Margashirsha Guruvar 2023: कुंडलीत गुरुचे मिळेल पाठबळ, दत्तकृपेचा मार्ग होईल सुकर; करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:42 PM2023-12-28T14:42:46+5:302023-12-28T14:43:11+5:30
Astrology Tips; कुंडलीत गुरुचे पाठबळ चांगले असेल तर इतर ग्रहदशा यश प्राप्तीसाठी अनुकूल होते, ती करण्यासाठी दिलेले ज्योतिष शास्त्रीय उपाय करा.
सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे. हिंदू धर्मात पिंपळ, तुळशी, वड, शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे. असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात. या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचे. त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो.
विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला
या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो. यासोबतच पैशांशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तविक, शुक्र हा संपत्ती आणि ऐषोआरामाचा ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो, त्याला धन आणि ऐश्वर्य यांची कधीही कमतरता नसते. पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो, तिथे दारिद्रय, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते. चला तर मग आज जाणून घेऊया उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय, जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्याही दूर करतील.
शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळण्यासाठी: उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. 'ओम शम शुक्राय नमः' या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते. दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते.
समृद्धीसाठी उपाय : शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे. ११ प्रदक्षिणा घालाव्यात. या झाडाखाली बसून 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' या मंत्राचा जप करावा. घरात सुख शांती राहते.
ज्योतिष शास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन-संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका.
मानसिक स्वास्थ्यासाठी : रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन-नामःस्मरण करा. महिनाभरात तुम्हाला मनःस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल. मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सान्निध्य सर्वार्थाने चांगले आहे.