्रभावी गुरुस्तवन स्तोत्र म्हणा; स्वामींची अपार कृपा मिळवा, शुभ घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:02 PM2024-12-04T15:02:35+5:302024-12-04T15:12:47+5:30
Shree Swami Samarth Maharaj Gurustavan Stotra: कोट्यवधी स्वामी भक्त अगदी न चुकता नित्यनेमाने विशेष स्वामी सेवा करतात. स्वामी सेवेत या प्रभावी स्तोत्राचा समावेश करा अन् अद्भूत अनुभूती अनुभवा.
Shree Swami Samarth Maharaj Gurustavan Stotra: मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात विविध व्रते केली जातात.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. गुरुवार हा स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरु यांच्या विशेष पूजनासाठी समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींचे केलेले नामस्मरण, स्तोत्र पठण, मंत्रांचे जप विशेष करून शुभ पुण्यदायी ठरते, अशी मान्यता आहे. कोट्यवधी स्वामी भक्त अगदी न चुकता, नित्यनेमाने गुरुवारी विशेष स्वामी सेवा करतात. तर हजारो भाविक अक्कलकोटी जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. ज्यांना अक्कलकोटला जाणे शक्य नाही, ते जवळच्या स्वामी मठात जाऊन गुरुवारी आपापल्या परिने स्वामी सेवा करतात. स्वामी समर्थ महाराजांना समर्पित अनेक स्तोत्रे, आरत्या, मंत्र, श्लोक आहेत. पैकी गुरुस्तवन स्तोत्र हे अत्यंत प्रभावी, पुण्यदायी आणि दिव्य अनुभूती देणारे मानले जाते. परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामींच्या प्रेरणेने दिव्य श्रीगुरुस्तवन स्तोत्र रचले. या स्तोत्रांच्या दिव्य अनुभूती भक्तांना आल्या आहेत, असे सांगितले जाते.
श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र
ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेऊनि माथा । स्तवितो ताता तुजलागी ।। १ ।।
तू नित्य निरंजन । तुज म्हणती निर्गुण । तूच जगाचे कारण । अहंभावे प्रगटलासि ।। २ ।।
तुझी स्तुती करावया । शक्ति नसे हरिहर ब्रह्मया । परि अघटित तुझी माया । जी संशयभया निवारीत ।। ३ ।।
मूळ मूळीचा आकारू । तुज म्हणती श्रीगुरू । सच्चित शक्तीचा आधारू । पुर्णाधारू ॐकारासी ।। ४ ।।
ऐसा तू देवाधिदेव । हे विश्व तुझेचि लाघव । इच्छेचे वैभव । मूळब्रह्मी नटविले ।। ५ ।।
ऐसा तू बा अपरंपारू । या अनंत ब्रह्माचा आधारू । चराचरीचा आकारू । पुर्णाधारू म्हणविले ।। ६ ।।
ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती । तू जाणसि हे चित्ती । विश्वव्यापक म्हणवूनी ।। ७ ।।
तरी देवा मतिदान । देणे तुझचि कारण । जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ।। ८ ।।
अहा जी निर्गुणा । विश्वव्यापक सगुणा । सत्य निराकार निरंजना । भक्तांकारणे प्रगटलासी ।। ९ ।।
रूप पहाता मनोहर । मूर्ति केवळ दिगंबर । कोटी मदन तेज निर्धार । ज्याच्या स्वरूपी नटले ।। १० ।।
कर्ण कुंडलाकृती । वदन पाहता सुहास्य मूर्ति । भ्रुकुटी पहाता मना वेधती । भक्त भाविकांचे ।। ११ ।।
भोवयांचा आकारू । जेथे भुले धनुर्धरु । ऐसे रूप निर्धारु । नाही नाही जगत्रयी ।। १२ ।।
सरळ दंड जानु प्रमाण । आजानबाहु कर जाण । जो भक्तां वरद पूर्ण । ज्याचे स्मरणे भवनाश ।। १३ ।।
ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्गुरू । मज दावुनि ब्रह्म चराचरू । बोलविला आधारू जगतासी ।। १४ ।।
ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी । वेद श्वान होऊनी । सदा द्वारी तिष्ठती ।। १५ ।।
तेथे मी लडिवाळ । खरे जाणिजे तुझे बाळ । म्हणवोनी पुरवि माझी आळ । माय कणवाळ म्हणविसी ।। १६ ।।
मी अन्यायी नानापरी । कर्मे केली दुर्विचारी । ती क्षमा करोनि निर्धारी । मज तारी गुरुराया ।। १७ ।।
मनाचिया वारे । जे उठवि पापांचे फवारे । तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवि फेरे भवाचे ।। १८ ।।
कायिक वाचिक मानसिक । सर्व पापे झाली जी अनेक । ती क्षमा करुनी देख । मज तारी गुरुराया ।। १९ ।।
माता उदरी तुम्ही तारिले । ते विस्मरण जिवासी पडिले । हे क्षमा करोनि वहिले । मज तारी गुरुराया ।। २० ।।
पर उपकार विस्मरण । पापे केली अघटित कर्म । अहंभाव क्रोधा लागून । सदाचि गृही ठेवियले ।। २१ ।।
हे क्षमा करोनि दातारा । मज तारावे लेकरा । तुजविण आसरा । नाही नाही जगत्रयी ।। २२ ।।
मज न घडे नेम धर्म । न घडे उपासना कर्म । नाही अंतरी प्रेम । परी ब्रीदाकरण तारणे ।। २३ ।।
नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही । ऐसे देती ग्वाही । संत सज्जन पुराणे ।। २४ ।।
मागे बहुत तारिले । हे त्यांही अनुभविले । मज का अव्हेरिले । निष्ठुर केले मन किंनिमित्त ।। २५ ।।
तू विश्वाकारु विश्वाधारू । त्वांचि रचिले चराचरू । तूचि बीज आधारू । व्यापक निर्धारु जगत्रयी ।। २६ ।।
चार देहाच्या सूक्ष्मी । तूचि झुलविशी निज लगामी । हे ठेऊनी कारणी । अहंभाव तोडावया ।। २७ ।।
जन्ममरणाच्या व्यापारी । जे भ्रमुनी पडले माया भरारी । ते सोडविशी जरी । निजनामे करुनिया ।। २८ ।।
ऐसा तू अनादि आधारू । तुज म्हणती वेद्गुरू । परी हे व्यापुनी अंतरु । स्थिरचरी व्यापिले ।। २९ ।।
भावभक्ती चोखट । करणे नेणे बिकट । नाम तुझे सुभट । तोडी घाट भवाचा ।। ३० ।।
हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी । तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ।। ३१ ।।
म्हणोनि मौन्यगती । तुज निजानंदी स्तविती । जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ।। ३२ ।।
म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी जाणोनिया ।। ३३ ।।
अहंभाव तुटोनि गेला । प्रेमभाव प्रगटला । देव तेथेचि राहिला । अनुभवशुद्धी खेळवी ।। ३४ ।।
यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ।। ३५ ।।
म्हणोनि सांगणे खूण । हा स्तव नित्य प्रेमे जाण । जो वाचील अनुप्रमाण । अकरा वेळा निर्धारे ।। ३६ ।।
शुचिस्मित करूनि चित्ता । जो जपे प्रेमभरिता । पुरवि तयांच्या मनोरथा । सत्य सत्य त्रिवाचा ।। ३७ ।।
हे लघु स्तव स्तवन । तारक जगाच्या कारण । भक्तिभावे पूर्ण । चुके चुके भव फेरा ।। ३८ ।।
जो हा स्तव करील पठण । त्या घरी आनंद प्रकटेल जाण । देवोनि भक्ता वरदान । तारक त्रिभुवनी करील ।। ३९ ।।
हा स्तव नित्य वाचा । भाव धरुनि जीवाचा । फेरा चुकवा चौऱ्यांशीचा । गर्भवास पुन्हा नाही ।। ४० ।।
हे जगा हितकारी । चुकवि चुकवि भ्रमफेरी । मृगजळ दाऊनि संसारी । मग तारी जीवाते ।। ४१ ।।
हे आनंदनाथांची वाणी । जग तारक निशाणी । स्मरता झुलवी निरंजनी । योगी ध्यानी डुलविले ।। ४२ ।।
ऐसे ऐकता गुरुस्तवन । जागे केले सच्चित गुरुकारण । केवळ तो हरि हर ब्रह्म ।
मुखयंत्रीचा गोळा पूर्ण । गुरुहृदय भुवन व्यापिले ।। ४३ ।।
तेणे होवुनि स्मरती । स्वये प्रगटली स्फूर्ती । नाभी नाभी आवरती । अवतार स्थिती बोलतो ।। ४४ ।।
अयोनिसंभव अवतार । हिमालय उत्तरभागी निर्धार । होऊनी पूर्ण हंस दिगंबर । व्यापू चराचर निजलीले ।। ४५ ।।
तेथून प्रगट भुवन । मग उद्धरु धरा जाण । धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे ।। ४६ ।।
ऐशी ध्वनी निर्धार । गर्जला गुरु दिगंबर । सर्व देवी केला नमस्कार । आनंद थोर प्रगटला ।। ४७ ।।
शालिवाहन शके तिनशे चाळीस । शुद्धपक्ष पूर्ण चैत्र मास । अवतार घेतला द्वितीयेस । वटछायेसी दिगंबरु ।। ४८ ।।
तै धरा आनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार । सेवा करीन निर्धार । पादकिंकरी होऊनिया ।। ४९ ।।
ऐसी गर्जना प्रकट । आनंद बोधवी हितार्थ । गुह्य हे निजबोधार्थ । न बोलावे दांभिका ।। ५० ।।
।। श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।